रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

दिलदार माणूस : विजयकुमार जंगम


दिलदार माणूस : विजयकुमार जंगम

रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्र पाली जवळील झाप या गावी प्राथमिक शिक्षण तर  पाली या प्रसिद्ध गावी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून  माध्यमिक शिक्षण , एकलव्य आदिवासी आश्रम शाळा वावलोली येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून , महाड, मुंबई येथून पदवी , मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षण घेऊन विजयकुमार जंगम सरांनी आपली शिक्षण यात्रा पूर्ण केली. 
 सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै . दादासाहेब लिमये यांच्या कृपा आशीर्वादाने पहूर , खवली येथे मुख्याध्यापक तर जांभूळपाळा, मजरे जांभूळपाडा , पाली , पनवेल येथे माध्यमिक शिक्षक या पदावर तब्बल ३२ वर्षे हाडाचा शिक्षक म्हणून अखंड सेवा करणारे श्री विजय कुमार जंगम सर २०१७ पासून पाली येथून बदली होऊन पनवेल येथे आले नि आमची दिलजमाई झाली. 

 विजयकुमार जंगम सरांशी ओळख झाल्यानंतर आजपर्यंत  जंगम सर मला जसे भावले  तसे येथे गोवले आहेत.  निर्भिड व सच्चा पत्रकार , अपार सहानुभूती व्यक्त करणारा सहकारी ,   टेक्नॉसेवी शिक्षक,  अजातशत्रू असलेला मित्र ,  देव आणि धर्माबद्दल सश्रद्ध भाव जपणारे गुरुजी , कुटुंब वत्सल पालक इ. अनेकविध भूमिकेत वावरणारे जंगम सर मी गेली ७ वर्षांपासून अनुभवतो आहे. 
जंगम सरांसोबत ठाणे येथे पत्रकारिता कोर्स करताना आणि तळेगाव येथील डी.एस. एम.  पदविका चे  प्रकल्प कार्य  साकारताना त्यांचा माझा सहवास अधिक दृढ झाला . त्यानिमित्ताने अनेकदा  जंगम सरांसोबत प्रवासाचा योग आला . या सात वर्षात जंगम सरांच्या स्वभावाचा एक विशेष मला खास आवडला तो म्हणजे  कंजुषी किंवा हातचे राखून वागणे - बोलणे त्यांना कधीच जमले नाही. जे असेल ते सरळ बोलून मोकळे होणारे , कुठेही काहीही लपवा छपवी न करता बेधडक / निसंकोच बोलणारा  सच्चा माणूस ! त्यांच्यासोबतच्या   प्रवासात जे काही बोलणे घडायचे त्यात त्यांचा वाटा मोठा असला तरी आत्मस्तुती त्यांच्या बोलण्यातून कधीच मला दिसली नाही. पैसा आणि प्रतिष्ठेचा गर्व किंवा घमेंड त्यांच्या व्यवहारात कधी डोकावली नाही.  पाली येथील त्यांचे दीर्घ वास्तव्य असून ;  सुधागड एज्युकेशन संस्थेतील अनेक पदाधिकारी त्यांचे सहअध्यायी आहेत , चांगले मित्र आहेत  तरी त्या ओळखीचं भांडवल जंगम सरांनी कधीच केलं नाही. जंगम सर मराठी पत्रकार संघाचे आजीव सभासद आहेत शिवाय अनेक दिग्गज साहित्यिक आणि सिने  अभियंते त्यांचे सुपरिचित आहेत , बहुसंख्य दैनिकांचे संपादक आणि पत्रकार त्यांच्या खास ओळखीचे आहेत शिवाय  सार्वजनिक जीवनात जंगम सरांना मोठा मान सन्मान आहे त्याही गोष्टीचे अप्रूप , घमेंड त्यांनी कधी दाखवलं नाही. त्यांनी इतरांना राज्य लेवलचे पुरस्कार मान्यवरांचे हस्ते मिळवून दिले हा त्यांच्या मनाचा उदारपणा म्हणावा लागेल. 
  मैत्रीचे नाते जपताना त्यांचे मनाचे दिलदारपण आणि समंजसपणा  मला अनुभवायला मिळाला ;  तो म्हणजे मी फोर्ड कंपनीची फोर  व्हीलर कार बुक केली होती तेव्हा १०००० रुपये डीलराला अडव्हान्स दिले होते , गाडीची ऑनरोड किंमत लावताना डीलर ने कार इन्शुरन्स ची रक्कम खूप जास्त  आकारली म्हणून मी स्वतः कार इन्शुरन्स काढेल  या अटीवर गाडी घेण्यासाठी मी ठाम होतो तर डीलर ते मान्य करत नव्हता शिवाय दिलेले अडव्हॅन्स परत करत नव्हता.  तेव्हा मी जंगम सर आणि दीपक घोसाळकर सर या दोन पत्रकार मित्रांना डीलर कडे नेले  तरी डीलर ऐकायच्या  मनःस्थितीत नसल्याने जंगम सरांनी मला सांगितले की तुम्ही दिलेली रक्कम आता सोडण्या शिवाय पर्याय नाही : जाऊ द्या , दुसरी कार बुक करा. जंगम सरांचे मी तेव्हा ऐकले पण माझा स्वाभिमान जंगम सरांच्या मताशी सहमत नव्हता ; मग त्यांनी फोर्ड कंपनीला हेड ऑफिसला थेट मेल द्वारे तक्रार करण्यास सुचविले म्हणून मी त्या संबधित कार कंपनीचे  हेड ऑफिस मध्ये मेल करून तक्रार दाखल केली व  माझे भरलेले पैसे मला परत मिळाले. तेव्हाही जंगम सरांनी माझे तोंडभरून कौतुक करताना मला म्हणाले की स्वाभिमानी पत्रकार तुमच्यात दडला  आहे ;  पनवेल चे नवराष्ट्र दैनिकाचे ऑफिस मधील माझे काम तुम्ही सांभाळा . असा उदारमतवादी,  सच्चा दिलदार मित्र २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहे. जंगम सरांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे , समाधानाचे नि  आजच्यासारखे वैभव संपन्न जावो अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो नि थांबतो.  
------ प्रा. संजय पाटील , पनवेल -----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा