शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

आजीचे धाडस

माणसं  माणसांमध्ये माणसाप्रमाणे वागत नसल्याची अनेक उदाहरणं आपण दररोज अनुभवतो . काही दिवसांपूर्वी असाच एक अनुभव आला . डोंबिवली एस.टी.त नेहमीप्रमाणे गर्दी असल्याने मीही धावपळ करुन बस मध्ये चढायचा केविलवाना प्रयत्न करत होतो. तेवढ्यात एका आडदांड माणसाने हातातल्या बँगेने गर्दीतल्या लोकांना फटके देत चढाई करायला सुरवात केली. माझ्या सकट अनेकांना  त्याचे फटके खावे लागलेत . पण कोणीही त्या रानटी माणसाला विरोध करत नव्हते. त्याच गर्दीतल्या एका आजीने मात्र त्याच्या थोबाडीत ठेवून दिली आणि गर्दीतल्या लोकांनी आजीकडे 'अजि म्या ब्रम्ह पाहिले' असे पाहिले. ज्याला त्याच्या आडदांड पणाचा तोरा होता तो तर गपगारच झाला. मग आजीने त्याला जे ऐकवले ते ऐकून बसमधील सर्वांना नवल  वाटले . आजी त्याला म्हटली : " अरे , तू माणूस आहेस की हैवान , तुला माणूसपाणाची थोडीशीही चाड शिल्लक असेल तर माणसासारखा वाग ना ,  तुला काय वाटतं की तू खूप शौर्य गाजवतो आहेस का? , अरे ,भल्याभल्यांना त्यांचा गर्व सोडावा लागला , रावणाचा शेवट कसा झाला माहीत आहे ना .. माणूस बनून वागलास तर मान मिळेल नाहीतर शेण मिळेल "
  आजीचं बोलणं संपताच त्याने आजीचे पाय धरले .तो ओशाळून उभा राहिला . त्याच्या कृत्याची त्याला लाज वाटली . त्या दिवशीच्या आजीत मला  झाशीची राणी दिसलीच पण त्या सोबत मदर तेरेसाची कनवाळू भूमिकाही जाणवली. अशा आज्या आहेत म्हणून  समाजाचे  संतुलन राखून आहे ;अन्यथा माणसं आणि जनावरात फारसा फरक दिसणार नाही. त्या अनामिक आजीला हा मानाचा मुजरा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा