सोमवार, १० फेब्रुवारी, २०१४

चेंबूर भवन

संत निरंकारी मिशनच्या चेंबूर भवन येथे रविवार दि. ०९ /०२/२०१४ ला आम्ही गेलो होतो. धर्माधिकारी सरांची व माझी अशा दोन गाड्यात 11 जण होतो. सकाळी १०.३० ला निघालोत. ११.४५ ला भवनात पोहचलो. तेथे विचार सुरु होते . व्यासपिठावरील महात्मा सांगत होते " प्रेमाच्या व्यतिरिक्त संसार सुना असतो,आपण सर्व एक आहोत,समाजाच्या सेवेतच सर्व सुख आहे , बाबाजींच्या आदेशाचे पालन करणे हाच आपला धर्म आहे इ." हे सर्व विचार ऐकताना मनात अनेक विचारांचं काहुर माजलं होतं. तेथे बसलेल्या हजारो भाविकांना आपण सर्व एक आहोत ,सेवा हेच सर्वसुख आहे ,प्रेमाने बोला इ. विचार जरी पटत असले तरी त्यातील किती लोकं प्रत्यक्ष व्यवहारात तसे वागत असतील ? येथून बाहेर पडल्यावर त्यांच्या संपर्कात येणार्या सगळ्यांना ते आपले मानत असतील का ? भक्ती महत्वाची पैसा नव्हे हा विचार बोलणार्या व्यक्तीने अनेकदा सांगितला पण लोकांना पैसा आणि भक्ती यात निवड करायला सांगितले तर ९५ टक्के लोक पैशाला प्राधान्य देतील . मग बाबा बुवांच्या सत्संगात व्यक्त होणारे विचार हवेत विरत असतील का? अशा अनेक प्रश्नांचा गुंता सोडवत सोडवत मला असं वाटतं की  किर्तन - प्रवचने ऐकायला सोपी व  आनंददायी असतात पण आचरणात आणायला  तेवढीच कठीण वाटतात. बाबांच्या मठ आश्रमांसाठी किंवा त्यांच्या मोठमोठ्या दिमाखदार कार्यक्रमांसाठी होणारा प्रचंड खर्च गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ,औषधोपचारासाठी  केला तर केवढी मोठी समाजसेवा घडेल. पण धर्माच्या नावाने जमा होत असलेला पैसा मठ मंदिरांसाठी व सोन्या रुप्याच्या मूर्त्यांसाठी वापरला  जात  आहे  .बाबांच्या  उपदेशाकडे कानाडोळा करुन स्वताची तुंबडी भरण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अबलंब होतो आहे . देवांच्या यात्रा जत्रा करण्यासाठी व नवस सायास   पुरे   करायला कर्ज काढले जाताहेत. मशिद, मंदिरांच्या व चर्चच्या दानपेट्यांमध्ये जमा होणारे धन  चुकीच्या व्यक्तींच्या हातात सापडल्यास अनर्थ ओढवण्याची भीती कायम आहे . कर्मवाद कमी होतो आहे आणि दैववाद वाढतो आहे परिणामी  आळस वाढतो आहे .   
अरिष्ट थोपवायचं असेल तर देवांना अवतार धारण करावा लागतो ,  सर्व धर्मातील आजच्या बाबांनी , संतांनी , महंतांनी व विश्वस्तांनी अवतारी  बनून नेमका खरा धर्म लोकांना शिकवावा . त्यासाठी जसं सामान्य माणसाला सर्वसंग त्याग सांगितला जातो तसा त्याग साईबाबांचा आदर्श घेऊन जे कोणी करतील तेच सिध्द पुरुष किंवा अवतारी आपण का मानू नये ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा