बुधवार, ९ एप्रिल, २०१४

एकेकाचे स्वभाव

'व्यक्ती तितक्या प्रव्रत्ती' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाचे स्वाभिविक वेगळेपण नवा द्रष्टीकोन देणारे  असते,  वेगळ्या स्वाभाविक गुणविशेषांमुळे लक्षात राहिलेल्या दोन  व्यक्तींच्या आठवणी सांगतो. 
 १)   गावातल्या जि. प . च्या शाळेतले एक गुरुजी खूप तापट होते. ते  आम्हाला गणित शिकवायचे . साधी सरळ पध्दत सांगूनही मला काही गणित जमेना तेव्हा ते जाम भडकायचे , हातातल्या छडीने झोडपून काढायचे.  त्याच्या   माराच्या भीतीनेच मी व इतर विद्यार्थ्यांनी गणितात थोडीफार प्रगती साधली.   एकदा ते वर्गातल्या मुलांना घड्याळ शिकवत होते,  शाळेच्या मागच्या बाजूला झाडाखाली रेती टाकली होती तिथे आमचा वर्ग सुरु होता.  गुरुजी खुर्चीवर बसून दोन्ही पाय टेबलावर ठेवून डोक्यावरील टोपी डोळ्यांवर घेऊन झोप काढायचे, मग शिकवायचे . त्या दिवशी त्यांच्या हातातलं घड्याळ काढून ते काटे फिरवत व  एकेकाला जवळ बोलवून विचारायचेत :  त्यांनी मला बोलावले,  दोन तीनदा विचारल्यावरही मला धड सांगता न आल्याने त्यांनी टेबलावरच्या पायाने माझ्या छातीत बक्कदिशी  लाथ मारली,  मी रेतीत दूरवर घसरत गेलो तेव्हापासून पुढे मला घड्याळ नवीन शिकवायची गरजच पडली नाही.  'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' याचा प्रत्यय देतांना ' लातोंका भूत बातोंसे नही समजते ' याही म्हणीची ओळख करून दिली तीही अवघ्या ९ / १० वर्षाच्या वयातच . विद्यार्थ्यांबद्दलची पोटतिडीक व कर्तव्य दक्षता अशा दोन्ही बाबी त्यांच्या स्वभावात होत्या म्हणूनच ते संताप करायचेत  विद्यार्थ्यांबद्दलची काळजी निव्वळ गोड बोलून व्यक्त होतेच असं नाही. संतापातून साधनेकडे नेण्याचा त्यांचा ओढा होता.
   २) झिंगा  दाजी , एक साधा - सरळ माणूस.  सलग पाच सहा वर्षे त्यांच्या सोबत मी वावरलो.  सकाळी भल्या पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कामात मग्न असायचे.  मजूरीवर उदरनिर्वाह असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सर्वसाधारण होती. त्यांना दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.  मुलींची लग्ने होऊन त्याही सासरी गेल्या.  घरात एकटे दाजी उरले , तशाही परिस्थितीत कोणतही दु:ख न व्यक्त करता हा माणूस वयाच्या ७५ वर्षापर्यंत हसत खेळत वावरला.  "ठेविले अनंते तैसेचि राहावे,  चित्त असू द्यावे समाधानी " या संतवचनाचा प्रत्यय त्यांच्या जगण्यातून डोकवायचा.   अतिशय शांत , सोशिक , विनम्र,  प्रामाणिक,  कामसू व दिलदार मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती.   
वरील दोन्ही व्यक्तींच्या स्वभावात दोन विरोधी टोकं होती  पण दोघांच्या  स्वाभाविक वर्तनातून शिकायला मिळालं की माणसाकडे ऐहिक गोष्टी असोत वा नसोत पण त्याचा आत्मिक द्रष्टिकोन जसा असेल तशा पध्दतीने समाजात त्याची प्रतिमा ठरते . आतल्या आवाजाला प्रतिसाद देणारी ही माणसे असावीत म्हणूनच ते अजूनही मनाच्या गाभार्यात आहेत , इतर कित्येक जण मात्र दाट कळोखात गुडूप झाली आहेत . 
........................................................................................................................ 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा