सोमवार, १३ जानेवारी, २०१४

उमरठ

१५ वे कोकण मराठी साहित्य संमेलन दि. १० ते १२ जानेवारी २०१४ दरम्यान महाड  येथे संपन्न झाले . ११ जानेवारी ला सांयकाळी ५ वाजता आम्ही तेथे पोहचलो. तेव्हा कवी संमेलन सुरु होते. प्रतिष्ठीत कवींच्या कविता  सादर होत होत्या . नाशिकच्या नामांकित काँलेजच्या प्राचार्या सौ . देशमुख मँडमने स्त्री भ्रुण हत्या या ज्वलंत विषयावर सादर केलेली कविता मनाला चटका लावून गेली. तर  'चोर'  या  विडंबन कवितेने  हसवत  हसवत वास्तवाचे  फटके दिले  , किशोर सोमन यांचे सूत्रसंचालन अप्रतिम होते. रात्री ९ ते १२ पर्यंत शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी गीतांचा सुंदर कार्यक्रम मराठीतील आघाडीचे सिनेकलाकार सुबोध भावे  व ....... यांनी सादर केला.
    १२ जानेवारीला निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होता परंतु  आम्हाला उमरठ या गावाला जायचे असल्याने अप्पांचे निरुपण आम्हाला ऐकता आले नाही. असो.
     उमरठला आम्ही मढवी सरांच्या मानलेल्या बहिणीला भेटायला गेलो होतो. सरांचे मोठे भाऊ : दादा ,नोकरीसाठी उमरठला असतांना ज्यांच्या घरात राहायचे ते घर आणि त्या घरातील व्यक्तींना मढवी  परिवार आजही विसरले नाहीत ; हे विशेष वाटलं. ज्या आजींना भेटण्यासाठी आम्ही उमरठ गेलो त्या आजी  वयोमानामुळे खूप थकल्या आहेत, आजीचा मुलगा आणि सून मुंबईला  असल्याने आजी एकट्याच राहतात. आम्ही गेलो तेव्हा आजी अंगण झाडत होत्या. पाठीला पोक आल्याने आजी वाकून चालतात तरीही आजींनी आम्हाला पाणी आणून दिलं. शिवाय जेवणासाठी आग्रह करु लागल्या .म्हातारपण ,एकाकीपण असूनही आजीची पाहुण्यांबद्दलची आस्था बघून मी भारावलो. मढवी परिवाराने जे नातं जपलय त्याचा पोत लक्षात आला. रक्ताचं नातं सहज विसरणार्या आजच्या काळात हे नातं खूप गहीरं आहे, असं जाणवलं . सख्या बहिणीला भावाबद्दल अंत:स्थ जिव्हाळा असावा तसं आजीचं मढवी  सरांशी बोलणं सुरु होतं . आजीच्या घरासमोरच विठ्ठल मंदीर आहे 'दर्शनाला जाऊन या' असं आजी बोलल्या नि आम्ही मंदिरात गेलो. मी कधीही कोणत्याही देवाकडून काहीच मागत नाही पण त्या दिवशी विठ्ठलाला मनोभावे एक प्रार्थना केली की आजीला  निरोगी , समाधानी व सुखी मरण येऊ दे!
    आजीचा निरोप घेऊन आम्ही तानाजी मालुसरे यांचं स्मारक बघायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रामाणिक, समर्पित,शूर सेनापती  उमरठचे होते याचा सार्थ अभिमान उमरठकरांना असल्याचे जागोजागी दिसले. तानाजी मालुसरेंनी हाताळलेल्या तलवारी स्मारकाच्या समोरच राहणार्या कुटुंबाने आम्हाला दाखवल्या . 'गड आला पण सिंह गेला' असे भावोद्गार ज्यांच्याबद्दल निघाले  अशा   नरवीर  योद्ध्याचे  आणि  आयुष्यभर प्रेमळ , भावस्पर्शी नातं जपणार्या आजीचं गाव कसं विसरता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा