रविवार, २७ एप्रिल, २०२५

पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा

माजी शिक्षण सहसंचालक श्री रोहिदास पोटे यांचे भाषण येथे क्लिक करून ऐका.

*पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धासंपन्न*

ज्ञानसाधना वाचनालय व ग्रंथालय , आनंद ज्येष्ठ नागरिक संघ  नवीन पनवेल व जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने (२३ एप्रिल) पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा घेण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की , जागतिक पुस्तक दिनाचे महत्व लक्षात घेऊन दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र , सेक्टर १४  (सी. के.टी गार्डन) नवीन पनवेल येथे उपरोक्त स्पर्धा आयोजित केलेली होती परंतु पहलगाम येथील भ्याड आतंकवादी हल्यात नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्याच दिवशी त्यांचे पार्थिव नवीन पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी येणार असल्याने दिलीप देसलें यांना श्रद्धांजली अर्पण करून उपरोक्त नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. 
दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा हा रद्द झालेला उपक्रम वरील तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. या स्पर्धेसाठी माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे साहेब , प्रा. संजय पाटील सर , कुडके  सर हे परीक्षक म्हणून तर ज्ञानसाधना वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णकांत अंबोलकर, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन पवार आणि जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय गोरेगावकर आणि मंडळाचे सचिव पूगावकर सर तसेच वाचनालयाचे उपाध्यक्ष रोहिदास पोटे सर, विश्वस्त गोपीनाथ तुळसणकर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपरोक्त स्पर्धेचे  विद्यार्थी वाचक  गट आणि खुला वाचक गट असे दोन गट करण्यात आले होते . या दोन्ही गटात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या कुशल कथन शैलीने त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपली मनोगते अतिशय प्रभावीपणे सादर केलीत. दोन्ही गटातून प्रथम द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी प्रदान करण्यात आलीत. प्रथम द्वितीय आलेल्या स्पर्धकांना स्मृतीचिन्हे आणि पुस्तक तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना पुस्तके पारितोषिक म्हणून भेट देण्यात आलेत. 
दोन्ही गटातील स्पर्धकांचे निकाल खालील प्रमाणे काढण्यात आलेत.
*विद्यार्थी गट*
प्रथम - फातिमा शेख 
द्वितीय - सारा शिर्के 
उत्तेजनार्थ - देवेश दळवी 
*खुला गट*
प्रथम -प्रज्ञा जाधव 
द्वितीय - सारिका दिवेकर 
उत्तेजनार्थ - सानिका कुलकर्णी 

संत रोहिदास विकास मंडळाचे सचिव सुरेश पुगावकर सर  यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आणि आभार प्रकटीकरण  केले. तिन्ही संस्थांचे पदाधिकारी , सदस्य ,स्पर्धेचे परीक्षक , स्पर्धक आणि उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
------वार्तांकन : प्रा. संजय पाटील.------

(जाणीव संस्थेचे संस्थापक श्री. विजय गोरेगावकर यांचेकडून प्राप्त झालेले फोटो येथे प्रदर्शित केले आहेत.) 

रविवार, २३ मार्च, २०२५

जागतिक जल दिनानिमित्त जाणीवची जागृती

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल व रोटरी क्लब ऑफ सनराईज पनवेल या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन (२२ मार्च ) निमित्त पनवेल तालुक्यातील वाकडी या गावात ग्रीन एकर हाउसिंग सोसायटी च्या ४५० फ्लॅट मधील नळ गळती सर्वेक्षण व मोफत दुरुस्ती , सोसायटीतील बोअरवेल चे पुनर्भरण , कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती या विषयावर कृती कार्यक्रम आखण्यात आला होता. 
दिनांक २२ रोजी ग्रीन एकर सोसायटीतील जवळपास सर्वच फ्लॅट मधील नळ सर्वेक्षण करून जेथे आवश्यक होते तेथे मोफत दुरुस्ती करून देण्यात आली . दिनांक २३ मार्च रोजी ग्रीन एकर मधील रहिवाशांसाठी पाण्याचे महत्व व गरज , बोअरवेल चे पुनर्भरण या विषयावर श्री महाजन साहेब ( निवृत्त अभियंता , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ) यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
जाणीव सेवा संस्था  आणि रोटरीचे क्लब ऑफ सनराईज चे विद्यमान अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी कचऱ्यापासून कंपोष्ट कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना उद्बोधन केले. जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ सनराईज चे अध्यक्ष विजय गोरेगावकर आणि दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या  माध्यमातून सिद्ध केले आहे की " समाजाच्या हिताचे काम प्रत्यक्षात करायचे असेल तर जाणिवेची जागृती असेल तरच अनुकूल बदलाचा सनराईज होईल." यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत श्री विजय गोरेगावकर यांनी आपल्या उद्बोधनपर भाषणात म्हटले.
यावेळी ग्रीन एकर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री जगदाळे , जाणीव संस्था आणि रोटरी सनराईज चे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , दोन्ही संस्थांचे  सचिव श्री रुपेश यादव , जाणिवेचे ट्रस्टी श्री आंबेकर , श्री व सौ अक्कलकोटे , श्री जाधव , श्री नाईक , श्री संजय पाटील आणि ग्रीन एकरचे सचिव श्री ........ व्यासपीठावर उपस्थित होते.
 या उपक्रमात ग्रीन एकर सोसायटीतील रहिवाशी यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. शिवाय २३ मार्च रोजीच्या उद्बोधन वर्गात मोठ्या संस्थेने सोसायटीतील महिला पुरुष सदस्य उपस्थित होते.
----- वार्तांकन : प्रा. संजय पाटील...