मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

अंधारलेल्या झोपडीत जाणीवची पणती !

दिवाळीनिमित्त रिटघर आदिवासी वाडीवर  जाणीव आणि रोटरीचा एक घास वंचितांसाठी 
पनवेल : गेल्या दोन वर्षाप्रमाणे यंदाही जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे १९ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त रिटघर आदिवासीवाडी येथील आदिवासी मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
           जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सचिव रुपेश यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर या उपक्रमाचे प्रकल्प संचालक महेश मुद्रस यांनी या उपक्रमामागील उद्देश सर्वांना सांगितला . दिवाळीचा आनंद या चिमुकल्या मुलांसोबत साजरा करताना सदस्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. या वाडीवरील शाळाबाह्य मुलांसाठी रोज दोन तास शिकवण्याचे काम सेवाभावी वृत्तीने करणाऱ्या मनोहर ढोके आणि त्यांची कन्या अर्चना यांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असल्याचे आवर्जून सांगून त्यांनी श्री ढोके यांना धन्यवाद दिले. रोटरीच्या वतीने रो. बाळकृष्ण आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
        दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी या वाडीवरील २५ ते ३० मुले आणि त्यांचे पालक यांचेसह एकत्रित दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि दिवाळीचा एक वेगळा आनंद अनुभवला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदस्यांनी या चिमुकल्या मुलांसाठी व पालकांसाठी आणलेले कपडे, खेळणी, चप्पल्स, शूज इ. नित्योपयोगी वस्तू या मुलांना दिल्या. 

    यावेळी या वाडीवरील एका पालकांनी आपल्या मनोगतातून श्री ढोके सरांच्या सामाजिक कामाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
            या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरीचे २२ सदस्य आपल्या परिवारातील सदस्यांसह उपस्थित होते. या कार्यक्रमातून एक वेगळे समाधान मिळाल्याचे तसेच अशा उपक्रमातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो असे सहभागी सदस्यांनी सांगितले.
           यावेळी श्री ढोके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येथील मुलांची पार्श्वभूमी सांगून गेली तीन वर्षे जाणीव आणि रोटरी मार्फत होत असलेल्या अशा उपक्रमाबाबत  तसेच इतर वेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले.
----- वृत्तांकन : श्री. रुपेश यादव ----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा