बुधवार, २२ जानेवारी, २०१४

भैरोबाच्या नावानं बोss!

मी शेतकरी कुंटुंबातून वाढलो . आई वडील सुशिक्षित असल्याने शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण मला लाभलं; पण शिकतो म्हणून माझे  लाड  झाले  नाहीत . शेतीचं काम दिवसा नसलं तरी रात्रीचं माझ्याकडे असायचं. माझे दोन्ही भाऊ दिवसभर सालदारांसोबत  ऊन्हापावसात राबायचे व रोज रात्रीचे केळी व ऊसाला  पाणी लावणं , गुरांना चारापाणी करणं, गाई म्हशींचं दूध काढणं  अशी हलकी फुलकी कामं मी करायचो. हंगामात मजूर मिळत नसत अशावेळी काँलेजला दांडी मारुन लावणी किंवा मळणीसारख्या महत्वाच्या कामाला हजर राहावे लागे. केळीचं खोड खोदून काढून नवीन लावणीसाठी कंद काढायच्या कामाला खूप श्रम पडायचे , ज्वारी बाजरीच्या कापणीला अंगावर काटा ऊभा राहत असे. अशा जड कामांना मजूर मिळत नाहीत म्हणून ही सर्व जड कामं करावीच लागायची. आजही बहुसंख्य शेतकरी कुटुंबात शिकणार्या मुलांना ही सर्व कामे करावीच लागतात. अशी कामे करतांना हातला घट्टे पडायचे. पायांना गोळे यायचे. कमरेचा काटा ढिला व्हायचा; पण कुरकुर चालायची नाही.
     केळीचं पिक काढल्यानंतर  केळीची  वाळेलेली  पानं  (पत्ती ) व केळीच्या खोडाचा टाकाऊ   भाग  (डबर ) उचलून  बांधावर किंवा  खड्यात टाकावं  लागे.  पावसाळ्याच्या   आधी ही  कामं  करावी  लागत ;  नाहीतर  पाऊस पडल्यावर केळीच्या शेतातली पत्ती आणि डबरमध्ये  साप,  विंचू  निघतात . एकदा हा  कचरा  उचलायच्या आधीच पाऊस पडल्याने   या कामासाठी मजूर मिळत नव्हते. शनिवार रविवार बघून मला व लोटन बापूजीला ही जबाबदारी दिली गेली. लोटन बापूजी आमच्याकडे सलग तीन वर्ष कामाला असल्याने बापूजी घरातल्यासारखं काम करायचे.सकाळी ७ वाजता कामाला सुरवात केली. पत्तीचा भारा दोरखंडात बांधून खांद्यावर लादायचा नि बांधावरच्या चिंचेच्या झाडाखालच्या खड्यात टाकायचा असा खेळ सुरु होता. ११ वाजेपर्यंत सुरळित सुरु होतं आणि नंतरचा भारा बांधून मी खांद्यावर लादला व चालत असताना भार्यातल्या सापाने माझ्या उजव्या हाताला चावा घेतला. भारा फेकून मी मोठ्यानं ओरडलो. बापूजी माझ्या मागेच असल्याने मला साप चावल्याचे त्यांनी पाहिले.साप सरपटत निघून गेला.
मला दरदरुन घाम फुटला होता. सापाबद्दल ग्रामीण भागात जे गैरसमज असतात ते माझ्या मनात त्यावेळी ठासून भरले होते. मला साप चावला या विचाराने मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचे . बापूजीने बैलगाडीत घालून मला गावात आणले. बघ्यांची गर्दी जमली. जो तो साप चावल्याच्या दुष्परिणामांचा पाढा वाचत होता त्यामुळे मलाही  अभद्र विचार येऊ लागले.
तेव्हा  साप किंवा विंचू चावलेल्या व्यक्तिला किंवा जनावराला दवाखान्यात क्वचित नेत असत.पण  गावातल्या भैरवाच्या देवळावर आधी न्यायचे. तसं मलाही भैरवाच्या पारावर बसवलं.  साप विंचू उतरवणारा पारंगत समजला जाणारा  एकजण आमच्या गावात होता , तो आला . त्याने अगरबत्तीची राख साप चावलेल्या जागेवर लावली . राख लावताना तो काहीतरी पुटपुटत होता. मंत्र बोलत असावा . नंतर एका पितळी ताटलीत पाण्यात तंबाखू कालवून मला ते पाणी पाजलं. लगेच मला उलट्या झाल्या. दोघा तिघांनी मला उचलून भैरवाच्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालता घालता "भैरोबाच्या नावानं बो ss"  असं म्हणत पाच सात वेळा फिरवलं. मग मांत्रिकाने मला लिंबाचा पाला खायला दिला . कडू लागला तर साप उतरला असं समजायचे. मला तो पाला कडू लागला. नंतर लाल मिरच्या खायला दिल्या त्याही तिकट लागल्या . मांत्रिकाने जाहीर केलं " साप उतरला, घाबारायचे नाही" , अशा पध्दतीने मला चावलेला साप उतरला.
मंत्र तंत्राने साप विंचू उतरवण्याच्या अशा अनेक पध्दती गावागावात होत्या; त्याला आज आपण थोतांड म्हणतो; पण वैद्यकीय उपचार आजच्यासारखे तेव्हा सहज उपलब्ध होत नसल्याने बाधित व्यक्तीला मानसिकद्रष्ट्या धीर देण्यासाठी असे ईलाज केले जायचे.  सर्पदंशावर आज उत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले आहेत. सापांबद्दल साक्षरता वाढली आहे.  मंत्र तंत्राचे युग  संपले आता शास्र  यंत्राचे जग आले.  कालाय तस्मै नम:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा