मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

शिक्षक - शिक्षकेतर नि शिक्षणाचा बाजार !

 शिक्षक - शिक्षकेतर नि शिक्षणाचा बाजार ! 

शिक्षण हे वाघिणेचे दूध आहे ते पिणारा गुरगुरनारच ! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार प्रेरणादायी बनला आणि पाहता पाहता अनेक अशिक्षित , अल्पशिक्षित कुटुंबातील मुले मुली शिकून स्थिरस्थावर आयुष्य जगू लागली. शेती नि मातीत राबराब राबणाऱ्या कुटुंबातून कित्येक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व शिक्षणाने समृद्ध झालेत नि आज समाजात सन्मानाने जगताहेत. अशी शिक्षणाची महती  लक्षात घेऊन अनेकांनी आपली धुळपाटी फळ्यावर रेखाटण्यासाठी कंबर कसली.  
   सामान्य कुटुंबातील तरुणाने महागड्या शिक्षणाच्या धबडग्यात न अडकता समाजातील सोपा मार्ग निवडला नि  कित्येक जन शिक्षक शिक्षकेतर झालेत व होताहेत.  पण त्या शिक्षकाला किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला जे सोसावे /  किंवा भोगावे लागते आहे ते खूप भयानक / विदारक आहे. 
  आई - बापाने उसने पासणे जमवून उभे केलेले पैसे कमी पडू नयेत म्हणून कित्येकांनी वडिलोपार्जित जमिनी विकून शिक्षण क्षेत्रातील नोकरीसाठी वारेमाप पैसे खर्च केलेत / करताहेत .  नोकरीसाठी पैसे लागत नाहीत तर शिक्षण महत्वाचे म्हणण्याचे दिवस कधीच संपवले गेलेत.  संस्थेची मान्यता , बिंदू नामावली , विषयाची मान्यता , वर्कलोड मान्यता , शासनाची मान्यता ,  वैयक्तिक पदाला मान्यता ,  शालार्थ आयडी मान्यता अशा प्रत्येक पायरीवर लाखांचे नवस बोलून ते  फेडण्यासाठी पोतडीभर नारळ फोडावे लागत आहेत : तेव्हाकुठे प्रसाद म्हणून एक खोबऱ्याचा तुकडा हातावर येतो आहे. 
 शासनाचा पगार सुरू होईपर्यंत संस्था चालकांनी उदारपणे दिलेल्या  तुटपुंज्या उचल मधून घरभाडे , घरखर्च होऊन हातात कवडीही राहत नाही तरीही आशावादी बनून पाच ते पंधरा वर्ष आर्थिक ओढाताण सहन करून जे टिकून राहतील त्यांना सुखाचे दिवस येतील म्हणत कित्येक अभाग्यांच्या घरी आजही काळी दिवाळीच साजरी होतेय. कारण आहे शिक्षण क्षेत्रातील बोकाळलेला प्रचंड भ्रष्टाचार ! 
शिक्षक बनून पिढ्या घडवण्याचे फाटके स्वप्न कित्येकांनी बघितले : हातात पणती घेऊन काहींचे स्वप्न तेवत राहिलेत तर काहींचे विझलेत / काहींचे भंगलेत. याला कारणेही तशीच आहेत . 
  संस्था चालकांचे हुजरे ( चमचे ) आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या दलालांनी कित्येक मास्तरांच्या आणि मास्तरेतर लोकांच्या झोळ्या रिकाम्या करून आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. मास्तरांच्या झोपडीत अंधार आणि मुजोर संस्था चालक व मस्तवाल अधिकारी आणि त्यांच्या चमच्यांच्या घरी रोषणाई अशी आजची विदारक दिवाळी साजरी होतेय. त्यात काही हरामखोरी करणाऱ्या मुख्याध्यापकांनी कहरच केला आहे. काही नालायक मुख्याध्यापकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कित्येक शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या बापाचे नोकर समजून नको नको तितका त्रास देणे सुरू केले आहे . नोकरीला असलेल्या लोकांना कधी समायोजन करताना तर कधी  वरिष्ठ वेतनश्रेणी , निवडश्रेणी , पदोन्नती देताना या लांडग्यांनीं एकूण फरक बीलातील १० ते १५  % लचके तोडायचे धंदे सर्रास  सुरू ठेवले आहेत . संस्था चालकांचे आणि अधिकाऱ्यांचे आपणच दत्तक पुत्र समजणाऱ्या  ढोंगी मुख्याध्यापकांचा माज प्रचंड वाढला आहे. वाघाचे कातडे पांघरून ओझी वाहणारे गाढव अशी गत काही बिनलाज्या मुख्याध्यापकांची झालेली आहे ; असे मुख्याध्यापक जागोजागी उकिरडे हुंगताहेत म्हणूनच सामान्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा फराळ विटत चालला आहे .  लाचार / लाडघोटे  मुख्याध्यापक (चमचे) संख्येने वाढले आहेत. वाढत आहेत.  पावसाने झोडले नि राजाने छळले तर दाद कोणाकडे मागायची ? अशा विवंचनेत कित्येक शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढेही मोडत राहणार आहे.  
ही प्रतिकूल परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे .
 कित्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले अर्धे आयुष्य बिन पगारी नि अल्पपगारी नोकरी ( चाकरी ) करून खर्ची घातले आहे.त्यात भरीस भर म्हणून शासनाच्या धोरणांनी शिक्षण आणि शिक्षकांचे पावित्र्य रसातळाला नेले आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद होताहेत नि इंग्रजी माध्यमांसह सेल्फ फायनान्स शाळांचे पेव  फुटले आहे.  विना अनुदानित , सेल्फ फायनान्स , अनुदानित  २० % , ४०% , ६०%, ८०% , १००% पगारदार , जुनी पेन्शन वाले , नवीन पेन्शन वाले असे १२ गट करून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचे १२ वाजवून  विटंबना अविरत सुरू ठेवली आहे. 
कधीकाळी सेवाधर्म हाच स्वधर्म असलेले  पवित्र मानले गेलेले शिक्षण क्षेत्र आज भ्रष्टाचाराने बरबटलेला बाजार बनून कानठळ्या बसवणाऱ्या हाळ्या देत आहे. बैल बाजारात बैलांचा / गुरांचा लिलाव होतो तसा लिलाव शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षणाचा सुरू आहे .याला वेळीच पायबंद घातला गेला तरच शिक्षणाचे मांगल्य जपले जाईल अन्यथा  शिक्षण , शिक्षक आणि शिक्षकेतर हंबरडा फोडतील आणि म्हणतील : अरे हरामखोरांनो , जनाची नाही किमान मनाची लाज बाळगा ! भीक नको कुत्रे आवरा ! माणसाला माणूस बनून जगू द्या !  बेबंदशाही मोगलाई सरु द्या ; इडा -  पिडा टळू द्या ; शिवरायांचे सुराज्य पुन्हा अवतरू द्या ! 
------- प्रा. संजय माधवराव पाटील. ------  (दिवाळी २०२५)







 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा