शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

आत्मघात

सुंदर ,खेळकर , हसरी , मनमोकळी अशी होती ती . येताजाता हाय अंकल , बाय अंटी बोलल्याशिवाय तिला चैन पडत नसे. सण समारंभाचे निमंत्रण द्यायला तीच यायची. नवीन ड्रेस आणल्यावर आपुलकीने दाखवायची . गोडधोड जेवायला आवडायचं तिला ; गुढी पाडव्याच्या दिवशी मुद्दाम सांगायची की पुरणपोळ्या केल्यावर बोलवा म्हणून . तिला आपलं परकं असं  वाटत  नव्हतं. घरातलीच एक सदस्य म्हणून  ती  आमच्या  घरात वावरायची .
एके दिवशी छटपूजेचं निमंत्रण द्यायला आली  . आग्रहपूर्वक बोलली.आम्हाला नकार देणं शक्यच नव्हतं. आम्ही पूजेच्या ठिकाणी  गेलो .अगदी मनोभावे पूजा करताना  दिसली.  त्या दिवशी तिच्या वागण्या बोलण्यात नेहमीचा अवखळपणा नव्हता ; तर  धीरगंभीर वाटली .
     तिचं   नाव  अर्पिता पण  सर्वजण तिला सोनी    म्हणायचे .  ती  पिल्लई काँलेजला इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला होती. वार्षिक निकाल लागला होता पण तिने घरात त्याबाबत काहीही सांगितले नव्हते . त्या  दिवशी   तिचे वडील ड्युटीवर गेले होते  तर आई बाजारात गेली होती .  साधारण संध्याकाळी  ५ वाजता  तिची आई घरी आली  . दारावरील बेल वाजवून प्रतिसाद न मिळाल्याने आमच्याकडे चावी दिली का म्हणून चौकशी केली. पण चावी दिली नसल्याने त्याही चिंतेत पडल्या . त्यांनी त्यांच्या मिस्टरांना फोन केला , ते वाटेतच आहेत व लवकर येतील असं समजलं . सोनीच्या आईने ( गुप्ता भाभी ) हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या आमच्या घरात ठेवल्या नि त्या पुन्हा बाहेर गेल्या .
  ६ वाजता गुप्ताजी आणि गुप्ता भाभी सोबत घरी  आले. आमच्याकडे ठेवलेल्या पिशव्या घेऊन गुप्ताजीकडे असलेल्या चावीने त्यांनी दरवाजा उघडला . आणि प्रचंड रडण्याचा आवाज कानावर आला . आम्ही गोंधळलो . काय झाले म्हणून बघायला धावलो तर गुप्ताभाभी मोठ्यांने हंबरडा फोडून रडत होत्या आणि गुप्ताजी सोनीच्या पायाला धरुन ओक्साबोक्सी रडताना दिसले.
  बेडरुम मधल्या पंख्याला सोनी लोंबकळत होती. काय करावे सुचेना ; पण शेजारी या नात्याने गुप्ताजींना सावरलं  . सोनीला वाचवता   येईल या  अपेक्षेने पंख्याला  अडकलेल्या सोनीला   सोडवण्यासाठी   मी  धडपडत  होतो   ; पण  माझे  हातपाय  थरथरत  होते ;  त्यात   त्या    दिवशी    लाईट   नसल्याने  घरभर अंधार दाटला होता म्हणून माझ्या पत्नीने मेणबत्ती आणली. पण  तिचे हातही प्रंचंड थरथरत होते . कसंबसं सोनीला खाली उतरवत असताना बिल्डिंगमधील बरेच जण जमा झाले होते .  माझ्या मदतीला ईवान भाभी  आल्या , त्यांनी धाडस दाखवल्याने सोनीला उतरवून मी खांद्यावर घेतलं आणि अरुणोदय हाँस्पिटल मध्ये नेण्यासाठी जिना उतरु लागलो, मग सोसायटीचे तेव्हाचे सेक्रेटरी अधिकारी आले . त्यांनी व मी सोनीला दवाखान्यात नेले. लाड मँडमने सोनीला तपासले नि "स्वारी ,काही होणार नाही " असं म्हटल्या . मी मटकन खाली बसलो.   सुनिल घरत  व इतर   दोघा-तिघांना  फोन  केले  पण   ते  येईपर्यंत धीर धरवत   नव्हता   लगेच  सेक्टऱ १० चे  त्यावेळचे  नगरसेवक   अशोक  शेळकेंना   फोन  केला , ते  आले  . थोडा  धीर आल्यावर   गुप्तांजींना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले . पोलीसांनी बरेच प्रश्न विचारले . रिपोर्ट झाल्यावर पुन्हा दवाखान्यात आलो .तेथे माझे माजी विद्यार्थी भेटले ;   ते मनसेचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी पुढील सर्व सोपस्कार करायला खूप मदत केली. रात्री १० वाजता पोलीसांनी मला , माझ्या पत्नीला पोलीस चौकीला बोलावले .  सोबत ईवान भाभी आल्या . आमचे तिघांचे जवाब नोंदवून आम्हाला घरी सोडले. 
     मी सोनीला उतरवले होते म्हणून मी अडचणीत येईल असं बरेच जण मला सांगत होते म्हणून मी तणावाखाली वावरत होतो . भामरे सर , वाल्मिक , खैरनार सर ही मंडळी   रात्रभर माझ्या सोबत होती .
  दुसर्या दिवसापासून जवळपास महिनाभर मला अस्वस्थ वाटले. हे सगळं लिहितांना आजही मला  सोनीच्या आत्महत्येमागील कारण न समजल्याचे व तिच्या आकस्मिक जाण्याचे दु:ख कायम आहे . तिच्या म्रतात्म्यास चीरशांती लाभो असं म्हणत नियती पुढे आपण हतबल ठरतो.
  आजच्या तरुण पीढीला छोटेमोठे अपमान सहन होत नसल्याने आत्महत्येचा विचार करावा लागतो; हेच तरुणांचे मन  खंबीर नसल्याचं द्योतक आहे. ज्या कुटुंबात तरुण अथवा तरुणीने आत्महत्या केली असेल अथवा तसा प्रयत्नजरी झाला असेल अशा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अपमानास्पद वाटतं. जीवनात चढ-उतार येतच असतात ; संकटांशी सामर्थ्याने संघर्ष केल्याशिवाय आयुष्याचे सौंदर्य वाढत नाही, जीवन  खूप सुंदर आहे त्याकडे सकारात्मक द्रष्टीने बघितले तर चांदण्यांचं शिंपण दिसतं  आणि नकारात्मक बघितलं तर भकास काळरात्रीचा भास होतो. आपल्या द्रुष्टीकोन जसा असेल तसं आपल्याला दिसतं. हसत हसत जगायचं की रडत कुढत हे आपणच ठरवायचं .
....................................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा