शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

निवडणूक ड्युटी

निवडणूकीच्या कामाचे  आदेश प्राप्त झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंत केंद्राध्यक्षापासून शिपायापर्यंत बुथवरील सर्वच जण टेंन्शनखाली वावरतात.   मी नोकरीला लागल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणूकात केंद्राध्यक्ष म्हणूनच काम केलेले आहे . ती परंपरा कायम टिकवण्यासाठी एप्रिल २०१४ च्या लोकसभा निवडणूक कामाबाबतचा आदेश मिळाला.  केंद्राध्यक्ष व उपकेंद्राध्यक्षांची दोन प्रशिक्षण पनवेलच्या आगरी समाज हाल व के. व्ही . कन्या शाळेत झालीत .
     १७ एप्रिल २०१४ ला  निवडणूक असल्याने १६ तारखेला सकाळी ७ वाजता घरुन निघालो. तालुका बदलून ड्युटी करावी लागणार असल्याने मनाची तयारी झालीच होती. पनवेलच्या कळसेकर कालेजच्या प्रशस्त आवारात निवडणूक कामासाठीचे कर्मचारी जमले होते. प्रत्येकजण सही करुन नेमून दिलेल्या तालुक्याच्या गाडीत जावून बसत होता.  मी उरण बसमध्ये बसलो.  बहुतेक परिचित चेहरे आधीच बसमध्ये  येऊन बसले होते . बसमध्ये अनेक विषय चघळले गेले. तोपर्यंत उरण आले . उरणच्या फुंडे हायस्कूल मधून मतदान यंत्रे  घेऊन नेमून दिलेल्या बुथवर साधारणत: ३ वाजेपर्यंत  आम्ही पोहचलो. बुथ लावून घेतले व ५ वाजता परिसर बघायला बाहेर पडलो.  सोबत उपकेंद्राध्यक्ष श्री राठोड सर व शिपाई होता . रात्रीचे जेवण तलाठी कडून येईल असे सांगितले होते पण रात्री ९.४५ पर्यंत जेवण न आल्याने आम्ही जवळच्या हाटेलात जेवण केले व बुथवर थांबलेल्या महिला पोलिसाला जेवण पार्सल आणले . रात्री एम एस ई बी च्या व्ही आय पी रेस्ट हाऊसमध्ये दोन ए सी  खोल्या  घेऊन एकात महिला पोलिस व दुसर्यात आम्ही तिघं असे झोपलोत .
१७ तारखेला  पहाटे ५ वाजता आम्ही सर्व उठलो.  ६ ते ७ पर्यंत मोकपोल (अभिरुप मतदान)  घेतले .  ३ पक्षांचे तीन मतदार प्रतिनीधींचे समाधान झाल्यावर ६.५०ला  मतदान यंत्र सील केले व मतदारांची वाट पाहत बसलो.  बरोबर ७.०५ ला पहिले मतदार म्हणून एक आजोबा आले . तेथून थेट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्या बुथवर  ५२१ मतदानातून ३३१  म्हणजे ६३.५३ % मतदान झाले . या नंतर उपस्थित सर्व मतदार प्रतिनिधींना १७ सी चे वाटप करुन मतदान यंत्रे व्यवस्थित सीलबंद करुन बसची वाट पाहत थांबलो . ७.२५ ला बस आली . आमचं बुथ जवळच असल्याने अवघ्या ५ मिनीटात आम्ही सबमिशन सेंटरवर (फुंडे हायस्कूल)  पोहचलो.   टेबल नं. २ वर ५ ते ७ मिनीटात सर्व साहित्य जमा केले.  नि घरी पोहचलो.
     या निवडणूकीत उरण तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ बघायला मिळाला.  १६ एप्रिलचं दुपारचं जेवण फुंडे हायस्कूलच्या नव्या इमारतीत होतं पण आमच्या मतदान कर्मचार्यांची गर्दी बघून जेवणाचं कान्ट्रक्ट घेणारे पार गोंधळून गेले. कोणालाही पोटभर जेवता आले नाही.
मतदान साहित्य वाटपात व मतदान झाल्यावर पेट्या जमा करताना अनेकांना ताटकळत ठेवले गेले . महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी इतकेही सुस्त असतात त्याचा अनुभव आधीच्या निवडणूकांत जसा होता त्यापेक्षा या निवडणूकीत जास्तच जाणवले.  असो पुढील निवडणूकीत देव त्यांना सद्बुद्धि देवो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा