शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२६

सुधागड संस्थेचे केवाळे हायस्कूल मध्ये सायकल बँक : जाणीव आणि रोटरी संस्थांना थँक्स !

सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकासाची सांगड घालत जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांनी एकत्र येऊन एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये विनावापर पडून असलेल्या सायकलींचे संकलन व दुरुस्ती करून त्या गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमांतर्गत, आज (२० नोहेंबर २०२६)   पहिल्या टप्प्यात सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या केवाळे विद्यालयात सहा सायकली शाळेकडे सुपूर्द करून 'सायकल बँक' उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
       ​हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता, चक्रीय संसाधन व्यवस्थापन या तत्त्वावर आधारित आहे.
​    सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही संस्थांच्या काही सदस्यांनी आपल्या ओळखीच्या मित्रांच्या सहाय्याने त्यांच्या गृहनिर्माण संस्थांना आवाहन करून वापरात नसलेल्या सायकली जमा करण्यात आल्या. या सायकलींची तपासणी करून आवश्यक ती पूर्ण दुरुस्ती करून या सायकली पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्यात आल्या.
​      दुरुस्त केलेल्या सायकली थेट शाळेच्या 'सायकल बँके'कडे सुपूर्द करण्यात आल्या. शाळेने पारदर्शक व गरजेनुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना या सायकली आजच्या कार्यक्रमात वितरित केल्या.
​       संबंधित विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत या सायकलीचा वापर करायचा असून, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सायकली पुन्हा शाळेकडे परत करायच्या आहेत. त्यामुळे एकाच संसाधनाचा लाभ पुढील पिढीतील नवीन गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मिळू शकेल.
​आज, २० नोव्हेंबर रोजी केवळे विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत सहा सायकली शाळेच्या सायकल बँकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने जाणीव सामाजिक सेवा संस्था तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या या पुढाकाराचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
​    आजच्या सहा सायकली आपले विश्वस्त खडताळे साहेब, आंबेकर साहेब आणि विजय गोरेगावकर (माझ्या) ओळखीतून प्राप्त झाल्या होत्या. यापुढेही आपला हा उपक्रम सुरू राहणार असल्याने आपण सदस्यांनी आपल्या परिचयाद्वारे अशा विनावापर पडून असलेल्या सुस्थितीतील सायकली देणगी म्हणून मिळत असतील तर घ्याव्यात.त्या योग्य पद्धतीने पूर्ण दुरुस्ती करून पुढच्या टप्प्यात अजून या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शाळेच्या सायकल बँकेला देता येतील. 
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे सोबत आपल्या माहितीसाठी पाठवित आहे.
वार्तांकन : श्री विजय गोरेगावकर ( अध्यक्ष : जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल )

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा