मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

दादांना साष्टांग दंडवत !

                     दादांना साष्टांग दंडवत !

दादासाहेब , तुम्ही अथक प्रयत्नाने सुरू केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाळा , महाविद्यालये उतुंग यशाच्या वाटेवर धावताहेत . त्यासाठी आपल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी - माजी संचालकांचे, निस्वार्थी  मुख्याध्यापक , शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान तर आहेच परंतु त्याहीपेक्षा अधिक तुमचे आशीर्वाद आणि शिकवण आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरते आहे. दादासाहेब , तुम्ही नेहमी म्हणायचे - ' कृती पाहिजे , बडबड नको ' ' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ' ' भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली आणि या भूमीला पावन केले ' ' रंजल्या गांजल्यांची सेवा करा - देव भेटेल ' या , शिका , मोठे व्हा ! ' ' आचाराने आणि विचाराने दरिद्री बनू नका ' अशी कितीतरी सुभाषित सदृश्य वाक्य तुमच्या भाषणांतून आम्ही ऐकली आहेत ; तुमचे विचार काहींनी स्मरणात ठेवलेत  पण काही कृतघ्न लोकं तुमची शिकवण विसरून पदाचा  माज दाखवण्यात मश्गूल झालीआहेत . 

    दादा, आज तुमच्या जयंती निमित्ताने तुमच्या प्रतिमांना हार तुरे घालून तुम्हाला अनेकजन प्रामाणिकपणे वंदन करतील .तर काही जन सवयी प्रमाणे पाल्हाडिक लंबी -चौडी भाषणे करतील. त्यात त्यांचे नाटकीपण जास्त असेल. स्वतःला सर्वज्ञ समजणारे ,  बेगडी वागणारे काही हरमाखोर लोकं तुमची शिकवण विसरून मुजोर वागायला लागली आहेत. पदाचा  गैरवापर करत काही नालयकांनी संस्थेतील पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून मुजोर मस्ती केली आहे ; काही अजून तसे करत आहेत. त्यातील अनेकांना नियतीने जबरदस्त फटकारे मारले आहेत. तरीही त्यांच्या कुरापती करणे  सुरूच आहे. अशा सडक्या विचारसरणी असलेल्यांना सद्बुद्धी द्या हो दादा !   

   पदाचा दर्प घेऊन फिरणारी काही स्वार्थी व लबाड माणसं आपल्या संस्थेत घाणेरडे राजकारण करत लोकांना सतवत आहेत .   दादा, तुम्ही अशा लोकांबद्दल नेहमी म्हणायचे - ' तळे राखील तो पाणी चाखील ' त्याप्रमाणे काहींनी आपला स्वार्थ साधण्यासाठी तळे खाली करायचा घाट घातला होता पण नियतीने त्यांचाच घात केला आहे.  तसा दुर्दैवी घात होण्याआधी स्वार्थासाठी व आपल्या मर्जीतील चमच्यांना पुढे आणण्यासाठी  पदाचा गैरवापर करणाऱ्या ढोंगी व संधीसाधू  लोकांनी सावध व्हावे , हीच दादांना खरी श्रद्धांजली - आदरांजली ठरेल. 

     दादासाहेब , तुमचा सहवास आणि आशीर्वाद ज्यांना ज्यांना लाभला ते भाग्यशाली ठरले आहेत . त्यातलाच एक मी आहे . माझ्या पनवेलच्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेला ( सन २००० ) आपण पनवेलला बांठीया विद्यालयात आला होतात त्यावेळी मी आपणास घरी येण्याची विनंती केली होती नि तुम्ही तात्काळ मान्य करून माझ्या घरी आलेत. त्यावेळी माझे आई वडीलही आले होते ; तो माझा आनंद तुम्ही द्विगुणित केला .  एक ऋषितुल्य पितामह घरी येऊन गेल्याचे अलौकिक सुख- समाधान मी कायम अनुभवतो आहे . एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्याचा गर्व किंवा ताठा न बाळगता एका सामान्य शिक्षकाच्या घरी आपण आलात म्हणूनच माझे घर पावन झाले.  दादा, तुमचा साधा सरळ स्वभाव , निरपेक्ष वृत्ती , दिलदार मन , संस्थेतील सामान्य कर्मचारी बद्दल आस्था नि आपुलकी इ. गुणांमुळे तुम्ही माझ्यासह अनेकांचे श्रद्धास्थान आहात. पूजनीय आहात. 

 दादासाहेब , रोज शाळेत आल्यावर तुमचे दर्शन घडते . तो तुमचा अर्धाकृती पुतळा बघून नेहमी वाटतं की तुम्ही माझ्यासह अनेकांच्या पूर्ण आयुष्याचे पाठबळ आहात.  तुमचा भरभक्कम , अढळ आशीर्वाद आम्हाला लाभला त्याप्रमाणे सुधागड परिवारात नवीन नियुक्त होणाऱ्या सर्वांना लाभो या अपेक्षेेसह आज आपल्या जयंती निमित्त आपणास साष्टांग दंडवत करतो नि थांबतो . 

               तुमचा एक निस्वार्थी सेवक - 

               संजय माधवराव पाटील , पनवेल.

----------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा