रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

करंटे साहेब !

       
बहुतेक ठिकाणी आर टी ओ कार्यालयातून ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे . प्रामाणिक आर टी ओ अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी  या ऑनलाईन लायसेन्स योजनेबाबत आग्रह धरला होता ; ऑनलाईन लायसेन्स योजनेमुळे लोकांना कमी वेळात , कमी खर्चात , पारदर्शक सेवा मिळावी असा विधायक विचार यामागे आहे , ज्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले अशा अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा करायलाच पाहिजे .
मात्र काही आर टी ओ कार्यालयात काही भ्रष्ट आणि नालायक कर्मचार्यांनी  या लोकोपयोगी योजनेला खीळ घालण्याचा करंटेपणा सुरु केलेला आहे . कधी आर टी ओ एजंट च्या आंदोलनाला चालना देऊन तर कधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्येक्षपणे ऑनलाईन  लायसन्स घेणाऱ्या लोकांना शुल्लक कारणांवरून मानसिक त्रास देऊन छळ सुरु आहे ! छळ करणाऱ्या  नालायक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना ..........................
( रिकाम्या जागी लागू असलेले शब्द वापरा ).
या ऑनलाइन लायसेन्स बाबत  पनवेलच्या आर टी ओ कार्यालयात मला आलेला अनुभव खूप वाईट आहे . माझ्या मुलाच्या लर्निंग लायसन्स साठी मुलाने ऑनलाइन अर्ज केला व अपॉइंटमेंटच्या वेळेच्या एक तास आधी कळंबोली च्या आर टी ओ कार्यालय अर्ज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी रांगेत उभा राहिला . कागदपत्रे तपासणाऱ्या अधिकाऱ्याने त्या कागदपत्रात फॉर्म नंबर १ नसल्याचे कारण सांगून मुलाला परत पाठवले . त्याच कार्यालयाच्या शेजारील आर टी ओ  एजंटकडून १० रुपयाचा A4 साईजचा एक पानी फॉर्म विकत घेतला , भरला  आणि पुन्हा रांगेत जाऊन फॉर्म तपासणी अधिकाऱ्याला सर्व कागदपत्रे दाखवलेत , पुन्हा त्या अधिकाऱ्याने म्हटले की - जन्म तारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला कुठे आहे ? आणि कहर म्हणजे तुझे वय बसत नाही असे चक्क खोटे सांगून मुलाला पुन्हा परत पाठवले .
मुलगा मला म्हणाला - " पप्पा , ते साहेब म्हणतायत की वय कमी आहे, शाळा सोडल्याचा दाखला नाही " मग मीच साहेबांना भेटलो आणि विचारले -          " साहेब , जन्मतारखेचा पुरावा म्हणून १० वी च्या बोर्ड सर्टिफिकेट चे ओरिजन आणि झेरॉक्स सोबत दिले आहे तरी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखल्याची सक्ती का करता ? आणि या सर्टिफिकेट वरील जन्म तारखेनुसार  माझ्या मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण आहे तरीही अडवणूक का करता  ?"
साहेब ओशाळला आणि म्हटला -          " ओके , ओके ! बघतो नंतर , थांबा जरा "
तो पर्यंत आर टी ओ एजंट कडून लायसेन्स साठी येणाऱ्या सगळ्या कागदपत्रांवर तो अधिकारी फारसे काळजीपूर्वक कागदपत्रे न तपासता  दणक्यात सह्या करत होता , हे मी आणि माझ्यासारखे कित्येक अभागी बघत उभे  होतो .
अर्ध्या तासा नंतर त्याचीच त्याला लाज वाटली , नि कागदपत्रांवर सह्या केल्यात आणि लर्निंग टेस्ट साठी चलन भरायला सांगितले . हा झाला लर्निंग लायसेन्स चा अनुभव !
आता पक्के लायसेन्स च्या वेळी तर यापेक्षा भयानक करंटेपणा करणारा दुसरा अधिकारी पाहिला . रीतसर ऑनलाईन अर्ज , अपॉइंमेन्ट , सर्व कागदपत्रे घेऊन कर्नाळा स्पोर्ट्स क्लबच्या बाजूला आर टी ओ कार्यालयात ते कागदपत्रे दाखवून ड्रायविंग  टेस्ट घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जवळ जाणार तेवढ्यात काही रिक्षा टॅक्सी चालकांनी सांगितले कि ड्रायव्हिंग टेस्ट घेणारे साहेब कलंबोली च्या ऑफिस मध्ये मीटिंग ला गेले आहेत .साहेबांची वाट बघत १२ ते दुपारच्या ३ वाजेपर्यंत थांबलो , शेवटी कंटाळून आर टी ओ ऑफिस ला फोन केला आणि त्यानंतर पाऊण तासांनी साहेब मीटिंग संपवून तिथे आले . मी आणि माझ्या मुलाशिवाय तिथे अन्य कोणीही ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला नव्हते . ( चिकाटी  - दुसरं काय ! )
साहेबाला कागदपत्रे दाखवली , कागदपत्रे चाळता चाळता साहेबाने मला विचारले - "ऑफिसला तुम्ही फोन केला होता ना ! " मी होकारार्थी मान डोलावली , तर साहेब म्हटले -"अहो, उद्या वृक्ष रोपण दिनाच्या तयारीसाठी आम्ही गेलो होतो १०० झाडे लवायचीत उद्या आम्हाला , तुम्ही लोकं समजून घेत नाहीत वगैरे !
मी काहीही समजून घेणाऱ्यातला नाही अशी त्या साहेबाची पक्की खात्री झाल्यावर मला त्याने विचारले कि गाडीच्या काचांना फ्लेम लावली आहे का ? मी हो म्हणून सांगितले व आर टी ओ अप्रुव्ह आहे असेही बोललो , त्यावर साहेब म्हटला - 'नाही , नाही ! तसं काहीही नसतं , आधी सगळ्या काचेवरील फ्लेम काढा ,किंवा फ्लेम नसलेली गाडी आणा तरच ड्रायव्हिंग टेस्ट होईल "  मी चारचाकी गाडीवाल्या माझ्या मित्रांना फोन करून विचारले की तुमच्या गाडीच्या काचांना फ्लेम आहे का ? दोघांनीही होकार कळविल्यामुळे नाईलाजास्तव आमच्या गाडीच्या काचांवरील फ्लेम काढायला सुरवात केली .(साहेबाच्या बाजूलाच ) आम्ही बाप लेक  ब्लेडने फ्लेम काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना  तो साहेब बघत होता . खिडकीच्या चारही काचेच्या फ्लेम काढल्या आणि मागील काचेची फ्लेम काढता काढता त्याच साहेबाची जवळ उभी असलेली चारचाकी गाडी डोळ्यात सलायला लागली ; कारण त्याच हरामखोर साहेबाच्या गाडीच्या चारही खिडक्यांच्या आणि मागील काचांवर चक्क काळी फ्लेम लावलेली दिसली . अजूनही त्या साहेबाची गाडी बघितली तर त्याची ..........आठवते. 'आपलं ते बाळं आणि दुसऱ्याचं कार्ट' असे म्हणणारे आपमतलबी , करंटे साहेब समाजात असेपर्यंत कोणत्याही चांगल्या योजना फलदायी ठरणार नाहीत.
------------------------------------------------------------------------------------------------------एक  नागरिक - संजय माधवराव पाटील , पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा