सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

माझं गाव

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यतील      भिलाली हे माझं गाव. गावाच्या लगतच पश्चिमेला बोरी नदी वाहते ; हे  आमच्या गावाचं नैसर्गिक वैभव. शेती हाच गावकर्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बोरी नदी आमच्या सर्वांचं पालन पोषण करणारी  आई आहे . या नदीचं पात्र खूप मोठं आहे . पावसाळ्यात  नदीला येणारे प्रचंड पूर काळजात धडकी भरवणारे असतात. काही वर्षांपासून बोरी नदीवर तामसवाडी या गावाजवळ धरण बांधलं गेल्याने सध्या मोठे पूर येत नाहीत पण पाऊस जास्त झाला की गावकरी अजूनही धास्तावतात.
  गावाबाहेर  सोमगिर      महाराजांचे  समाधी   मंदिर  आहे .  अति  प्राचिन हेमाडपंथी  या  मंदिराचे बांधकाम घोटीव    चिरेबंदी  दगडात  केलेले  असल्याने   हे  मंदिर   अजूनही  भरभक्कम  आहे  .   सोमगिर      महाराजांबद्दल  गावातील  सगळ्यांची अपार    श्रद्धा आहे  . कधी काळी  बोरी नदीच्या पूराचे पाणी गावात घुसायचे तेव्हा सोमगिर महाराजांना साकडे घातले जायचे; नवस केले जात व नदीला साडी-चोळीचा आहेर भक्तीभावाने अर्पण केला जायचा . साधारणत: ३ ते ४ तासात पुराचे पाणी ओसरायचे . देवाने व नदीने आपली प्रार्थना ऐकली असं मानलं जाई आणि यथावकाश नवस फेडले जायचे.  दर एकादशीला सोमगिर महाराज मंदिराच्या सभामंडपात भजन - किर्तन होते. सुगीच्या हंगामात शेतात पिकलेलं धन धान्य देवाला नैवद्य म्हणून चढवलं जातं. सण समारंभाचा गोडधोड जेवणाचा पहिला ताट देवळात जातो . 
   रोज पहाटे गावात प्रभातफेरी होते.' हरे राम हरे राम राम राम हरे हरे , हरे क्रुष्ण हरे  क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे 'असा  जयघोष करत वारकरी भाविक न चुकता  रोज भक्तीभावाने प्रभातफेरीत सहभागी होतात . त्यानंतर देवळातल्या स्पिकरवर भक्तीगीत वाजवले जातात . दररोज सकाळी नित्यनेमाने हे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. 
  गावात प्रत्येकाच्या सुखदुखात सगळे एकदिलाने सहभागी होतात . गरिबातल्या गरिबाला मदतीचा हात दिला जातो. भांडण तंटे गावातच मिटवण्याचा प्रघात आहे पण लोकसंख्या वाढल्याने  काही तंटे पोलिसांपर्यंत जातात.  गावातले सर्व रस्ते काँक्रीटचे  आहेत . पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे.दिवाबत्ती , साफसफाई वेळच्यावेळी होते. गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ,प्राथमिक आरोग्य केंद्र आहे , १० वी पर्यंत शाळा आहे ,सबपोष्ट आहे. किराणा मालाची १० ते १२ दुकाने आहेत , दोन खाजगी दवाखाने आहेत. सर्व सुविधांनी परिपूर्ण गाव अशी माझ्या  गावाची ओळख आहे.
.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा