सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

शांतीवनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सूर संध्या कार्यक्रमाचे आयोजन*

*शांतीवनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सूर संध्या कार्यक्रमाचे आयोजन*
      
 जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेलच्या वतीने कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्रीचे औचित्य साधून २८ सप्टेंबर रोजी मराठी हिंदी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सूरसंध्याचे आयोजन करण्यात आले होते.
      या कार्यक्रमात जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सदस्य आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तसेच इतर सहयोगी गायकांनी तबला आणि हार्मोनियमच्या साथीने मराठी हिंदी गीते सादर केली.  दोन तासाच्या या कार्यक्रमात शेवटच्या अर्ध्या तासात कराओके वर हिंदी गीतेही सादर करण्यात आली. 
        या कार्यक्रमास वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी समरस होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला.  या कार्यक्रमास कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर हे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जाणीव ठेवून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी जाणीव परिवाराचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या वेळी जाणीवचे सदस्य आपल्या परिवार आणि मित्र मंडळीसह उपस्थित होते. 
        या कार्यक्रमासाठी तबल्यावर साथ विनायक प्रधान सर यांनी तर हार्मोनियमवर साथ सौ पद्मजा जोशी मॅडम यांनी देऊन जाणीव संस्थेस सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जाणीवच्या प्रकल्प संचालिका प्रतिमा जाधव यांनी केले होते. 
     या कार्यक्रमाचे अतिशय सुन्दर पद्धतीने आणि आपल्या खास शैलीत प्रा. प्रद्न्या जाधव लातूरकर यांनी केले. 
       जाणीवला सामाजिक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या मधुरा तायडे यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला तसेच विनायक प्रधान सर, सौ पद्मजा जोशी मॅडम आणि ॲड प्रमोद ठाकूर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जाणीव परिवारातील राजेंद्र जाधव, रुपेश यादव, सौ अरुणा खडताळे, सौ वनिता गोरेगावकर, प्रतिमा जाधव 
इतर सहयोगी गायिका 
ॲड सुजाता टेकळे, कु आद्या टेकळे
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाणीवचे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी केले तर सचिव रुपेश यादव यांनी आभार व्यक्त केले. 
       ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून फळे आणि खाऊ भेट देऊन हा सूरसंध्या कार्यक्रम संपन्न झाला.
- वार्तांकन : श्री. विजय गोरेगावकर --
पनवेल नगरी ब्लॉग पेजवर श्री राजू गाडे यांनी वरील बातमीला प्रसिद्धी दिलेली आहे 
 

रविवार, २९ जून, २०२५

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या सेवाभावी संस्थेचा तिसरा वर्धापन दिन शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता युसुफ मेहरअली सेंटर , तारा येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जाणीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , सचिव श्री रुपेश यादव , खजिनदार श्री बोपटे , जाणीव संस्थेचे सर्व ११ विश्वस्त , त्यांचे परिवारातील सदस्य असे एकूण ३६ सदस्य या समारंभासाठी शनिवारी दुपारी ३ वाजता तारा येथे आपल्या खाजगी वाहनाने पोहचले. सायंकाळी ५ वाजता सर्व उपस्थित सदस्यांची आपापसात ओळख परिचय झाल्यावर सर्वांना सेंटर वरील कॅन्टीन मध्ये चहा नाष्टा देण्यात आला. 
शनिवारी सायंकाळी ६ वाजता जाणीव संस्थेच्या वर्धापन दिन सोहळा जाणिवेचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला. जाणिवेचे सचिव श्री रुपेश यादव यांनी सभेला सुरुवात करताना गेल्या वर्षी विविध अप्रिय घटनांमध्ये मृत्युमुखी झालेल्या , शहीद झालेल्या देशातील विविध क्षेत्रातील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली.
जाणीव संस्थेच्या गेल्या वर्षीच्या शांतीवन पनवेल येथे झालेल्या वार्षिक सभेचा इतिवृत्तांत श्री रुपेश यादव यांनी वाचून त्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून एकूण १७ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आलेत. त्या सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे एकूण ६५ हजार रुपये खर्च झालेत.गेल्या वर्षभरात संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या एकूण चार सभा घेण्यात आल्यात. संस्थेचा गेल्या वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल यावेळी मंजूर करून सर्व सभासदांना देण्यात आला.त्यानंतर संस्थेचा गेल्या वर्षाचा लेखा परीक्षण अहवालाचे वाचन संस्थेचे खजिनदार श्री. बोपटे यांनी वाचून त्या अहवालाला मंजुरी देण्यात आली. संस्थेचे गेल्या वर्षी लेखा परीक्षांचे कामकाज पाहणारे लेखा परीक्षक यांनाच आर्थिक वर्ष २५_२६ चे लेखा परीक्षांचे कामकाज पाहण्यास मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या आर्थिक वर्ष २५_२६ च्या अंदाजपत्रकात विविध उपक्रमांसाठी एकूण ७० हजार रुपये खर्चासाठी मंजुरी देताना संस्थेचे आठ उद्दिष्टे आहेत म्हणून आर्थिक वर्ष २५_२६ मध्ये प्रत्येक उद्दिष्टांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे एकूण ८० हजार रुपये अंदाज पत्रकता घेण्यात यावेत अशी सूचना करण्यात आली व त्यास मंजुरी देण्यात आली.
जाणीव संस्थेच्या मुदत ठेवीची मुदत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. 
आयत्या वेळच्या विषयात संस्थेच्या रितीरिवाजाप्रमाणे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्ती म्हणून योगिनी वैदू यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल सन्मानचिन्ह बहाल करून गौरवण्यात आले तर संस्थेचा दोन आजीव सदस्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यात श्री संजय पाटील यांना सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे  उपप्राचार्य पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल तर सौ. रंगारी मॅडम  यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात  एक्झिक्युटिव्ह  इंजिनियर पदावर बढती मिळाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.  

रविवार, २७ एप्रिल, २०२५

पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा

माजी शिक्षण सहसंचालक श्री रोहिदास पोटे यांचे भाषण येथे क्लिक करून ऐका.

*पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धासंपन्न*

ज्ञानसाधना वाचनालय व ग्रंथालय , आनंद ज्येष्ठ नागरिक संघ  नवीन पनवेल व जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने (२३ एप्रिल) पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा घेण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की , जागतिक पुस्तक दिनाचे महत्व लक्षात घेऊन दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र , सेक्टर १४  (सी. के.टी गार्डन) नवीन पनवेल येथे उपरोक्त स्पर्धा आयोजित केलेली होती परंतु पहलगाम येथील भ्याड आतंकवादी हल्यात नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्याच दिवशी त्यांचे पार्थिव नवीन पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी येणार असल्याने दिलीप देसलें यांना श्रद्धांजली अर्पण करून उपरोक्त नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता. 
दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पुस्तक वाचा : मनोगत सांगा स्पर्धा हा रद्द झालेला उपक्रम वरील तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. या स्पर्धेसाठी माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे साहेब , प्रा. संजय पाटील सर , कुडके  सर हे परीक्षक म्हणून तर ज्ञानसाधना वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णकांत अंबोलकर, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन पवार आणि जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय गोरेगावकर आणि मंडळाचे सचिव पूगावकर सर तसेच वाचनालयाचे उपाध्यक्ष रोहिदास पोटे सर, विश्वस्त गोपीनाथ तुळसणकर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपरोक्त स्पर्धेचे  विद्यार्थी वाचक  गट आणि खुला वाचक गट असे दोन गट करण्यात आले होते . या दोन्ही गटात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या कुशल कथन शैलीने त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपली मनोगते अतिशय प्रभावीपणे सादर केलीत. दोन्ही गटातून प्रथम द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी प्रदान करण्यात आलीत. प्रथम द्वितीय आलेल्या स्पर्धकांना स्मृतीचिन्हे आणि पुस्तक तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना पुस्तके पारितोषिक म्हणून भेट देण्यात आलेत. 
दोन्ही गटातील स्पर्धकांचे निकाल खालील प्रमाणे काढण्यात आलेत.
*विद्यार्थी गट*
प्रथम - फातिमा शेख 
द्वितीय - सारा शिर्के 
उत्तेजनार्थ - देवेश दळवी 
*खुला गट*
प्रथम -प्रज्ञा जाधव 
द्वितीय - सारिका दिवेकर 
उत्तेजनार्थ - सानिका कुलकर्णी 

संत रोहिदास विकास मंडळाचे सचिव सुरेश पुगावकर सर  यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आणि आभार प्रकटीकरण  केले. तिन्ही संस्थांचे पदाधिकारी , सदस्य ,स्पर्धेचे परीक्षक , स्पर्धक आणि उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
------वार्तांकन : प्रा. संजय पाटील.------

(जाणीव संस्थेचे संस्थापक श्री. विजय गोरेगावकर यांचेकडून प्राप्त झालेले फोटो येथे प्रदर्शित केले आहेत.) 

रविवार, २३ मार्च, २०२५

जागतिक जल दिनानिमित्त जाणीवची जागृती

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल व रोटरी क्लब ऑफ सनराईज पनवेल या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन (२२ मार्च ) निमित्त पनवेल तालुक्यातील वाकडी या गावात ग्रीन एकर हाउसिंग सोसायटी च्या ४५० फ्लॅट मधील नळ गळती सर्वेक्षण व मोफत दुरुस्ती , सोसायटीतील बोअरवेल चे पुनर्भरण , कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती या विषयावर कृती कार्यक्रम आखण्यात आला होता. 
दिनांक २२ रोजी ग्रीन एकर सोसायटीतील जवळपास सर्वच फ्लॅट मधील नळ सर्वेक्षण करून जेथे आवश्यक होते तेथे मोफत दुरुस्ती करून देण्यात आली . दिनांक २३ मार्च रोजी ग्रीन एकर मधील रहिवाशांसाठी पाण्याचे महत्व व गरज , बोअरवेल चे पुनर्भरण या विषयावर श्री महाजन साहेब ( निवृत्त अभियंता , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ) यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
जाणीव सेवा संस्था  आणि रोटरीचे क्लब ऑफ सनराईज चे विद्यमान अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी कचऱ्यापासून कंपोष्ट कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना उद्बोधन केले. जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ सनराईज चे अध्यक्ष विजय गोरेगावकर आणि दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या  माध्यमातून सिद्ध केले आहे की " समाजाच्या हिताचे काम प्रत्यक्षात करायचे असेल तर जाणिवेची जागृती असेल तरच अनुकूल बदलाचा सनराईज होईल." यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत श्री विजय गोरेगावकर यांनी आपल्या उद्बोधनपर भाषणात म्हटले.
यावेळी ग्रीन एकर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री जगदाळे , जाणीव संस्था आणि रोटरी सनराईज चे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , दोन्ही संस्थांचे  सचिव श्री रुपेश यादव , जाणिवेचे ट्रस्टी श्री आंबेकर , श्री व सौ अक्कलकोटे , श्री जाधव , श्री नाईक , श्री संजय पाटील आणि ग्रीन एकरचे सचिव श्री ........ व्यासपीठावर उपस्थित होते.
 या उपक्रमात ग्रीन एकर सोसायटीतील रहिवाशी यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. शिवाय २३ मार्च रोजीच्या उद्बोधन वर्गात मोठ्या संस्थेने सोसायटीतील महिला पुरुष सदस्य उपस्थित होते.
----- वार्तांकन : प्रा. संजय पाटील...