रविवार, २ ऑगस्ट, २०२६

कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन येथे जाणीव सामाजिक संस्थेकडून भात लावणी पूर्ण !

जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने रविवार दिनांक : २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शांतीवन कुष्ठरोग निवारण समिती तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील अर्धा एकर शेतात भात लावणी करण्यात आली. 
शांतीवन संस्थेतील कुष्ठरोगातून पूर्णपणे मुक्त झालेले सदस्य श्री निळकंठ कोळी यांनी सर्व जाणीव सदस्यांना भात लावणी बाबत अनमोल मार्गदर्शन व सहकार्य केले. शिवाय कुष्ठरोग अनुवंशिक नाही , कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार नाही , कुष्ठरोगावर मात केलेले हजारो रुग्ण समाजात सन्मानाने जीवन जगत आहेत इ . बाबत स्वतःचे अनुभव त्यांनी सांगितलेत व जाणीव सामाजिक सेवा संस्था , रोटरी क्लब ऑफ सनराईज यांच्या सर्व सदस्यांबाबत अभिमान असल्याचे मत व्यक्त करून आभार मानले. 
जाणीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी जाणीव व्हॉट्स अप ग्रूपवर व्यक्त केलेल्या भावना खालील प्रमाणे : 
"आज खूप मज्जा आली. अर्धा एकराचे शेत २१ जणांनी भर पावसात श्रमदान करून, हास्य विनोद आणि धम्माल करून भात लावणी केली. शांतीवनच्या मंडळींनाही विश्वास नव्हता की आपण संपूर्ण शेत पूर्ण करू. 
अनुपस्थित सर्व जणीवन्स यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. 
आपण सर्वांनी यायला हवे होते. असो. 
शांतीवनचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर आणि खजिनदार सौ रेखाताई देखणे यांनी सर्व टीमला धन्यवाद दिले आहेत.
आपल्या भोजनाचे बिल त्यांनी घेतले नाही. 
आज पाऊसही छान होता आणि लावणी संपल्यावर ओढ्यातील पाण्याचा आस्वादही सर्वांनी छान घेतला.
एकंदरीत छान प्रोग्राम झाला. आजची एकूण उपस्थिती २१ होती. 
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद."
वार्तांकन : प्रा. संजय पाटील 
जाणीव व रोटरी सदस्यांना श्रमदानाचे महत्व कृतीतून सिद्ध करण्याची संधी देणारे : श्री विजय गोरेगावकर .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा