मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

एकांगी विचार

मी माझ्या सहकारी मित्रांसोबत काँलेजच्या मैदानातील उनाड पोरांना हटकत  होतो. ११ वी १२ वी ची मुलं थोडी बेफिकीर असतात म्हणून त्यांना वेळीच सावरावं लागतं: अन्यथा या वयातली मुलं  वाहवत जातात हा टिपीकल  मास्तरी  विचार करत आम्ही या पोरांना शिक्षणाचे फायदे सांगत सांगत वर्गात जाण्याबाबत आग्रह करत होतो. तेवढ्यात त्यातल्या एकाने मला प्रश्न केला  " तूम्ही शिकून काय कमवलं हो सर ? " मी एका  शब्दात त्याला म्हटलं : " समाधान !"  तो विक्षिप्त  हसला .  माझ्याकडे बारकाईने न्याहळत बोलला - " कुठे दिसत तर नाही ते , कसं असतं हे समाधान ..... " मी त्याला लांबलचक उपदेश करता करता म्हटलं - अरे , ते मानन्यावर असतं . तो अजूनही माझ्या जुनाट विचारांना मानायला तयार नब्हता ,   मास्तरांचं बोलणं पोचट असतं हा त्याचा दूषित ग्रह मला अस्वस्थ करून गेला .
   या वयातली बहुतेक मूलं असा विचार का करत असावीत ?  त्यांना नेमकं काय करावसं वाटतं ? शिक्षक खरोखर जुनाट व पोचट विचाराचे असतात का ? अशा  कितीतरी अनुत्तरीत प्रश्नांचा गुंता सोडवता सोडवता असे लक्षात येते की आजची मुलं जो विचार करतात त्या विचारांना आपण विकार समजतो, त्यांच्या सुख समाधानाच्या कल्पना आपल्या मते स्वैराचार ठरतात . मुलांच्या आचार -  विचारात जे बदल दिसतात  ते आपल्याला पटत नसले तरी त्यांना हवं असलेलं प्रेम,सहकार्य,सहानुभूती आणि संस्कार कमी झाल्यामुळेच ही मुलं असे एकांगी विचार करत असावेत असं मला वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा