मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

जागर

मराठवाडा  परिसरातील धनगर त्यांच्या मेंढ्यांचा काफिला घेऊन आमच्या गावाच्या पंचक्रोशीत येत  असत.  मेंढ्यांच्या कळपाला वाडा म्हणायचे. वाडा जेवढा मोठा तेवढी त्याची किंमत ठरायची.   एका रात्रीत एकरभर शेत मेंढीच्या लेंडीने सारवलं  जाईल अशा वाड्याच्या मालकाला मान असायचा.        
    अशाच एका मोठ्या वाड्याचा मुक्काम एकावर्षी आमच्या  मळ्यात होता. तब्बल १० रात्री चा मुक्काम असल्याने वाड्यातली बायका- पोरं नि गडी-माणसं चांगलीच परिचयाची झाली होती. रोज संध्याकाळी मेंढ्या शेतात बसवल्यावर तरुण  मेंढपाळ मुलं - मुली पाणी भरायला  विहिरीवर यायचे; तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या चालीरीती,पूजाविधी व सणसमारंभाची माहिती मिळायची. या समाजातील मुला - मुलींची लग्न खूप कमी वयात होतात याबद्दल विचारले असता त्यातल्या पोक्त माणसाने सांगितले की , " आमच्या पोरापोरींना मेंढी  आणि  लेंडीची    पारख  करता येईस्तोवर  आम्ही थांबतो , आमची पोरं शिकत्यात सवरतात काय ?  रोजच्या जगण्यातूनच शहाणपण येतं मग लगीन करायला काय हरकत नसते कोणाची"  जीवन जगायला ज्या प्राथमिक बाबी लागतात तेवढ्या  असल्या की जगणं सोपं होतं. असा सरळधोप अर्थ त्याच्या बोलण्यातून व्यक्त व्हायचा. 
  त्या वाड्यावरील  १३ वर्षाच्या  सुभीचं लग्न जवळपास  तिच्याच वयाच्या मुलाबरोबर ठरलं होतं. त्या लग्नाच्या हळदीचं निमंत्रण काशा    धनगराने मोठ्या   आपुलकीनं   दिलं  . मेढ्यांचं मटण - भाकरी चं जेवण होतं .  जेवणा नंतर खंडोबाचा जागर होता. वाघ्या मुरळींची जेवणं झाल्यावर खंजीरी- संबळचा नाद जंगलभर घुमायला लागला. रात्र जशी वाढत जाईल तसा जागर रंगात येऊ लागला.  तरण्या पोरं पोरींसोबत म्हतारी कोतारी मंडळी वाघ्या मुरळीच्या सोबत नाचू गाऊ लागली . भंडारा  उधळला  जायाचा  , खंडोबाची गाणी टीपेच्या सूरात  म्हटली  जात  होती . नाचणार्यांचं   अंग   घामाघुम  झालं   होतं  , अंगाला अंग घुसळवत भेभानपणे सगळे नाचत  होते.   शिवा धनगर  जोषात  नाचत  गात  होता ; नाचता  नाचता मुरळीच्या  अंगाशी लगट  करायचा. एका दोघांनी त्याला समज दिली  पण  त्याने त्याकडे   दुर्लक्ष केलं  .  तेवढ्यात   चिलीम ओढत बसलेल्या  गणाबाने शिवाला जवळ बोलावून फाडदिशी कानशिलात लगावली . शिवा काय समजायचा ते समजला . जागर संपेपर्यंत मुरळी पासून चार हात दूरच राह्यला. गणाबाच्या शब्दाला मान होता तर त्याच्या फटकावण्याला बहुमान असणारच!
  गणाबा या वाड्याचा मेढ्या (मालक ) होता.  वयाने  आणि अधिकाराने मोठा होता. त्याच्या भावकीतल्या आणि नात्यातल्या धनगरांच्या मेंढ्या एकत्र करुन त्याने वाडा बनवला होता . गेल्या १० वर्षापासून सर्वांना त्याचा भरभक्कम  आधार होता. गणाबा कडक शिस्तीचा व तत्वाचा असल्याने त्याचा दरारा मेंढपाळांबरोबर गावोगावच्या शेतकर्यांमध्येही दिसायचा. बाई आणि बाटली पासून अलिप्त असलेल्या गणाबाला शिवाचं वागणं खटकलं पण त्याने जागराचा रंगाचा बेरंग होऊ न देता शिवाला हाताळले. चांगुलपणा, धर्मभाव,नैतिकता इ. सद्गुण केवळ शिक्षणातून येत नाहीत तर गणाबासारखं  अंगी  बाणवायचे  असतात . निव्वळ सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारित असणं महत्वाचे आहे , हा विचार सुभीच्या हळदीला गणाबाने दिला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा