रविवार, १९ जानेवारी, २०१४

जाधव सर

जाधव सर उप मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले ,त्या आधी त्यांच्याबद्दल अनेक वावड्या ऊठल्या होत्या ; कोणी म्हणायचे की आता शाळेतल्या सगळ्यांना रडावं लागेल , तर काही म्हणायचे की जाधव सरांच्या हाताखाली काम करणं म्हणजे शिकणं. अशा चर्चांमध्ये दुसर्या गटात मी होतो.
   भरत जाधव सर आले. पहिल्याच शिक्षक सभेत त्यांनी सर्वांकडून शालेय कामकाजाबद्दल काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि जाता जाता त्यांच्या स्वभावानुसार बोलले " काम चुकार आणि वेळेचं भान नसलेल्यांना पडता भुई थोडी
होईल , लक्षात ठेवा."  सरांच्या या शेवटच्या वाक्याने अनेकांची मने चुरगळली गेली आणि त्यांच्याबद्दल ठाम समज असा झाला की हा माणूस सणकी स्वभावाचा आहे.
   दुसर्या दिवसापासून जो तो आपापल्या कामात व्यस्त दिसायला लागला .वेळेत येणे ,बाहेर जाताना हालचाल रजिस्टरला नोंद करणे,कँटीनमध्ये तासनतास न बसणे, टाचण रोजच्या रोज काढून ठेवणे , आँफ तासाला ग्रंथालयात जाणे : अवांतर वाचन करणे , महिना अखेरला कँटलाँग निटनेटका व अचूकपणे पूर्ण करुन तपासणे इ. बाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दक्षता घेऊ लागलेत.
  जाधव सरांच्या स्वभावा बद्दल ज्या उलट सुलट चर्चा व्हायच्या त्यात तथ्य नसल्याचे पहिल्या एका वर्षात लक्षात आले. सरांचा स्वभाव तापट होता पण मनाने तेवढेच दिलदारही होते . एखाद्याच्या चुकण्यावर ते ओरडायचे ,टाकून बोलायचे पण त्याबाबत पश्चातापसुध्दा करायचे. याबाबतचा अनुभव वर्षभरात मलाही  आला.
   एक दिवस शाळेत यायला मला उशिर झाला   . नियमाप्रमाणे सरांनी मला सही न करण्याचे बजावले. मी काही न बोलता त्यांच्या कँबीन मधून बाहेर पडलो आणि तेवढ्यातच एक शिक्षिका माझ्यानंतर येऊन जाधव सरांच्या समोर पडलेल्या मस्टरवर सही करुन बाहेर पडल्या . हे सगळ बघून माझाही स्वाभिमान जागा झाला.तडक कँबीन मध्ये घुसलो , सरांसमोरचं मस्टर घेतलं नि सही केली. जाधव सरांना माझं असं वागणं खटकलं . ते मला म्हटले " संजय पाटील ,तुम्ही माझा  आदेश मानला नाही याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील " " ठीक आहे, नियम सगळ्यांना सारखे लागू असतात , मी नियमभंग केल्याबाबत मला मेमो द्या,मी उत्तर देतो." मी असं तावातावाने बोललो व स्टाफरुम मध्ये येऊन बसलो.  शिक्षकांमध्ये    कुजबू   सुरु   झाली ,मी  आता  बळीचा  बकरा   ठरणार  अशा   नजरेने  जो  तो  मला   बघायचा .  दिवसभरात जाधवसर अनेकदा स्टाफरुम मध्ये येऊन गेले.पण  मला  ना  मेमो    दिला ना   प्राचार्यांसमोर बोलावले  .  त्या दिवशी  रोजच्या प्रमाणे शाळा सुटली नि मी घरी आलो.
   त्याच दिवशी संध्याकाळी जाधव सर माझ्या घरी आले , माझ्या खांद्यावर हात ठेवून एकच वाक्य बोलले "तुमच्या वागण्या बोलण्यातली आज सकाळी दिसली ती धार कायम टिकवा , तिला बोथट होऊ देऊ नका" मला नवल वाटले . ज्या माणसाबद्दल दगड,रानटी असे शब्द वापरले जातात तो माणूस मेणापेक्षाही मऊ आहेच शिवाय दिलदारही आहे.
  त्यांच्यापेक्षा मी   वयाने  , अनुभवाने व पदाने कितीतरी लहान असताना त्यांनी मला  जे दिलं ते शब्दात मांडता नाही येणार.  पण जाधव सर, जाधव सर होते त्यांची बरोबरी  कोणीही  करणार     नाही हे नक्की  . स्वाभिमान कसा जपावा हे  त्यांनी  शिकवलेच पण  अहंकार    कसा   विसरावा  हे  सहज दाखवून   दिले .
   त्यांचा अँक्सिडेंट झाल्यावर त्यांना गांधी हाँस्पिटलमध्ये रक्त पुरवण्यासाठी अनेकांसोबत मीही खूप धावपळ केली पण दुर्दैव आडवं आलं  नि जाधव सर सगळ्यांना सोडून गेले .
   काही नाती रक्ताच्या पलिकडची असतात ती रक्तात भिनल्याशिवाय कळत नाहीत असं भिनलेलं नातं जाधव सरांसोबत जुळलं होतं व आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा