बुधवार, ८ जानेवारी, २०१४

नात्यांची दिवाळखोरी

१० वर्षांपूवी  दिवाळीच्या  सणाला आपुलकीचा , स्नेहाचा लख्ख प्रकाशदिवा  घराघरात दिसायचा , नात्यानात्यांतील माधुर्याचा फराळ ताटभर वाढला जायचा , वसुबारस पासून सुरू होणाऱ्या दिवाळसनाला गाई वासराच्या पूजनात पशुधनाबद्दलचे वात्सल्य डोळ्यात साठायचं .सडा सारवण झालेली घरे आणि आंगणे रंग - रांगोळीने  गोजिऱ्या लेकरसारखी निरपेक्ष हसायची ! धन त्रयोदशीला पंजोबांच्या काळापासून जपून ठेवलेली नाणी पाटावर विराजमान व्हायची , घरातील पोक्त माणसांपासून लहान लेकरांपर्यंत सगळेच धनाचे मांगल्यपूर्वक पूजन करायचे. दिवाळीसाठी आवर्जून खरेदी केलेली कापडं अंगभर नेसलीली दिसायची. पावित्र्य ,मांगल्य, शुचिर्भूतता यांचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच्या दिवसात आनंदाचं उधाण आलेलं दिसायचं ! कमालीची गरिबी असतानाही अल्पशा गोष्टीत आभाळभर समाधान हृदयात वसायचं !साधी भोळी माणसं देवासारखी होती म्हणूनच  सोज्वळ अगत्य दिसायचं  ! नात्यानात्यातील भावबंधन  निर्मळ, निरहंकारी  सुताने घट्ट  विणल जायचं ! थोडक्यात पूर्वीच्या सणात किंवा समारंभात प्रत्येक माणूस  माणुसपणाचं जगणं जगायचा ! नाती गोती मनपूर्वक जपायचा !
   काळ बदलत गेला आणि माणूस काळानुरूप बदलला . पद , पैसा , प्रतिष्ठा पणाला लागू नये म्हणून माणूस माणसापासून दुरावला गेला. खोटा गर्व , कमालीचा अहंकार आणि बेगडी भाव भावनांचं उथळ प्रदर्शन सुरू झालं! आर्थिक सुबत्ताच्या हव्यासापोटी लालच वाढतच गेली नि विश्वास हा शब्द पांगळा बनून गेला. पराकोटीचा द्वेष , जीवघेणी ईर्षा , सूड उगवण्याचं जहरी षडयंत्र यात नाती चिरडली गेली . माणूस हैवाण बनला . आजी - आजोबा , आई - वडील, पती - पत्नी , भावा - बहिनीतील रक्ताच्या नात्यांमधील ओलावा दिवसागणिक आटत गेला नि भावगर्भित असणारी  नाती रुक्ष बनली. कधी दोन  भाऊ  रक्ताचे नाते विसरुन एकमेकांच्या जीवावर उठतात तर कधी नवरा बायकोतील शुल्लक वाद घटस्फोट घडवतात. जिवाभावाची माणसं एकमेकांपासून एवढी दुरावतात की मरेपर्यंत एकत्र येत नाहीत. बहीण भावाचं स्नेहाचं नातं कोर्ट कचेरीत ओढलं गेलं नि काटेरी बनलं .एकत्र कुटुंब ही संकल्पना हद्दपारच झाली . वृद्धाश्रमात गेलेले आई बाबा दसरा - दिवाळीतही आठवत नाहीत इतकी निष्ठुरता वाढली. परदेशी गेलेल्या अपत्यांची आस मनात जागवत कित्येक थिजल्या डोळ्यांनी विरह वेदना सोसत मरण कवटाळलं ! 
   कधीकाळी आनंदाचं उधाण आणणारी दिवाळी , विशुद्ध नाते जपणारी दिवाळी, सुख- शांती - समाधान- स्नेहभाव प्रदान करणारी दिवाळी पुन्हा घराघरात नांदो आणि नाती सदृढ होवोत म्हणून  विधात्याने माणसांच्या कोत्या मनाचं , हलकट - हावरट स्वभावाचं, निष्ठुर निर्दयी पणाचं दिवाळ काढावं !

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा