शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

आदर्श गुरुः श्रीमती निंबाळकर म्यडम

सुलभा विजयसिंह निंबाळकर - एक भारदस्त नाव!  
या नावाशी सख्य जमलं ते १९९६ ला ज्यनियर कालेज विभागात आल्यापासून. माणूस अनेक गुणांची मूर्ती असू शकतो याची प्रचिती म्यडमच्या वागण्या- बोलण्यातून मला  नेहमीच आली.
आपुलकीची आणि स्नेहाची दाट सावली , विनम्रतेचा  व निरपेक्ष सहकार्याचा गारवा,  माया - ममतेचा शीतल शिडकावा , बोलण्यातला मधूर गोडवा , स्वत्व व स्वाभिमान जपतानाचा सहज साधेपणा , राहणीमानातली शालीनता  व आभाळासारखं दिलदार मन अशा अनेकविध आदर्श पैलूंनी सम्रुध्द व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती निंबाळकर म्यडम !  
आतापर्यंतच्या माझ्या मराठी विषय अध्यापनातल्या अडचणी मी म्यडमकडे प्रमाणिकपणे मांडल्या व प्रत्येक वेळेस अगदीच सहजतेने त्यांनी मला मार्गदर्शन केले. बांठीया विद्यालयातील माझ्या पहिल्या गुरु म्हणून मी त्यांना मनोमन पूजत आलो आहे , त्यांच्या सोबत शाळेतले बरेच उपक्रम हाताळण्याचं सदभाग्य मला लाभले,  यातूनच मी बरचं काही शिकलो . नियोजनातले बारकावे कसे पाहावेत,  प्रत्यक्ष काम हाताळतांना अविश्रांत मेहनत कशी करावी, सहकारी शिक्षकांवर अढळ विश्वास कसा ठेवावा, विद्यार्थ्यांना आपलसं कसं करावं , हाती घेतलेला उपक्रमाला संयत मूर्तरुप  कसं द्यावं अशा बहुसंख्य गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो .
शाळेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'रौप्यरंग' विशेषांकाचे संपादक मंडळात मी  निंबाळकर म्यडमच्या हाताखाली काम केलं , शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त प्रकाशित होणारे हस्तलिखित साकारताना किंवा विविध स्पर्धा अथवा उपक्रमातून म्यडमच्या मार्गदर्शनात मी जे काही काम केलं असेल त्याचं श्रेय म्यडमला जातं.
आज दि ३० सप्टेंबर २०१४ (मंगळवार)  रोजी श्रीमती निंबाकळकर म्यडम नियत वयोमानानुसार सेवानिव्रुत्त झाल्यात , त्यांच्या भावी आयुष्यात सुख - सम्रुध्दी व असेच घवघवीत यश लाभो या सदिच्छेसह थांबतो .

रविवार, १ जून, २०१४

मेहनती -रोडगे सर !

संग्राम शिवाजी रोडगे हे १९८२ पासून बांठिया विद्यालय पनवेल येथे कार्यरत आहेत .३१ मे २०१४ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिव्रत्त होत आहेत , पण ३१ मे ला  उन्हाळी सुट्टी असल्याने दि. २९ एप्रिलला शाळेकडून त्यांना निरोप दिला गेला व ३० एप्रिल  ला सायंकाळी ६ ते १० या वेळेत विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी रोडगे सरांवरील  प्रेमापोटी दिमाखदार सेवापूर्ती समारंभ आयोजित केला होता.  या समारंभासाठी पनवेलचे विद्यमान आमदार श्री प्रशांत ठाकूर ,पनचवेलचे  माजी नगराध्यक्ष श्री संदिप पाटील, जि.प.सदस्य श्री राजेंद्र पाटील,  विद्यालयाचे भूतपूर्व मुख्याध्यापक श्री सुतार सर,  विद्यमान मुख्याध्यापक श्री पवार सर,  पनवेलचे मीडिया प्रतिनिधी,  अनेक शाळांचे मुख्याध्यापक,  शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसह अनेक आजी-माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री रोडगे सरांबद्दल गौरोद्गार  काढलेत.  सर्व वक्त्त्यांच्या भाषणांतून रोडगे सरांच्या ३२ वर्षाच्या सेवेतील आठवणी सांगताना एक मुद्दा समान दिसला व तो म्हणजे रोडगे सरांची शिस्त ,कामावरील निष्ठा.  मी १९९६ पासून रोडगे सरांना पाहतो आहे . शाळेच्या प्रत्येक मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी रोडगे सरांच्या वक्तशीरपणाबद्दल व अविश्रांत परिश्रमाबद्दल कबुली दिलेली आहे . त्यांच्या मित्रांनी त्यांचं कौतुक करणं स्वाभाविक आहे पण त्यांचे विरोधकही त्यांच्या वरील गुणांचं कौतुक करतांना मी अनुभवले आहे . अशी माणसं  समाजासाठी आदर्श ठरतात .रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत म्हणजे तब्बल १४ वर्ष विनाअनुदानित रात्र शाळा चालवतांना अनेक अडचणी आल्या असतील,  अनेकांशी त्यांचे मतभेदही झाले असतील तरी ते कधीही कोणावरही खूप भडकले किंवा अद्वातद्वा बोलले असं कधीही दिसलं नाही.  पराकोटीचा संयम काय असतो तो त्यांच्या वागण्या- बोलण्यातून जाणवला. एस.एन.डी.टी चे दूरस्थ अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो.  केंद्राला मान्यता मिळवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता,  तत्कालीन मुख्याध्यापक श्री मोकल सरांनी,  जोशी सरांनी संस्थेकडे हा प्रस्ताव पाठवला होता पण संस्थेने विहित वेळेत प्रस्तावावर निर्णय न घेतल्याने मी  रोडगे सरांना त्याबाबत सांगितले. व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,  नाशिक ला प्रस्ताव पाठवण्याबाबत बोललो. रोडगे सरांचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेबांचे संबंध खूप सलोख्याचे असल्याने रोडगे सरांना अडचणी आल्या नाहीत व मुक्त विद्यापीठाचे केंद्र बांठिया विद्यालयात सुरु झाले . या ही प्रसंगातून एक लक्षात आलं की रोडगे सर अखंड पाठपुरावा करणारे आहेत . संस्था,  सर्व मुख्याध्यापक यांच्याबरोबर  मैत्रीपूर्ण संबंध असल्याने बहुसंख्य कामे होतात याचाही प्रत्यय आला .हे केंद्र चालवतांना दिवसरात्र मेहनत घेऊन रोडगे सरांनी केंद्राचा पर्यायाने संस्था व शाळेचा लौकिक वाढवला आहे . अनेक अल्पशिक्षितांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण या केंद्रामुळे घेता आले आहे , ही परंपरा कायम टिकावी व रोडगे सरांच्या परिश्रमाचे चीज व्हावे ही अपेक्षा आहे .
निव्रुत्ती नंतर त्यांच्या कामाचा व्याप कमी होवो व सुखी,  समाधानी , आरोग्यदायी दीर्धायुष्य त्यांना लाभो या सदिच्छेसह थांबतो .
.....................................................
संजय पाटील,  पनवेल.

गुरुवार, ८ मे, २०१४

आजोबा

आज संध्याकाळी मनसे च्या दुर्गामाता मंदिराजवळच्या बाकड्यावर मी निवांत बसलो होतो.  ७.३० ची आरती झाली होती.  आरतीत सहभागी असलेल्या महिला आजूबाजूच्या बाकड्यांवर येऊन बसल्या होत्या.  तेवढ्यात एक आजोबा  माझ्याजवळ येऊन मला बोलले , "अहो,  मी बसू का इथे? " मी म्हटले,  " अहो काका,  हे काही विचारणं झालं का?  बसा ना !"  आजोबा बसले.  त्यांनी त्यांच्या बहिणीला फोन लावला व फोनवर रडत - रडत त्यांच्या सूनेची गार्हाणी सुरू केली.  " अगं ताई,  मी दादा बोलतोय,  ......आज मला पेन्शन मिळाले पण तिने सगळं काढून घेतलं माझ्याकडून,  ही लोकं रोज मारतात गं मला,  मी काय करु?  .........अगं,  तू पण मला वेडा म्हणतेस,  जग खरोखर इतकं वाईट आहे का गं?  ........ अगं ताई,  मी मरण मागतोहे पण तेही माझ्या भाग्यात नसावं,  मी नको त्या रस्त्यातून अनवानी फिरतो पण मला साप चावत नाही,  मला  मरावसं वाटतंहे पण ........... " असं संभाषण सुरु असतांना आजोबांना हुंदका अनावर होतो व ते पुन्हा मोठ्याने रडू लागले.  त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी त्यांचं सांत्वन केलं. तेव्हा ते शांत झाले . बोलू लागले,  त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे समजले.  पत्नी वियोगाचे सल त्यांना सतावत होतं,  त्यात सूनेचं वागणं - बोलणं त्यांना सोसवत नसावं,  हे लक्षात आलं. ते उत्तम गायक व कवी असल्याचं त्यांनी मला सांगितलं,  'जग हे बंदीशाला ' हे गीत ते गाऊ लागले.  त्यांचं ते गीत ऐकूण मी भारावलो . ते गीत त्यांच्याच आवाजातलं मी मोबाईलमध्ये रेकार्ड केलं आहे .
त्या आजोबांना खरोखरच सूनेचा जाच असेल तर आजोबांचं विव्हळणं रास्त म्हणावं लागेल.  पण आजोबांना पत्नी वियोगाचे दु:ख अनावर झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असल्यानेही आजोबा असे वागत असतील.  काहीही असो पण आज भेटलेल्या आजोबांनी माझ्या मनाला चटका दिला,  हे खास !   माणसाला सत्ता, संपत्ती नसली तरी चालेल पण संतती चांगली पाहिजे.  मुलाच्या जडण- घडणीसाठी या आजोबांनी आयुष्यभर खस्ता खाल्या असतील पण त्यांच्या वाट्याला आज एकाकी व निराधार असल्यासारखं जगणं आलं आहे . याला जवाबदार कोण असेल,  त्या आजोबांचं पुढे कसं होईल असे असंख्य प्रश्न घेऊन मी घरी आलो . हा अनुभव इतरांना सांगावासा वाटला म्हणून लिहलं.  आपणही आजोबा होणार या विचाराची भीती  इथून पुढे कायम माझ्या मनात असेल. 
...................................................

शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

निवडणूक ड्युटी

निवडणूकीच्या कामाचे  आदेश प्राप्त झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंत केंद्राध्यक्षापासून शिपायापर्यंत बुथवरील सर्वच जण टेंन्शनखाली वावरतात.   मी नोकरीला लागल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणूकात केंद्राध्यक्ष म्हणूनच काम केलेले आहे . ती परंपरा कायम टिकवण्यासाठी एप्रिल २०१४ च्या लोकसभा निवडणूक कामाबाबतचा आदेश मिळाला.  केंद्राध्यक्ष व उपकेंद्राध्यक्षांची दोन प्रशिक्षण पनवेलच्या आगरी समाज हाल व के. व्ही . कन्या शाळेत झालीत .
     १७ एप्रिल २०१४ ला  निवडणूक असल्याने १६ तारखेला सकाळी ७ वाजता घरुन निघालो. तालुका बदलून ड्युटी करावी लागणार असल्याने मनाची तयारी झालीच होती. पनवेलच्या कळसेकर कालेजच्या प्रशस्त आवारात निवडणूक कामासाठीचे कर्मचारी जमले होते. प्रत्येकजण सही करुन नेमून दिलेल्या तालुक्याच्या गाडीत जावून बसत होता.  मी उरण बसमध्ये बसलो.  बहुतेक परिचित चेहरे आधीच बसमध्ये  येऊन बसले होते . बसमध्ये अनेक विषय चघळले गेले. तोपर्यंत उरण आले . उरणच्या फुंडे हायस्कूल मधून मतदान यंत्रे  घेऊन नेमून दिलेल्या बुथवर साधारणत: ३ वाजेपर्यंत  आम्ही पोहचलो. बुथ लावून घेतले व ५ वाजता परिसर बघायला बाहेर पडलो.  सोबत उपकेंद्राध्यक्ष श्री राठोड सर व शिपाई होता . रात्रीचे जेवण तलाठी कडून येईल असे सांगितले होते पण रात्री ९.४५ पर्यंत जेवण न आल्याने आम्ही जवळच्या हाटेलात जेवण केले व बुथवर थांबलेल्या महिला पोलिसाला जेवण पार्सल आणले . रात्री एम एस ई बी च्या व्ही आय पी रेस्ट हाऊसमध्ये दोन ए सी  खोल्या  घेऊन एकात महिला पोलिस व दुसर्यात आम्ही तिघं असे झोपलोत .
१७ तारखेला  पहाटे ५ वाजता आम्ही सर्व उठलो.  ६ ते ७ पर्यंत मोकपोल (अभिरुप मतदान)  घेतले .  ३ पक्षांचे तीन मतदार प्रतिनीधींचे समाधान झाल्यावर ६.५०ला  मतदान यंत्र सील केले व मतदारांची वाट पाहत बसलो.  बरोबर ७.०५ ला पहिले मतदार म्हणून एक आजोबा आले . तेथून थेट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्या बुथवर  ५२१ मतदानातून ३३१  म्हणजे ६३.५३ % मतदान झाले . या नंतर उपस्थित सर्व मतदार प्रतिनिधींना १७ सी चे वाटप करुन मतदान यंत्रे व्यवस्थित सीलबंद करुन बसची वाट पाहत थांबलो . ७.२५ ला बस आली . आमचं बुथ जवळच असल्याने अवघ्या ५ मिनीटात आम्ही सबमिशन सेंटरवर (फुंडे हायस्कूल)  पोहचलो.   टेबल नं. २ वर ५ ते ७ मिनीटात सर्व साहित्य जमा केले.  नि घरी पोहचलो.
     या निवडणूकीत उरण तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ बघायला मिळाला.  १६ एप्रिलचं दुपारचं जेवण फुंडे हायस्कूलच्या नव्या इमारतीत होतं पण आमच्या मतदान कर्मचार्यांची गर्दी बघून जेवणाचं कान्ट्रक्ट घेणारे पार गोंधळून गेले. कोणालाही पोटभर जेवता आले नाही.
मतदान साहित्य वाटपात व मतदान झाल्यावर पेट्या जमा करताना अनेकांना ताटकळत ठेवले गेले . महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी इतकेही सुस्त असतात त्याचा अनुभव आधीच्या निवडणूकांत जसा होता त्यापेक्षा या निवडणूकीत जास्तच जाणवले.  असो पुढील निवडणूकीत देव त्यांना सद्बुद्धि देवो.

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

एकेकाचे स्वभाव

'व्यक्ती तितक्या प्रव्रत्ती' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाचे स्वाभिविक वेगळेपण नवा द्रष्टीकोन देणारे  असते,  वेगळ्या स्वाभाविक गुणविशेषांमुळे लक्षात राहिलेल्या दोन  व्यक्तींच्या आठवणी सांगतो. 
 १)   गावातल्या जि. प . च्या शाळेतले एक गुरुजी खूप तापट होते. ते  आम्हाला गणित शिकवायचे . साधी सरळ पध्दत सांगूनही मला काही गणित जमेना तेव्हा ते जाम भडकायचे , हातातल्या छडीने झोडपून काढायचे.  त्याच्या   माराच्या भीतीनेच मी व इतर विद्यार्थ्यांनी गणितात थोडीफार प्रगती साधली.   एकदा ते वर्गातल्या मुलांना घड्याळ शिकवत होते,  शाळेच्या मागच्या बाजूला झाडाखाली रेती टाकली होती तिथे आमचा वर्ग सुरु होता.  गुरुजी खुर्चीवर बसून दोन्ही पाय टेबलावर ठेवून डोक्यावरील टोपी डोळ्यांवर घेऊन झोप काढायचे, मग शिकवायचे . त्या दिवशी त्यांच्या हातातलं घड्याळ काढून ते काटे फिरवत व  एकेकाला जवळ बोलवून विचारायचेत :  त्यांनी मला बोलावले,  दोन तीनदा विचारल्यावरही मला धड सांगता न आल्याने त्यांनी टेबलावरच्या पायाने माझ्या छातीत बक्कदिशी  लाथ मारली,  मी रेतीत दूरवर घसरत गेलो तेव्हापासून पुढे मला घड्याळ नवीन शिकवायची गरजच पडली नाही.  'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' याचा प्रत्यय देतांना ' लातोंका भूत बातोंसे नही समजते ' याही म्हणीची ओळख करून दिली तीही अवघ्या ९ / १० वर्षाच्या वयातच . विद्यार्थ्यांबद्दलची पोटतिडीक व कर्तव्य दक्षता अशा दोन्ही बाबी त्यांच्या स्वभावात होत्या म्हणूनच ते संताप करायचेत  विद्यार्थ्यांबद्दलची काळजी निव्वळ गोड बोलून व्यक्त होतेच असं नाही. संतापातून साधनेकडे नेण्याचा त्यांचा ओढा होता.
   २) झिंगा  दाजी , एक साधा - सरळ माणूस.  सलग पाच सहा वर्षे त्यांच्या सोबत मी वावरलो.  सकाळी भल्या पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कामात मग्न असायचे.  मजूरीवर उदरनिर्वाह असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सर्वसाधारण होती. त्यांना दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.  मुलींची लग्ने होऊन त्याही सासरी गेल्या.  घरात एकटे दाजी उरले , तशाही परिस्थितीत कोणतही दु:ख न व्यक्त करता हा माणूस वयाच्या ७५ वर्षापर्यंत हसत खेळत वावरला.  "ठेविले अनंते तैसेचि राहावे,  चित्त असू द्यावे समाधानी " या संतवचनाचा प्रत्यय त्यांच्या जगण्यातून डोकवायचा.   अतिशय शांत , सोशिक , विनम्र,  प्रामाणिक,  कामसू व दिलदार मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती.   
वरील दोन्ही व्यक्तींच्या स्वभावात दोन विरोधी टोकं होती  पण दोघांच्या  स्वाभाविक वर्तनातून शिकायला मिळालं की माणसाकडे ऐहिक गोष्टी असोत वा नसोत पण त्याचा आत्मिक द्रष्टिकोन जसा असेल तशा पध्दतीने समाजात त्याची प्रतिमा ठरते . आतल्या आवाजाला प्रतिसाद देणारी ही माणसे असावीत म्हणूनच ते अजूनही मनाच्या गाभार्यात आहेत , इतर कित्येक जण मात्र दाट कळोखात गुडूप झाली आहेत . 
........................................................................................................................ 


 

शुक्रवार, १४ मार्च, २०१४

चोर

आज पहाटे (१४ मार्च २०१४) १:३० वाजता काहीतरी ठोकल्याचा आवाज आला . मी मोबाईल  नेटवरुन पुस्तक डाऊनलोड करत असल्याने जागा होतो. आवाजामुळे माझ्या पत्नीलाही जाग आली. तिने हळूच बेडरुमची खिडकी उघडून कानोसा घेतला : आमच्या अल्टो गाडीच्या ड्रायव्हर विंडोची काच फोडली जात असल्याचे तिने पाहिले व मला बोलावले. मी  त्या  चोराला  सनसनीत शिवी हासडली  व तेथेच थांबायला सांगितले पण त्याने हातातला दगड फेकून पळ काढला . एव्हाना माझी  मुले जागी झाली होती. मी तात्काळ खान्देश्वर पोलीस स्टेशनला फोन केला व गाडीजवळ गेलो. गाडीची काच अर्धवट फोडलेली दिसली . तेवढ्यात पोलीस आले : त्यांनी चोराचे वर्णन विचारले व निघून गेले  . शेजारचे गुप्ता आले होते त्यांना घेऊन मी चोराला शोधायला बाईक घेऊन निघालो . सेक्टर ११ चे गार्डन , आतल्या गल्ल्या बघून आम्ही सेक्टर ९ पर्यत पोहचलो आणि स्वप्नील ने (माझा मोठा मुलगा ) मला फोन करुन कळविले की "पोलिसांनी चोराला पकडून आपल्या बिल्डींग जवळ आणले आहे , लवकर या !" मी व गुप्ता परत आलो . काच फोडणारा तो चोर अवध्या १५ ते २० मिनिटात पोलिसांनी डी .ए.व्ही. शाळेजवळून पकडला होता. चोराने गाडीची काच फोडल्याने मी  रागातच होतो. आल्याबरोबर त्या चोराच्या कानाखाली आवाज काढला  नि मग बोललो . चोराने पोलिसांना व मला तो शाव असल्याबाबत सांगायला सुरवात केली . पण त्याचं सगळं थोतांड पोलिसांनी ओळखलं आणि त्यांच्या बाईकवर बसवून चोराला पकडून नेलं .
  सकाळी ११ वाजता खांदेश्वर पोलीस स्टेशनला गेलो . तिथे सूर्यवंशी नावाचे ड्युटी ऑफिसर भेटले , त्यांनी संद्याकाळी ६ नंतर येण्याबाबत सांगितले . पुन्हा मढवी सरांना घेऊन ६ वाजता पोलीस स्टेशनला गेलो . पण चोरासंबंधी माहिती असलेला अधिकारी रात्री ९ वाजता येतील , असे समजले परत यायला निघालो पण सूर्यवंशी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्याने ते थोड्या वेळात पोलीस स्टेशनला येतील म्हणून थांबलो . अर्ध्या तासात ते आले .सतीश पवार  साहेबांना भेटून चोरीच्या उद्देशाने माझ्या गाडीची काच फोडल्याबाबत ची तक्रार मी नोंदवली तेव्हा समजले कि त्या चोराने त्या रात्री दोन दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता , शिवाय त्याच्या कडे लोखंडी हत्यारे सापडली होती .
अवघ्या २० / २२ वर्षाच्या त्या तरुणाकडे ( चोराकडे ) बघून खूप वाईट वाटले . तो कोठेही काहीही कामधंदा करत नाही , पोटासाठी  उमेदीच्या वयात त्याला चोरी - मारी करावी लागते, तो व्यसनी असल्याचे व  घरातील व्यक्ती त्याला कंटाळली आसल्याचे पोलिसांनी सांगितले. आजचे बरेच तरुण वाट चुकत असल्याचे  ऐकून माहित होते , त्याची खात्री पटली. कोर्ट कचेरीची कटकट नको म्हणून पोलीसांनी  त्याच्यावरील गुन्हा रजिस्टर करू नका म्हणून मला सांगितले . शिवाय मढवी सरांना त्या चोराची दया आली ; सर म्हणाले, त्याला पोलीसांनी खूप मारले आहे, अजून त्याला त्रास द्यायला नको म्हणून मी त्याच्यावरील केस मागे घेण्याचा सल्ला सरांनी मला दिला. त्याला रात्रभर पोलीस मारतील म्हणून त्याला सोडायला सांगितले. त्याला सुधारायची संधी देऊ या असे आम्ही दोघांनी 
( मढवी सर व  मी ) ठरवले नि घरी आलोत.


शनिवार, १ मार्च, २०१४

माहितीचा अधिकार

माझे सासरे एम.एस.ई.बी. तून रिडायर्ड झाल्यानंतर तब्बल ३ वर्षापर्यंत त्यांना पेन्शन मिळत नव्हते. मूळ कार्यालयातून नाशिकच्या विभागीय कार्यालयात त्यांनी बरेच खेटे घातले , संबंधित अधिकार्यांना ओल्या आणि सुक्या पार्ट्या दिल्यात ,काहींना रोख पैसे दिलेत पण हे सगळेच खादाड पेन्शनबाबत पाहिजे तेवढे लक्ष घालत नव्हते . " तुमचे प्रकरण हेड आँफिसला पाठवले आहे , होईल , पुढच्या हप्त्याला या , मी तुम्हाला फोन करीन , चिंता करु नका , वरती पैसे द्यावे लागतील इ." कारणे देऊन सासर्यांना  परत पाठवायचे.  ऊबग येईपर्यंत प्रयत्न करुन ते   थकले  व त्यांनी मला फोन करुन त्यांच्या पेन्शन केसबाबत बांद्र्याच्या हेड आँफिसमध्ये चौकशी करायला सांगितले . 
    पेन्शन केसचा नंबर घेऊन मी बांद्रा आँफिस गाठले . आँफिसच्या व्हरांड्यात बरेच आजी - आजोबा निस्तेज नजरेने पाहत बसलेले दिसले. त्यांना त्या कार्यालयात कोणी किती दाद दिली असेल ते देव जाणो . कारण भविष्य निर्वाह मुख्यालयाचा पसार इतका मोठा आहे की माझ्या सासर्याच्या पेन्शन बाबतची चौकशी कोणाकडे करायची हे शोधायला मला १०  मिनिटे फिरावं लागलं . शेवटी संबंधित अधिकार्याला भेटलो. 
  औपचारिकता म्हणून त्या साहेबाला मी नमस्कार केला , पण त्याने लक्ष दिले नाही . त्याच्या हातातला कागद वाचण्यात तो तल्लीन असावा , किंवा ही व्यक्ती खूप कामसू असावी ,असा माझा गैरसमज झाला . मी त्याच्या टेबल जवळ ६ ते ७ मिनिटे ऊभा आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने अनिच्छेने माझ्याकडे पाहत विचारले " बोला , तुमचं  काय ? "         " साहेब , ३ वर्षापूर्वीपासून पेन्शनसाठी प्रकरण पाठवले आहे , अद्याप निकाली निघाले नाही , काय अडचण असेल तर प्लीज बघा ना , हा पेन्शनचा फाईल नं. , नाशिक डिव्हिजनची केस आहे इ. "  माझ्या हातातले कागद न बघता त्याने मला विचारले " पेन्शनर व्यक्ती तुमची कोण ?" मी म्हटले - माझे सासरे ," मग तुम्ही आलात त्या वाटेने परत जा , रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीशिवाय किंवा स्वत: पेन्शनरशिवाय कोणालाच आम्ही माहिती देत नाही."   तो मला अडाणी समजून बोलत राहिला मी ऐकत गेलो व शेवटी विनंती करुन पाहिली पण त्याला माझ्या बोलण्यात काहीही तथ्य नसल्याचे वाटत होते . कारण 'मायेचा' ओलावा त्याला कुठेच दिसेना .  मग माझा संयम सुटला नि मी माझं मूळ रुप त्याला दाखवलं . आता कोडगेपणाने तो ऐकत होता नि मी बोलत होतो.  त्याला त्या दिवशी सुखाची झोप आली नसावी इतकं टाकून मी त्याला बोललो . व त्याचा वरिष्ठाकडे दाद मागायला  गेलो तर त्याचा साहेब कँबीनमध्ये नव्हता . शिपायाला विचारले तर त्याने फक्त खांदे उडवून माहीत नसल्याचं सूचन केलं. या आँफिसमध्ये बोलायचं बील येतं का ? असा खोचक प्रश्न विचारल्यावरही तो बोलला नाही. तसाच अर्धातास उभा राहून साहेबाची वाट बघून कंटाळलो व बाहेर आलो. 
फूलस्केप कागदावर माहिती अधिकारान्वये माहिती मिळण्याबाबत अर्ज केला ,त्या अर्जावर १० रुपयाचे कोर्टफी स्टँम्प चिटकवला ,अर्जाची झेराँक्स काढली व पहिल्या  कोडग्या साहेबाला अर्ज द्यायला गेलो . त्याने अर्ज घ्यायला नकार दिला . नंतर त्या कार्यालयातल्या आवक विभागात अर्ज दिला , झेराँक्सवर पोच घेतली नि बाहेर निघताना सकाळी ११ वाजता व्हरांड्यात बसलेले आजी आजोबा २ तास आशाळभूतपणे तेथेच बसलेले दिसले . खूप वाईट वाटलं , सिस्टमची ,निगरगट्ट   बाबूंची, कामचुकार  अधिकार्यांची  आय- माय  काढावी , त्यांना एकांत बघून बेदम मारावं असं बरचं काही- बाही करावसं वाटलं पण बेगड्या सभ्यतेने मला आवरलं .  एखादं सरकारी कार्यालयातील काम करताना माझ्यासारख्या  शिकलेल्या माणसाला एवढा मानसिक त्रास होतो तेथे अल्पशिक्षित किंवा अडाणी लोकांना किती सोसावं लागत असेल त्याची कल्पना करवत नाही.  हा अनुभव माझ्यासाठी खूप काही शिकवणारा होता . पैसा मिळवण्यासाठी वाट्टेल तशी वागणारी माणसं या व अशा  सरकारी   कार्यालयात मला दिसलीत. असो  . 
१० दिवसांनी मला एक पत्र आले . बांद्रा च्या भविष्य निर्वाह निधी मुख्यालयाने मला कळविले की तुमच्या सासर्याचे पेन्शन प्रकरण पूर्ण झाले असून येत्या पाच दिवसात पेन्शनरच्या बँक खात्यात पेन्शनचा फरक जमा होईल .  रक्ताच्या नात्याशिवाय माहिती देता येत नाही असे म्हणणार्या त्या कार्यालयातील ते पत्र म्हणजे अण्णा हजारेंनी आणलेल्या माहिती अधिकार कायद्याची फलश्रुती म्हणता येईल  .
    ४\५  दिवसात सासर्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा झाल्याची बातमी कळवतांना सासरेबुवांचे हक्काचे पैसे मिळत असतानाही अलभ्य लाभ झाल्याचे समाधान वाटले . 
माहितीचा अधिकार वापरा , भ्रष्ट्राचार थोपवा !