शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

आदर्श गुरुः श्रीमती निंबाळकर म्यडम

सुलभा विजयसिंह निंबाळकर - एक भारदस्त नाव!  
या नावाशी सख्य जमलं ते १९९६ ला ज्यनियर कालेज विभागात आल्यापासून. माणूस अनेक गुणांची मूर्ती असू शकतो याची प्रचिती म्यडमच्या वागण्या- बोलण्यातून मला  नेहमीच आली.
आपुलकीची आणि स्नेहाची दाट सावली , विनम्रतेचा  व निरपेक्ष सहकार्याचा गारवा,  माया - ममतेचा शीतल शिडकावा , बोलण्यातला मधूर गोडवा , स्वत्व व स्वाभिमान जपतानाचा सहज साधेपणा , राहणीमानातली शालीनता  व आभाळासारखं दिलदार मन अशा अनेकविध आदर्श पैलूंनी सम्रुध्द व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती निंबाळकर म्यडम !  
आतापर्यंतच्या माझ्या मराठी विषय अध्यापनातल्या अडचणी मी म्यडमकडे प्रमाणिकपणे मांडल्या व प्रत्येक वेळेस अगदीच सहजतेने त्यांनी मला मार्गदर्शन केले. बांठीया विद्यालयातील माझ्या पहिल्या गुरु म्हणून मी त्यांना मनोमन पूजत आलो आहे , त्यांच्या सोबत शाळेतले बरेच उपक्रम हाताळण्याचं सदभाग्य मला लाभले,  यातूनच मी बरचं काही शिकलो . नियोजनातले बारकावे कसे पाहावेत,  प्रत्यक्ष काम हाताळतांना अविश्रांत मेहनत कशी करावी, सहकारी शिक्षकांवर अढळ विश्वास कसा ठेवावा, विद्यार्थ्यांना आपलसं कसं करावं , हाती घेतलेला उपक्रमाला संयत मूर्तरुप  कसं द्यावं अशा बहुसंख्य गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो .
शाळेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'रौप्यरंग' विशेषांकाचे संपादक मंडळात मी  निंबाळकर म्यडमच्या हाताखाली काम केलं , शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त प्रकाशित होणारे हस्तलिखित साकारताना किंवा विविध स्पर्धा अथवा उपक्रमातून म्यडमच्या मार्गदर्शनात मी जे काही काम केलं असेल त्याचं श्रेय म्यडमला जातं.
आज दि ३० सप्टेंबर २०१४ (मंगळवार)  रोजी श्रीमती निंबाकळकर म्यडम नियत वयोमानानुसार सेवानिव्रुत्त झाल्यात , त्यांच्या भावी आयुष्यात सुख - सम्रुध्दी व असेच घवघवीत यश लाभो या सदिच्छेसह थांबतो .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा