गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

असेच वसंतराव पुन्हा अवतरतील का ?

 
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  शिक्षण महर्षी पूज्य दादासाहेब लिमये यांच्या निधनाने सुधागड परिवार शोकसागरात बुडाला होता. दादासाहेबांच्या नंतर घराणेशाही प्रमाणे रवींद्र लिमये यांच्याकडे सुधागड एज्युकेशनचं अध्यक्षपद येईल अशी चर्चा संस्थेत सर्वत्र सुरू असताना रवींद्र लिमये यांनी उदारपणे नि विनम्रपणे  सुधागड एज्युकेशन सोसायटीची पूर्ण जबाबदारी वसंतराव गणेशमल ओसवाल यांच्याकडे सोपवली आणि उलट सुलट चर्चांना तोंड फुटले. कोण आहेत वसंतराव ओसवाल ? त्यांचे सुधागड संस्थेसाठी कोणते योगदान आहे ? दादांची उणीव वसंतराव ओसवाल भरून काढतील का ?  रवींद्र लिमयेंनी असे का केले ? इत्यादी. असंख्य प्रश्न संस्थेतील आणि संस्थे बाहेरील अनेकांनी उपस्थित केले होते तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना संभ्रमात टाकणारे होते. पण या सगळ्या प्रश्नांना आपल्या कर्तुत्वाने वसंतरावांनी पहिल्या तीन वर्षातच चोख उत्तर दिले. सुधागड एज्युकेशन सोसायटी बद्दल दादासाहेबांना जितके प्रेम होते , काळजी होती , आस्था होती , तळमळ होती त्याच तोडीचे कर्तुत्व वसंतरावांनी सिध्द केलं. सुधागड एज्युकेशन सोसायटीचा लौकिक दिवसेंदिवस वाढवत नेला. अनेक समस्यांचा ,  अनुत्तरित प्रश्नांचा धीरोदात्त पद्धतीने निपटारा केला नि दादासाहेबांच्या स्वप्नातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या  उदयाला प्रारंभ झाला. 
दादासाहेब यांना विद्यार्थी हीत जपणारी , सामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणारी, निरपेक्ष भावनेने विद्यादानाचे कार्य करणारी शिक्षण संस्था अपेक्षित होती पण काही हरमाखोर , नालायक , स्वार्थी ,कपटी , संधीसाधू  पदाधिकाऱ्यांनी आणि मुख्याध्यापकांनी दादासाहेब यांच्या साध्या - भोळ्या स्वभावाचा ,  दयाळू - मायाळू वृत्तीचा गैरफायदा उचलून आपल्या तुंबड्या भरायला , कट कारस्थान करायला , सामान्य कर्मचाऱ्यांना छळायला सुरुवात केलेली होती; परिणामी सुधागड एज्युकेशन सोसायटीचा लौकिक आणि आर्थिक कणा खिळखिळा झाला होता.कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत होते. अशा वेळी वसंतरावांनी सुधागड एज्युकेशनचं अध्यक्षद स्वीकारणं हा या संस्थेचा भाग्योदय म्हणावा लागेल. 
संस्थेतील मस्तवाल वागणाऱ्या , स्वार्थी , लबाड कपटी लोकांना पळता भुई  थोडी झाली. "तळे  राखील तो पाणी चाखील" असे म्हणत दादासाहेबांनी ज्यांना लाडावून ठेवले होते : कडेवर बसवले होते त्यांचे सगळे लाड वसंतरावांनी बंद केलेच शिवाय शिस्तीत चालायला भाग पाडले. 
संस्थेच्या अनेक शाळांच्या  इमारतींचे कर्ज कशामुळे थकले ? त्याला जबाबदार कोण ? त्यावर काय रामबाण उपाय करता येईल ? याची पद्धतशीर आखणी केली नि  त्यानुरुप कार्यपद्धती राबवली. बघता बघता काही वर्षातच संस्थेचा कायापालट झाला. अनागोंदी कारभार करणाऱ्या संस्थेतील तथाकथित म्होरके यांना वठणीवर आणले. मग्रूर , बेलगाम वागणाऱ्या मुख्याध्यापकांच्या मुसक्या बांधल्या. नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुका ,  त्यांच्या शासकीय मान्यता , कायम कर्मचाऱ्यांच्या बदल्या - बढत्या  , पदोनत्या यात गुंतलेल्या भ्रष्ट लोकांना बाजूला केले. चमकोगीरी करणाऱ्या चमच्यांना त्यांची जागा दाखवली.  थोडक्यात काय तर संस्थेला लागलेली कीड , जळमटे पार धुवून काढली. अल्पावधीतच  सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा गळ्यातील ताईत बनून वसंतराव नावारूपाला आले.
 बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी वसंतराव त्यांच्या वृद्धापकाळाने अनंतात विलीन झाले. ५ सप्टेंबर रोजी (शिक्षक दिनी ) वसंतरावांच्या अंत्यविधी समयी त्यांचे अंत्य दर्शन घेतले नि एक सामान्य शिक्षक म्हणून मला प्रश्न पडला की मला हवे असलेले असेच वसंतराव पुन्हा अवतरतील का ? 
--- श्री. संजय माधवराव पाटील , उप प्राचार्य , कळंबोली ( नवी मुंबई ) ------
  स्वर्गीय  वसंतराव ओसवाल साहेबांना प्रथम स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! 
( ४ सप्टेंबर २०२५)

२ टिप्पण्या:

  1. कै. दादासाहेबांनंतर ओसवाल साहेबांनी संस्था खरोखरच उर्जितावस्थेला आणली. संस्थेची वाटचाल आधुनिकतेकडे सुरू झाली.परखड आणि सुंदर लेख.👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा