सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

आमचे शिवरामे अप्पा !

 


शिवरामे सर , अर्थात आमचे अप्पा - काय बोलू तुमच्याबद्दल ? पद आणि प्रतिष्ठेपेक्षा व्यक्ती म्हणून आवडलेला माणूस म्हणजे शिवरामे अप्पा ! खुर्चीच्या गर्व आणि अहंकाराने बरीच माणसे बेताल वागतात किंवा बोलतात पण शिवरामे अप्पा  तरी असे वागले - बोललेले मला स्मरणात नाहीत . मी आजपर्यंत अनेक वरिष्ठांच्या हाताखाली काम केले आहे ते सर्व चांगलेच वागलेत व बोललेत ( काही अपवाद वगळता ) ; पण शिवरामे अप्पाच्या वागण्यात आणि बोलण्यात स्नेह आणि आपुलकी जास्त दिसली. माणसं ओळखायची असतील तर निव्वळ भावनेवर न जाता त्यांच्या व्यवहार चातुर्यावर माणसं ओळखा असे ते नेहमी सांगत आलेत. कोणी आपला सहकारी आपली बदनामी करत असेल तर दुर्लक्ष करत जा , जळत्या घरावर रॉकेल शिंपडणारी माणसे जागोजागी असतात अशांना पाणी पाजायचं धोरण ठेवा.......असे कितीतरी मार्गदर्शक तत्वे त्यांनी मला शिकवलीत. म्हणूच मला रागावर नियंत्रण ठेवायला सोपे गेले :  नोकरीच्या ठिकाणी काम करतांना आपले सहकारी आपल्याला समजून घेणारे, आपली समजूत घालणारे असले की आपोआप नातं घट्ट विणल जातं तसं माझं आणि शिवरामे अप्पाचे नाते विणले गेले. केवळ आपले वरिष्ठ आहेत , त्यांच्याकडून आपल्याला काही खास सवलत मिळेल या अपेक्षेने मी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं तोंडदेखले कौतुक किंवा वाहवा केली नाही आणि करणार पण नाही पण शिवरामे अप्पाबद्दल जे मी आज लिहितोय ते सर्वस्वी माझे अंतर्मनातील बोल आहेत. निव्वळ एक नोकर म्हणून समोरच्याला कोणी  वागवलं तर तो ही निव्वळ चाकर म्हणून काम करतो : त्यात आस्था असत नाही ; अध्यापनाचे किंवा शाळेतील कोणतेही काम  करतांना वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सगळेजन धावपळ करतो अशावेळी कोणी जर आपल्या कामात उणिवा काढून वरिष्ठांचे कान भरत असेल तर त्याचाही राग अनावर होतो पण अशावेळी संयम कसा ठेवावा हेही शिवरामे अप्पांच्या मार्गदर्शनातून मी शिकलो. कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा असे असे कोणी वागू नये असे शिवरामे सर नेहमी सांगत आलेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रेरणेने समर्पण भावना अनेकांनी घेत आपल्या शाळेसाठी वेळ आणि श्रम वेचले आहेत. आपल्या कर्तव्याबद्दलची आस्था शिवरामे सरांमुळे मला बाळगता आली. जशास तसे उत्तर देणे हा माझा मूळ स्वभाव असला तरी कशालाही का भिडयाचे ही सूचना ते मला कायम देत होते. 

  नियत वयोमानानुसार श्री शिवरामे सर सेवानिवृत्त होत आहेत - आज दि 21 डिसेंबर 2020 रोजी त्यांचा सेवापूर्ती समारंभ के .आ. बांठिया माध्यमिक व एन.एन. पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल येथील सभागृहात आयोजित केला आहे . या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मी निघालो होतो पण प्रवासाचे साधन उपलब्ध न झाल्याने रात्री 10 वाजता पारोळा येथून मला परत यावे लागले याची मला खंत आहे . श्री शिवरामे सरांनी माझ्या नोकरीच्या गेल्या २४ वर्षात मला जो स्नेह दिला , सहकार्य केले व अफलातून मैत्रीचे नाते जपले त्याचा अभिमान मी कायम लक्षात ठेवेल ! श्री शिवरामे सरांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे - समाधानाचे - निरोगी - दीर्घायुषी जावो या सदिच्छेसह मी माझ्या भावनांना विराम देतो ! धन्यवाद ! ---------- संजय पाटील -----------

२ टिप्पण्या:

  1. मला शिवरामे काकांना सर म्हणणे जमलंच नाही. त्यांनी आमच्या कुटुंबासोबत जपलेला ओलावा कायम दिवसेंदिवस दृढ होत आहे. पूर्ण नोकरीतील कोणतेही त्यांचं मस्टर त्यांच्यातील वक्तशीर पणा ठळकपणे दाखवू शकतो. हस्ताक्षरावरून माणसाची जगण्याची दिशा कळते असं म्हणतात, काकांचं लिखाण हीच त्यांच्या सुंदर आणि सुखी जीवनाची प्रतिकृती दर्शवतो. केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यात नये तर स्वच्छता, बागकाम, प्रत्येक कामात १०० % देणं ह्या त्यांच्या ठळक सवयी. नुसतं जोडीदारासोबत नाही तर आयुष्यात संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी प्रत्येक सुख दुःखात समजून घेऊन साथ दिलीये. काकांना त्यांचं पुढील आयुष्य हे प्रापंचिक, आध्यात्मिक, आणि सर्व सुखांनी भरलेलं राहो हीच आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना.

    जीवन तुमचे जणू स्वच्छ सात्विक सदरा,
    सुबक बारीक नक्षी दर्शवते प्रेमय मनाच्या खुणा |
    प्रत्येक गुंडी जोडते प्रत्येकाशी आपलेपणा,
    कोणत्याही डागाचा लवलेश हि न दिसे त्यावरी, हीच सप्तशृंगीस प्रार्थना ||

    खूप खूप शुभेच्छा काका

    उत्तर द्याहटवा
  2. मयूर , सुंदर प्रतिक्रिया दिली आहे !👍👍

    उत्तर द्याहटवा