रविवार, १ जून, २०१४

मेहनती -रोडगे सर !

संग्राम शिवाजी रोडगे हे १९८२ पासून बांठिया विद्यालय पनवेल येथे कार्यरत आहेत .३१ मे २०१४ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिव्रत्त होत आहेत , पण ३१ मे ला  उन्हाळी सुट्टी असल्याने दि. २९ एप्रिलला शाळेकडून त्यांना निरोप दिला गेला व ३० एप्रिल  ला सायंकाळी ६ ते १० या वेळेत विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी रोडगे सरांवरील  प्रेमापोटी दिमाखदार सेवापूर्ती समारंभ आयोजित केला होता.  या समारंभासाठी पनवेलचे विद्यमान आमदार श्री प्रशांत ठाकूर ,पनचवेलचे  माजी नगराध्यक्ष श्री संदिप पाटील, जि.प.सदस्य श्री राजेंद्र पाटील,  विद्यालयाचे भूतपूर्व मुख्याध्यापक श्री सुतार सर,  विद्यमान मुख्याध्यापक श्री पवार सर,  पनवेलचे मीडिया प्रतिनिधी,  अनेक शाळांचे मुख्याध्यापक,  शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसह अनेक आजी-माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री रोडगे सरांबद्दल गौरोद्गार  काढलेत.  सर्व वक्त्त्यांच्या भाषणांतून रोडगे सरांच्या ३२ वर्षाच्या सेवेतील आठवणी सांगताना एक मुद्दा समान दिसला व तो म्हणजे रोडगे सरांची शिस्त ,कामावरील निष्ठा.  मी १९९६ पासून रोडगे सरांना पाहतो आहे . शाळेच्या प्रत्येक मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी रोडगे सरांच्या वक्तशीरपणाबद्दल व अविश्रांत परिश्रमाबद्दल कबुली दिलेली आहे . त्यांच्या मित्रांनी त्यांचं कौतुक करणं स्वाभाविक आहे पण त्यांचे विरोधकही त्यांच्या वरील गुणांचं कौतुक करतांना मी अनुभवले आहे . अशी माणसं  समाजासाठी आदर्श ठरतात .रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत म्हणजे तब्बल १४ वर्ष विनाअनुदानित रात्र शाळा चालवतांना अनेक अडचणी आल्या असतील,  अनेकांशी त्यांचे मतभेदही झाले असतील तरी ते कधीही कोणावरही खूप भडकले किंवा अद्वातद्वा बोलले असं कधीही दिसलं नाही.  पराकोटीचा संयम काय असतो तो त्यांच्या वागण्या- बोलण्यातून जाणवला. एस.एन.डी.टी चे दूरस्थ अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो.  केंद्राला मान्यता मिळवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता,  तत्कालीन मुख्याध्यापक श्री मोकल सरांनी,  जोशी सरांनी संस्थेकडे हा प्रस्ताव पाठवला होता पण संस्थेने विहित वेळेत प्रस्तावावर निर्णय न घेतल्याने मी  रोडगे सरांना त्याबाबत सांगितले. व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,  नाशिक ला प्रस्ताव पाठवण्याबाबत बोललो. रोडगे सरांचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेबांचे संबंध खूप सलोख्याचे असल्याने रोडगे सरांना अडचणी आल्या नाहीत व मुक्त विद्यापीठाचे केंद्र बांठिया विद्यालयात सुरु झाले . या ही प्रसंगातून एक लक्षात आलं की रोडगे सर अखंड पाठपुरावा करणारे आहेत . संस्था,  सर्व मुख्याध्यापक यांच्याबरोबर  मैत्रीपूर्ण संबंध असल्याने बहुसंख्य कामे होतात याचाही प्रत्यय आला .हे केंद्र चालवतांना दिवसरात्र मेहनत घेऊन रोडगे सरांनी केंद्राचा पर्यायाने संस्था व शाळेचा लौकिक वाढवला आहे . अनेक अल्पशिक्षितांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण या केंद्रामुळे घेता आले आहे , ही परंपरा कायम टिकावी व रोडगे सरांच्या परिश्रमाचे चीज व्हावे ही अपेक्षा आहे .
निव्रुत्ती नंतर त्यांच्या कामाचा व्याप कमी होवो व सुखी,  समाधानी , आरोग्यदायी दीर्धायुष्य त्यांना लाभो या सदिच्छेसह थांबतो .
.....................................................
संजय पाटील,  पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा