सुधागड विद्यासंकुल चे ज्युनियर कॉलेज कळंबोली , येथील उप प्राचार्य श्री सुनील प्रल्हादराव पाटील हे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती समारंभात वेळेचे नियोजन लक्षात घेता माझ्या भावना मला प्रत्यक्ष मांडता येणार नसल्याने त्यांच्याबद्दल माझे मनोगत येथे नोंदवत आहे.
सुनील पाटील सर ( एस. पी. पाटील ) यांचा आणि माझा परिचय तसा १५ - २० वर्षांपासूनचा जुना आहे . सप्टेंबर २०२३ पासून कळंबोली येथे माझी बदली झाल्यापासून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आला आणि परिचयाचे रूपांतर मैत्रीत कधी झाले ते समजलेच नाही. सुनील पाटील यांचा मितभाषी स्वभाव मला खूप भावला. कधीही कोणावरही चिडचिड न करता अतिशय सौम्य भाषेत समोरच्या व्यक्तीच्या मनात उतरण्याची त्यांची हातोटी वाखण्यासारखी आहे. सुधागड विद्यासांकुल कळंबोली येथील कोणताही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी एस. पी. पाटील यांचेबद्दल बोलतांना आवर्जून सांगतो - "एस. पी. पाटील म्हणजे राजा माणूस!" राजा माणूस म्हटल्यावर राजेचे मनाचं भलपण , उदार दृष्टिकोन , अपार सहिष्णुता , भूतदया , कमालीची शांतता आणि विशाल विनम्रता हे सगळेच गुण पाटील सरांच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक विशेष म्हणता येतील. विनम्रता हा ही त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण मला फार आवडला. या पंधरा वीस वर्षात ते मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा 'काय संजु दा' अशी आपुलकीची हाक त्यांच्या मनाचा विनम्रपणा जाणवून देत असते. सुधागड ज्युनियर कॉलेज येथे उप प्राचार्य पदावर ते विराजमान असतानाही पदाचा गर्व किंवा अहंकार कधीच त्यांच्या वागण्या - बोलण्यातून डोकावला नाही. कॉलेजमधील कोणालाही कोणतेही काम सांगताना ते अतिशय समंजस पणे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांनी सांगितलेले काम आवडीने करावीत असे प्रत्येकाला वाटते. इतरांच्या गुणांचे कौतुक करण्याचे , त्यांना प्रोत्साहन देण्याचे पाटील सरांचे कौशल्य हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील खास विशेष गुण म्हणता येईल. मुंबई विभागीय शिक्षण मंडळात मी मराठी विषयाचा मुख्य नियामक झालो त्यावेळी मी बांठीया शाळेत नोकरी करत होतो तेव्हा त्यांनी मला आपुलकीने फोन करून माझे अभिनंदन केले. मी १२ वी मराठी विषयाचे ब्लॉग लेखन करतो हे त्यांना जेव्हा समजले तेव्हाही त्यांनी त्या ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदवली आहे - " संजू दा , keep it up". इतरांच्या कामाचे कौतुक करताना पद , प्रतिष्ठा आणि पैसा अशा क्षणभंगुर गोष्टींना दुय्यम समजणारी माणसे मनाच्या कप्यात कायम विसावतात त्यापैकी सुनील पाटील माझ्या मनाच्या कप्यात स्थिरावले आहेत. त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा हेच त्यांच्या माझ्या मैत्रीचे खरे गुपित आहे. भपकेबाज पणा त्यांना कधी आवडला नाही. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असलेली माणसं इतरांसाठी आदर्श ठरतात तसे सुनील पाटील माझ्यासह कित्येकांचे आदर्श आहेत.
सुनील पाटील सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आणि आम्हा पती - पत्नीचे आमचे एकमेकांच्या घरी येणे जाणे अनेकदा घडले आहे. प्रत्येक भेटीत या गोड जोडीचा स्नेह , जिव्हाळा , आपुलकी हमखास दिसली. त्यांच्या कन्येच्या विवाह निमित्त निमंत्रण द्यायला ते जोडीने आलेत तेव्हाही नातलागांमध्ये जसे सलगीचे बोलावणे असते तो भाव त्या निमंत्रणात दडलेला होता ; लग्नाला जाणे क्रमप्राप्तच होते. निमंत्रण निमित्त होते पण आस्थेवाईक चौकशी करणे , भेटी गाठी घेणे हे या जोडप्याला आवडते.
३१ ऑगस्टला सुनील प्रल्हादराव पाटील अर्थात आमचे एस. पी. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होताहेत. त्या औपचारिक कार्यक्रमाच्या आधी त्यांच्याबद्दल ज्युनियर कॉलेज स्टाफ मधील सहकाऱ्यांना आपल्या भावना व्यक्त करता याव्यात म्हणून माझ्या आग्रहास्तव कळंबोली ज्युनियर कॉलेज मध्ये एक छोटेखानी अनौपचारिक कार्यक्रम आम्ही घडवून आणला. 'पदभार हस्तांतरण' असे रुक्ष नाव जरी त्या कार्यक्रमाचे होते तरी तो कार्यक्रम म्हणजे ' स्नेह वृध्दी' समारंभ ठरला. सुनील पाटील सरांचा वाढदिवसाचे निमित्ताने या कार्यक्रमाची आखणी केलेली होती म्हणून त्यांनी सर्व ज्युनियर कॉलेज शिक्षक - शिक्षकेतर सहकाऱ्यांना चहा नाश्ता ची व्यवस्था केलेली होतीच. त्यावेळी पाटील सरांनी भाषण केले त्या भाषणात आपल्या सहकाऱ्यांबद्दलचा स्नेह , आपुलकीचा भाव अधिक स्पष्ट जाणवला.
अशा या दिलखुलास मित्राला सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे , समाधानाचे , निरोगी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. "निवृत्ती हे तर मध्यंतर - पाटील सर कार्यरत राहावेत निरंतर" अशा मनःपूर्वक सदिच्छा माझ्या परिवाराकडून त्यांना देतो नि माझ्या भावनांना विराम देतो.
---- श्री. संजय माधवराव पाटील --------
सरांच्या स्वभावाचे अतीशय समर्पक विवरण.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाउत्कृष्ठ
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा