शनिवार, ४ जानेवारी, २०१४

दुर्भाग्य

तीन वर्षापूर्वी  आमच्या  सोसायटीत एक पारशी  कुटुंब  भाडेकरू  म्हणून  राहायला  होते.  कुटुंब प्रमूख इस्पातमध्ये नोकरीला तर त्यांची पत्नी ग्रुहिणी.त्यांचा एकुलता एक मुलगा त्यावर्षी १० वीला होता .सूखी  ,आनंदी व  वैभव संपन्न असा   परिवार . पण  या  कुटुंबाची     एक  दुखरी किनार  होती. ते मूळचे पनवेलचेच असल्याने त्यांचे सर्व नातलग आसपास राहत असूनही कोणीही त्यांच्याकडे येत जात नव्हते.कौटुंबिक वाद असल्याने ते नाराज असल्याचं बाईच्या ( भाभी ) बोलण्यातून जाणवायचं. या भाभी स्वभावाने सालस , परोपकारी आणि चांगल्या सुगरण असूनही त्यांच्याशी नातलगलांचे का पटत नसावे हे कोडेच होते. असो.
     अशा या सुखी आणि गोड परिवारात एक  दिवस  अचानक  एक  मोठं  संकट उद्भवलं .कुटुंब प्रमुखाला लकवा झाला . त्यांचे हातपाय लुळे पडले , वाचा बोबडी झाली नि त्यांनी अंथरुण धरले. भाभीचं अवसान गळून गेलं , मुलाला काय करावे ते सूचेना . बरेच डाँक्टर झाले , सगळ्या प्रकारच्या   औषधी झाल्यात पण काही उपयोग होत नव्हता . भाभीला कोणीतरी सांगितले की कबुतराच्यां  ताज्या रक्ताने पेशंटच्या हातापायाला चोळले तर चांगला फायदा होईल .  भाभीने अनेकांकडे चौकशी करुनही  कबुतरं  काही  मिळेनात .  नवरा लवकर बरा व्हावा म्हणून भाभीची  आंतरिक धडपड आम्हाला दिसायची. 
एके   दिवशी भाभी आमच्याकडे आल्या नि कबुतर मिळत नसल्याबाबत दुःख व्यक्त केलं . आम्ही त्यांना धीर देत म्हटले - " काही काळजी करु नका , आम्ही प्रयत्न करतो ."  भाभीला दिलेल्या शब्दाखातर  शाळेतल्या शिपायाला सागून त्याच्या गावातील मुलाकडून एक कबुतर मिळवलं .  भाभीला खूप  बरं वाटलं , पेशंटचा  चेहरा उजळला , त्यांचा मुलगा समाधानी झाला.  मलाही बरं वाटलं. एका कबुतराच्या बलिदानाने त्या कुटुंबात आशेचा किरण उगवला होता.  यासारखे अनेक उपाय  जवळपास दोन वर्ष सुरु होते . यासाठी  त्यांचा खूप खर्च झाला   ; कर्ज झालं   , शिवाय नोकरी  सोडावी लागली .  पण भाभीने    हार मानली नाही . त्या सतत प्रयत्न करत राहिल्यात . मनापासून  तळमळ  असेल  ,  जिव्हाळा  असेल तर जिवघेणी संकटं परतवून लावता येतात हे भाभीच्या अथक प्रयत्नांनी सिध्द केलं . दहा  व्यवहारी नातेवाईकांपेक्षा एकच  भावनिक  साथीदार  हवा !
   भाभीचे यजमान आज चालू फिरु लागले आहेत . काही दिवसात ते पुन्हा नोकरी किंवा व्यवसाय करु शकतील आणि गतवैभव पुन्हा येईल अशी सदिच्छा आपण करु या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा