बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

प्रभावी वक्ता : डॉ. दिलीप देशमुख

प्रभावी वक्ता  : डॉ दिलीप देशमुख 

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ५१ वें जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २९ ते ३१ जानेवारी २०२४ असे तीन  दिवस सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे आयोजित केले होते. या तिन्ही दिवसात अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी लाभली. पहिल्या दिवशी (२९ जानेवारी)  विज्ञान प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाच्या आधी 'परिक्षेपे चर्चा' या लाईव्ह कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना दिलेल्या दिलखुलास उत्तरातून असे लक्षात आले की व्यक्ती निव्वळ पदाने किंवा पैशाने श्रेष्ठ ठरत नाही तर त्याच्या आचार - विचाराने , भावनिक साद आणि संवादाने लोकांच्या मनात आपला ठसा उमटवत  असते. पंतप्रधानांची विद्यार्थ्यां बद्दलची आत्मीयता , तळमळ त्यांच्या सहज बोलण्यातून श्रोत्यांना जाणवत होती. वेळ आणि श्रमाचे महत्व अधोरेखित करतांना ते सांगत होते : आपला दृष्टिकोन व्यापक बनवा , सरावात सातत्य ठेवा , गुरू- आई वडील यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगा , धीट बना .....आपलं भविष्य आपण सहज घडवू शकतो. असे अनेक मुद्दे त्यांनी या चर्चेत ओघावत्या शैलीत मांडलेत. त्यांना प्रश्न विचारणाऱ्या विविध राज्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास , भाषेवरील प्रभुत्व , जिज्ञासा इ. गुणांचे दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. गीताताई पालरेचा ,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री सत्यजित बढे , माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ जोत्सना शिंदे / पवार , उप शिक्षणाधिकारी सौ.सुनीता पालकर , सुधागड विद्या संकुल कळंबोलीचे प्राचार्य श्री राजेन्द्र पालवे , या  मान्यवरांची भाषणे झालीत. यावेळी सर्व वक्त्यांच्या भाषणातून मानवाच्या विकासात विज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून विज्ञानाला अध्यात्माची जोड असणे तितकेच महत्वाचे आहे असा सूर व्यक्त झाला. त्यातूनही सर्व वक्त्यांचे समृध्द अनुभव विश्व , विचार व्यक्त करण्याची हातोटी , साधेपणाने व्यक्त होणारे शहाणपण जाणवले.
दुसऱ्या दिवशी ( ३० जानेवारी ) दुपारी १२ ते २ यावेळेत  डॉ . दिलीप देशमुख यांचे सुश्राव्य व्याख्यान अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असेच होते. डॉ देशमुखांचा परिचय देताना उप शिक्षणाधिकारी सौ सुनीता पालकर मॅडम म्हटल्या " डॉ दिलीप देशमुखांचे कार्य कर्तृत्वाचे अवकाश व्यापक आहे . तरी त्याचा अल्पसा परिचय द्यायचा झालाच तर डॉ देशमुख हे शास्त्रज्ञ , शिक्षण तज्ज्ञ , गणित तज्ज्ञ , विविध शैक्षणिक , वैज्ञानिक , सामाजिक संस्थांचे ते संचालक आहेत. आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने भारतासह अन्य ३२ देशात लोकप्रिय आहेत." उपस्थित बहुसंख्य श्रोत्यांनी डॉ देशमुख याच्या भाषणाची ख्याती अनुभवलेली होती तरी आजच्या भाषणात ते काय सांगतात याबद्दल माझ्यासह अनेकांची जिज्ञासा टिपेला पोहचली होती. 
डॉ . दिलीप देशमुख बोलायला उभे राहिले . आपल्या समृध्द अनुभवाच्या पोतडीतून एक एक प्रेरक प्रसंग सांगत विद्यार्थ्यांसह सर्व श्रोत्यांना भरभरून विचारांचे दान द्यायला त्यांनी सुरुवात केली. दुपारी १२ वाजता सुरू झालेले त्यांचे सुश्राव्य ओघावत्या शैलीतील भाषण  तब्बल २ तास अविरत सुरू होते. या दोन तासात कोणीही श्रोते जागा सोडून उठून गेले नाहीत की आपसात कुजबुज केली नाही.   असं काय होतं त्यांच्या भाषणात ?  तर सर्वार्थाने समृध्द म्हणता येईल असे त्यांचे भाषण झाले.समाजासाठी विज्ञान या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन असल्याने दैनंदिन पण साध्या सोप्या उदाहरणातून विज्ञानाचे महत्व त्यांनी पटवून दिले . आईन्स्टाईन महात्मा गांधीजींचे शिष्य होते हा मुद्दा विषद करतांना 'विद्या विनयने शोभते' हे सुभाषित अधिक स्पष्ट झाले. नेपोलियन ने जग जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवले त्यात एका आयफेल नावाच्या इंजिनियर ने सादर केलेला प्रकल्प बघून नेपोलियन बेहद्द खूष झाले नि  त्यातून आयफेल टॉवर उदयास आले. या मुद्यातूनही जगतजेतेही दर्दी ज्ञानोपासक असावेत हे स्पष्ट केले. नेचर नावाचे मॅगझिन प्रत्येकाने वाचावे कारण त्यात जगातील नवनवीन संशोधनाबद्दल उत्तम माहिती दिली जाते हे सांगताना प्रत्येकाने चतुरस्र असावे हे नमूद केले. आई - वडील व  शिक्षक आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात यावर भाष्य करताना ते म्हणाले की डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम , डॉ.राम ताकवले यांसारखे गुरू मला लाभले म्हणूनच जगण्याची दिशा गवसली. उत्तमोत्तम व्यक्तीचा सहवासाचा फायदा सांगताना : साने गुरुजी , यशवंतराव चव्हाण यांच्या मांडीवर मी बागडलो आहे तर वसंत गोवारीकर , रघुनाथ माशेलकर , जयंत नारळीकर विभूतीन बरोबर कार्यरत राहिलो आहे  हे ही  सांगितले. आपल्या रोजच्या जगण्यातून व बारीकसारीक निरिक्षणातून वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात यावर भाष्य करताना त्यांनी आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाचे उदाहरण दिले. आईन्स्टाईन रोज आपल्या आजीच्या कष्टाचे काम बघत असताना (निरिक्षणातून शोध) त्यांनी सावलीचे , पाण्याचे घड्याळ शोधले , चक्कीचा शोध लावला. एका मुलाने दगडाखलाचे विश्व या विषयावर शोध प्रबंध लिहिला आणि दुर्लक्षित घटकही मोलाचे असतात हे दाखवून दिले. उत्तमोत्तम पुस्तके वाचा याबद्दल बोलताना डॉ देशमुखांनी shifted power याबद्दल बोलताना त्यांनी शक्ती तीन प्रकारच्या असतात  १) मसल पॉवर २) मनी पॉवर ३) नॉलेज पॉवर यातील नॉलेज पॉवर हीच कशी श्रेष्ठ आहे हे पटवून देताना लक्ष्मी आणि सरस्वती या दैवतांचे फोटो बघा , लक्ष्मी उभी आहे तर सरस्वती बसलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे पैशाचे प्रतीक लक्ष्मी चंचल आहे तर बुध्दीचे प्रतीक सरस्वती अचल आहे हे अधोरेखित केले. नेमके प्रतीकात्मक प्रतिपादन कसे असावे हे  या मुद्यातून स्पष्ट झाले .यश मिळवायचे असेल तर प्रचंड मेहनत आणि प्रसंग अवधान महत्त्वाचे असते हे सांगताना धीरूभाई अंबानी यांचे उदाहरण दिले. धीरूभाई यांना विचारले की ८० हजार करोड ची संपत्ती कशी मिळवली तर धीरूभाई म्हटले मी मिनिटाला ६०० शब्द वाचतो , दुसऱ्या एका प्रसंगाबद्दल सांगितले की राजीव गांधी पंतप्रधान असताना मुंबईत येणार होते तेव्हा धिरुभाईंनी राजीव गांधींना भेटण्यासाठी अर्धा तास वेळ मागितली ती  नाकारली गेली : (अशा मोठ्या लोकांना भेटायच्या आधी काही मधले लोकं आडवे येणारे असतात त्यांचाच मोठा प्रश्न आपल्याकडे सर्वत्र आहे.) शेवटी पाच मिनिटांची वेळ मिळाली व भिरुभाई राजीव गांधींना भेटले , औपचारिकता म्हणून पुष्पगुच्छ दिला नि बाहेर आले. अनेक पत्रकारांनी धीरूभाई यांना विचारले की राजीव गांधी यांच्यासोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली ? धिरूभाई पत्रकारांना काही न बोलता निघून गेले . कारण  गुजरात मध्ये झालेल्या वादळात रिलायन्स कंपनीचे प्रचंड नुकसान झाले होते व रिलायन्स चे शेअर्स पडले होते . या भेटीचा परिणाम असा झाला की रिलायन्स चे शेअर्स पुन्हा गगनाला भिडले. प्रसंग अवधान आणि मेहनत असेल तर यश खेचून आणता येते / मिळतेच . असे कितीतरी प्रसंग , अनुभव सांगत विज्ञान आणि समाज यांची जोपासना आपल्या दैनंदिन निरिक्षणातून , परिश्रमातून , कल्पकतेतून सहज करता येते यावर अतिशय मनमोकळे पणाने भाष्य केले.
थोडक्यात चतुरस्र वक्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ देशमुख असे भावोद्गार उपस्थित सर्व श्रोत्यांमधून उत्स्फूर्तपणें व्यक्त होत होते.त्यांचं ते भाषण माझ्यासह अनेकांना प्रेरणादायी होते म्हणूनच ती आठवण जपून ठेवता यावी व इतरांना ही सांगावी म्हणून येथे नोंदवून ठेवत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा