गुरुवार, ८ मे, २०१४

आजोबा

आज संध्याकाळी मनसे च्या दुर्गामाता मंदिराजवळच्या बाकड्यावर मी निवांत बसलो होतो.  ७.३० ची आरती झाली होती.  आरतीत सहभागी असलेल्या महिला आजूबाजूच्या बाकड्यांवर येऊन बसल्या होत्या.  तेवढ्यात एक आजोबा  माझ्याजवळ येऊन मला बोलले , "अहो,  मी बसू का इथे? " मी म्हटले,  " अहो काका,  हे काही विचारणं झालं का?  बसा ना !"  आजोबा बसले.  त्यांनी त्यांच्या बहिणीला फोन लावला व फोनवर रडत - रडत त्यांच्या सूनेची गार्हाणी सुरू केली.  " अगं ताई,  मी दादा बोलतोय,  ......आज मला पेन्शन मिळाले पण तिने सगळं काढून घेतलं माझ्याकडून,  ही लोकं रोज मारतात गं मला,  मी काय करु?  .........अगं,  तू पण मला वेडा म्हणतेस,  जग खरोखर इतकं वाईट आहे का गं?  ........ अगं ताई,  मी मरण मागतोहे पण तेही माझ्या भाग्यात नसावं,  मी नको त्या रस्त्यातून अनवानी फिरतो पण मला साप चावत नाही,  मला  मरावसं वाटतंहे पण ........... " असं संभाषण सुरु असतांना आजोबांना हुंदका अनावर होतो व ते पुन्हा मोठ्याने रडू लागले.  त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी त्यांचं सांत्वन केलं. तेव्हा ते शांत झाले . बोलू लागले,  त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे समजले.  पत्नी वियोगाचे सल त्यांना सतावत होतं,  त्यात सूनेचं वागणं - बोलणं त्यांना सोसवत नसावं,  हे लक्षात आलं. ते उत्तम गायक व कवी असल्याचं त्यांनी मला सांगितलं,  'जग हे बंदीशाला ' हे गीत ते गाऊ लागले.  त्यांचं ते गीत ऐकूण मी भारावलो . ते गीत त्यांच्याच आवाजातलं मी मोबाईलमध्ये रेकार्ड केलं आहे .
त्या आजोबांना खरोखरच सूनेचा जाच असेल तर आजोबांचं विव्हळणं रास्त म्हणावं लागेल.  पण आजोबांना पत्नी वियोगाचे दु:ख अनावर झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असल्यानेही आजोबा असे वागत असतील.  काहीही असो पण आज भेटलेल्या आजोबांनी माझ्या मनाला चटका दिला,  हे खास !   माणसाला सत्ता, संपत्ती नसली तरी चालेल पण संतती चांगली पाहिजे.  मुलाच्या जडण- घडणीसाठी या आजोबांनी आयुष्यभर खस्ता खाल्या असतील पण त्यांच्या वाट्याला आज एकाकी व निराधार असल्यासारखं जगणं आलं आहे . याला जवाबदार कोण असेल,  त्या आजोबांचं पुढे कसं होईल असे असंख्य प्रश्न घेऊन मी घरी आलो . हा अनुभव इतरांना सांगावासा वाटला म्हणून लिहलं.  आपणही आजोबा होणार या विचाराची भीती  इथून पुढे कायम माझ्या मनात असेल. 
...................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा