रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये ग्रंथालय स्थापना : संयुक्तिक निःस्वार्थी प्रयत्न!

शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय साईबाबा प्राथमिक शाळा , पोस्ट ऑफिस जवळ नवीन पनवेल येथे स्थापन करावे या  विचाराने श्री. के.एस.पाटील (काशिनाथ शंकर पाटील ) यांनी आपल्या खास ओळखीच्या लोकांना एकत्र आणून सन २००२ मध्ये चर्चा घडवून आणली. या खास लोकांमध्ये चौधरी साहेब , भगवान जोशी साहेब , विजय गोरेगावकर साहेब , शिंपी साहेब ,  हेमंत गंगाराम पाटील , प्रा. संजय पाटील , वामन खैरनार , नवनीत गावंड इत्यादी मंडळी झपाटल्यासारखी कामाला लागलीत. प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार वर्गणी जमा केली. कागदपत्रांची जुळवाजुळव झाली , जागा निश्चितीसाठी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष कै . दादासाहेब लिमये यांच्या भेटीगाठी घेऊन के.एस. पाटील साहेबांनी साईबाबा प्राथमिक शाळेच्या मैदानातील कोपऱ्यातील जागा देण्यासाठी आग्रह धरला आणि तसे पत्र दादासाहेबांकडून मिळवले. दादांनी मान्यता दिल्यानंतर लगेचच समाजातील दानशूर व्यक्तींकडून बांधकाम साहित्य आणि पहिल्या संचालक मंडळाकडून आर्थिक सहकार्य मिळवून बांधकाम सुरू झाले. ग्रंथालयाच्या दोन खोल्यांचे बांधकाम करून आवश्यक पुस्तके आणि फर्निचरची जुळवाजुळव झाली. वाचक सभासद वाढविणे , वर्षभरात वाचकांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करणे , ग्रंथालयाला मान्यता आणि अनुदान मिळवून देण्यासाठी संचालक मंडळातील सदस्यांना जबाबदारी देण्यात आली. 
शासकीय मान्यता आणि अनुदान मिळवण्यासाठी संजय पाटील आणि गोरेगावकर अशा दोघांनी संयुक्तिक प्रयत्न सुरू केले. CBD बेलापूर येथील ग्रंथालय संचालकांच्या गाठीभेटी , त्यांच्या कार्यालयाच्या अपेक्षेप्रमाणे विहित नमुन्यातील प्रस्ताव , त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करताना खूप वेळा हेलपाटे झालेत नि अखेर ग्रंथालयाला शासनाची मान्यता मिळाली.  अनुदान मिळाले नि सर्व संचालकांच्या कष्टाचे चीज झाले. 
 शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये ग्रंथालयात  हजारो पुस्तके दाखल झालीत.  त्यात स्पर्धा परीक्षासाठीची पुस्तके , साहित्य , पर्यटन , व्यक्तिचित्रे , चरित्र , आत्मचरित्र , कथा , कादंबऱ्या , काव्य , नाटक या विषयांवरील दुर्मिळ पुस्तके मिळवण्यासाठी प्रत्येक संचालक काम करत होते. 
आज या ग्रंथालय वाचनालयाचे एकूण ३०० वाचक सभासद आहेत. त्यांच्या सेवेसाठी एक ग्रंथपाल आणि एक शिपाई कार्यरत आहेत. २००२ पासून आतापर्यंत  ११ संचालकांच्या निस्वार्थी प्रयत्नांना यश आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा