रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

वसंत काका

वसंत त्र्यंबक सोनार हे माझ्या वडिलांचे मित्र होते.  ते मूळचे जामनेरचे पण व्यवसायानिमित्त अमळनेरला स्थायिक झाले होते . पाण्याचे पंम्प रिवांयडिंग , इलेक्ट्रीक फिटिंग ची कामे ते करत असत . अमळनेरच्या मुख्य बाजारपट्यात त्यांचं दुकान होतं.  हा माणूस खूप प्रामाणिक आणि गुणी होता पण त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.  ते  गावोगावी   जाऊन    इलेक्ट्रीकची   कामे करत असत . आमच्या गावातील बरीच कामे ते करायचे म्हणून वडिलांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.  
मी ७ वी पास झाल्यावर त्यांच्याच आग्रहाने ८ वी पासून अमळनेरच्या प्रताप हायस्कूल मध्ये शिकायला आलो. गावातून अमळनेरला येण्याजाण्यासाठी सोय होती पण नदीचे पूर व माझे वय लक्षात घेऊन वसंत काकांनी मला त्यांच्या घरी राहण्यासाठी बोलावले. त्यांची रुम खूप लहान होती पण मन मोठं होतं  .  त्यांची पत्नी, १ बहीण, ४  मुले त्यात मी या सर्वांना तेवढ्या खोलीत अडचणीचे होईल म्हणून मला त्यांच्याच खोली शेजारी एक रुम भाड्याने घेतली .  त्या खोलीत आम्ही सगळे मुलं अभ्यास करायचो, झोपायचो . ८ वी ते १० वी पर्यंत मी वसंत काका व मावशीच्या आश्रयात राहिलो . 
  या  तीन वर्षात या कुटुंबाने मला जे प्रेम दिलं , जे संस्कार दिलेत त्यामुळेच मला जगण्याची दिशा सापडली , घडता  आलं  ; अन्यथा माझ्या भावंडांसारखं मलाही शिक्षण सोडून शेती करावी लागली असती .  काका आणि मावशीने माझ्या आई वडिलांप्रमाणे मला सांभाळलं .कोणतही काम करण्याची लाज बाळगू नको , हा मंत्र मला घरातून दिला होता तर वसंत काकांनी त्या मंत्राची साधना माझ्याकडून करुन घेतली. शाळा सुटल्यावर काकांनी व मावशींनी सांगितलेली सर्व कामं मी आनंदाने करायचो. दळण , पाणी , झाडलोट , दिवाबत्ती व त्यांच्या लहान मुला-मुलीला सांभाळण्याची कामे माझ्याकडे असायची . रात्री काका घरी आल्यावर त्यांचे हात - पाय दाबून देता देता काका माझे पाढे पाठ घ्यायचे , अभ्यासाचे विचारायचे  तेव्हा मात्र मला काकांची भीती वाटायची .  पाढा चुकला  तर काका ओरडायचे किंवा मारायचे ; पण लगेच  जवळ घेऊन म्हणायचे " अरे बेट्या , तू आता मोठा झाला , तुले आता नाही येणार तर कव्हा येईन , शिकायचं वय गेल्यावर कोणाले शिकता येईन का ?  मंग अभ्यासात डोकं खूपसल्याबिन येईन का , सांग बरं ?  , जाय आते , अभ्यास करी घे " असं म्हणत माझी सुटका व्हायची. मी माझ्या खोलीत अभ्यास करतो की झोपलो हे बघायला काका किंवा मावशी हमखास यायचेत . 
  या तीन वर्षात काका मावशीची आर्थिक ओढातान मी जवळून बघायचो . रविवारी घरी आल्यावर आई वडिलांना सांगायचो . मग घरुन धान्य , सरपण , पापड अशी रसद येऊ लागली . काका मानी होते त्यांना हे आवडत नव्हतं पण वडिलांच्या आग्रहास्तव त्यांना नकारही देता येत नसे. 
  ११ वीत गेल्यावर काकांचे घर सोडले . नंतर गावातल्या इतर मुलांच्या हेव्याने मी अपडाउन करत शिकू लागलो. तेव्हाही काका मावशीच्या ओढीने मी त्यांच्याकडे जात येत असे . कालांतराने काकांनी अमळनेर सोडले नि ते त्यांच्या गावी जामनेरला गेले. मग मात्र काका मावशी मला दुरावले . मी नोकरीला लागलो हे समजल्यावर काका मावशीचा आनंद अवर्णिय होता .   मधल्या काळात त्यांच्या मुला-मुलींची लग्न झालीत ,व्याप वाढलेत, रेशन दुकानाचा व्यवसाय विस्तारला व त्यांचं  येणंजाणं  थांबलं .
    काका  मावशीला पनवेलला बोलवायचो पण ते म्हणायचे , " अरे बेट्या , मुंबईले  येणं काई खायाचं काम हाये का , तिथं यायले आम्हाले कसं जमेल , मुंबई पिक्चरमधी बगितली तेव्हाच धडकी भरली , कुठं चुकलो तर ? , त्यापेक्षा तूच ये ना , आम्हाले म्हातार्यांले कशाले बोलवतू "  पण मी हट्टच धरला नि काका मावशी पनवेल आले . आल्या आल्या काका मला बिलगून रडले . मी ही भावनावश झालो .  काका मावशीच्या अधू डोळ्यातून गळणारी टिपं मला जिव्हाळ्याचं दान देत होती.  तर माझे अश्रू त्यांच्या पुण्याईची साक्ष देत होते .
काकांचं निधन झाल्याची बातमी मिळाली त्या रात्री मी एकट्याने एकांत बघून रडून घेतलं . मावशीला भेटलो तेव्हाही खूप रडलो .  त्या रडण्यात काका गेल्याचं दु:ख होतच पण त्या दोघांचं माझ्यासाठीच्या समर्पणाची,योगदानाची , व निर्व्याज प्रेमाची  सय अधिक होती .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा