बुधवार, २२ जानेवारी, २०१४

भैरोबाच्या नावानं बोss!

मी शेतकरी कुंटुंबातून वाढलो . आई वडील सुशिक्षित असल्याने शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण मला लाभलं; पण शिकतो म्हणून माझे  लाड  झाले  नाहीत . शेतीचं काम दिवसा नसलं तरी रात्रीचं माझ्याकडे असायचं. माझे दोन्ही भाऊ दिवसभर सालदारांसोबत  ऊन्हापावसात राबायचे व रोज रात्रीचे केळी व ऊसाला  पाणी लावणं , गुरांना चारापाणी करणं, गाई म्हशींचं दूध काढणं  अशी हलकी फुलकी कामं मी करायचो. हंगामात मजूर मिळत नसत अशावेळी काँलेजला दांडी मारुन लावणी किंवा मळणीसारख्या महत्वाच्या कामाला हजर राहावे लागे. केळीचं खोड खोदून काढून नवीन लावणीसाठी कंद काढायच्या कामाला खूप श्रम पडायचे , ज्वारी बाजरीच्या कापणीला अंगावर काटा ऊभा राहत असे. अशा जड कामांना मजूर मिळत नाहीत म्हणून ही सर्व जड कामं करावीच लागायची. आजही बहुसंख्य शेतकरी कुटुंबात शिकणार्या मुलांना ही सर्व कामे करावीच लागतात. अशी कामे करतांना हातला घट्टे पडायचे. पायांना गोळे यायचे. कमरेचा काटा ढिला व्हायचा; पण कुरकुर चालायची नाही.
     केळीचं पिक काढल्यानंतर  केळीची  वाळेलेली  पानं  (पत्ती ) व केळीच्या खोडाचा टाकाऊ   भाग  (डबर ) उचलून  बांधावर किंवा  खड्यात टाकावं  लागे.  पावसाळ्याच्या   आधी ही  कामं  करावी  लागत ;  नाहीतर  पाऊस पडल्यावर केळीच्या शेतातली पत्ती आणि डबरमध्ये  साप,  विंचू  निघतात . एकदा हा  कचरा  उचलायच्या आधीच पाऊस पडल्याने   या कामासाठी मजूर मिळत नव्हते. शनिवार रविवार बघून मला व लोटन बापूजीला ही जबाबदारी दिली गेली. लोटन बापूजी आमच्याकडे सलग तीन वर्ष कामाला असल्याने बापूजी घरातल्यासारखं काम करायचे.सकाळी ७ वाजता कामाला सुरवात केली. पत्तीचा भारा दोरखंडात बांधून खांद्यावर लादायचा नि बांधावरच्या चिंचेच्या झाडाखालच्या खड्यात टाकायचा असा खेळ सुरु होता. ११ वाजेपर्यंत सुरळित सुरु होतं आणि नंतरचा भारा बांधून मी खांद्यावर लादला व चालत असताना भार्यातल्या सापाने माझ्या उजव्या हाताला चावा घेतला. भारा फेकून मी मोठ्यानं ओरडलो. बापूजी माझ्या मागेच असल्याने मला साप चावल्याचे त्यांनी पाहिले.साप सरपटत निघून गेला.
मला दरदरुन घाम फुटला होता. सापाबद्दल ग्रामीण भागात जे गैरसमज असतात ते माझ्या मनात त्यावेळी ठासून भरले होते. मला साप चावला या विचाराने मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचे . बापूजीने बैलगाडीत घालून मला गावात आणले. बघ्यांची गर्दी जमली. जो तो साप चावल्याच्या दुष्परिणामांचा पाढा वाचत होता त्यामुळे मलाही  अभद्र विचार येऊ लागले.
तेव्हा  साप किंवा विंचू चावलेल्या व्यक्तिला किंवा जनावराला दवाखान्यात क्वचित नेत असत.पण  गावातल्या भैरवाच्या देवळावर आधी न्यायचे. तसं मलाही भैरवाच्या पारावर बसवलं.  साप विंचू उतरवणारा पारंगत समजला जाणारा  एकजण आमच्या गावात होता , तो आला . त्याने अगरबत्तीची राख साप चावलेल्या जागेवर लावली . राख लावताना तो काहीतरी पुटपुटत होता. मंत्र बोलत असावा . नंतर एका पितळी ताटलीत पाण्यात तंबाखू कालवून मला ते पाणी पाजलं. लगेच मला उलट्या झाल्या. दोघा तिघांनी मला उचलून भैरवाच्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालता घालता "भैरोबाच्या नावानं बो ss"  असं म्हणत पाच सात वेळा फिरवलं. मग मांत्रिकाने मला लिंबाचा पाला खायला दिला . कडू लागला तर साप उतरला असं समजायचे. मला तो पाला कडू लागला. नंतर लाल मिरच्या खायला दिल्या त्याही तिकट लागल्या . मांत्रिकाने जाहीर केलं " साप उतरला, घाबारायचे नाही" , अशा पध्दतीने मला चावलेला साप उतरला.
मंत्र तंत्राने साप विंचू उतरवण्याच्या अशा अनेक पध्दती गावागावात होत्या; त्याला आज आपण थोतांड म्हणतो; पण वैद्यकीय उपचार आजच्यासारखे तेव्हा सहज उपलब्ध होत नसल्याने बाधित व्यक्तीला मानसिकद्रष्ट्या धीर देण्यासाठी असे ईलाज केले जायचे.  सर्पदंशावर आज उत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले आहेत. सापांबद्दल साक्षरता वाढली आहे.  मंत्र तंत्राचे युग  संपले आता शास्र  यंत्राचे जग आले.  कालाय तस्मै नम:

रविवार, १९ जानेवारी, २०१४

जाधव सर

जाधव सर उप मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले ,त्या आधी त्यांच्याबद्दल अनेक वावड्या ऊठल्या होत्या ; कोणी म्हणायचे की आता शाळेतल्या सगळ्यांना रडावं लागेल , तर काही म्हणायचे की जाधव सरांच्या हाताखाली काम करणं म्हणजे शिकणं. अशा चर्चांमध्ये दुसर्या गटात मी होतो.
   भरत जाधव सर आले. पहिल्याच शिक्षक सभेत त्यांनी सर्वांकडून शालेय कामकाजाबद्दल काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि जाता जाता त्यांच्या स्वभावानुसार बोलले " काम चुकार आणि वेळेचं भान नसलेल्यांना पडता भुई थोडी
होईल , लक्षात ठेवा."  सरांच्या या शेवटच्या वाक्याने अनेकांची मने चुरगळली गेली आणि त्यांच्याबद्दल ठाम समज असा झाला की हा माणूस सणकी स्वभावाचा आहे.
   दुसर्या दिवसापासून जो तो आपापल्या कामात व्यस्त दिसायला लागला .वेळेत येणे ,बाहेर जाताना हालचाल रजिस्टरला नोंद करणे,कँटीनमध्ये तासनतास न बसणे, टाचण रोजच्या रोज काढून ठेवणे , आँफ तासाला ग्रंथालयात जाणे : अवांतर वाचन करणे , महिना अखेरला कँटलाँग निटनेटका व अचूकपणे पूर्ण करुन तपासणे इ. बाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दक्षता घेऊ लागलेत.
  जाधव सरांच्या स्वभावा बद्दल ज्या उलट सुलट चर्चा व्हायच्या त्यात तथ्य नसल्याचे पहिल्या एका वर्षात लक्षात आले. सरांचा स्वभाव तापट होता पण मनाने तेवढेच दिलदारही होते . एखाद्याच्या चुकण्यावर ते ओरडायचे ,टाकून बोलायचे पण त्याबाबत पश्चातापसुध्दा करायचे. याबाबतचा अनुभव वर्षभरात मलाही  आला.
   एक दिवस शाळेत यायला मला उशिर झाला   . नियमाप्रमाणे सरांनी मला सही न करण्याचे बजावले. मी काही न बोलता त्यांच्या कँबीन मधून बाहेर पडलो आणि तेवढ्यातच एक शिक्षिका माझ्यानंतर येऊन जाधव सरांच्या समोर पडलेल्या मस्टरवर सही करुन बाहेर पडल्या . हे सगळ बघून माझाही स्वाभिमान जागा झाला.तडक कँबीन मध्ये घुसलो , सरांसमोरचं मस्टर घेतलं नि सही केली. जाधव सरांना माझं असं वागणं खटकलं . ते मला म्हटले " संजय पाटील ,तुम्ही माझा  आदेश मानला नाही याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील " " ठीक आहे, नियम सगळ्यांना सारखे लागू असतात , मी नियमभंग केल्याबाबत मला मेमो द्या,मी उत्तर देतो." मी असं तावातावाने बोललो व स्टाफरुम मध्ये येऊन बसलो.  शिक्षकांमध्ये    कुजबू   सुरु   झाली ,मी  आता  बळीचा  बकरा   ठरणार  अशा   नजरेने  जो  तो  मला   बघायचा .  दिवसभरात जाधवसर अनेकदा स्टाफरुम मध्ये येऊन गेले.पण  मला  ना  मेमो    दिला ना   प्राचार्यांसमोर बोलावले  .  त्या दिवशी  रोजच्या प्रमाणे शाळा सुटली नि मी घरी आलो.
   त्याच दिवशी संध्याकाळी जाधव सर माझ्या घरी आले , माझ्या खांद्यावर हात ठेवून एकच वाक्य बोलले "तुमच्या वागण्या बोलण्यातली आज सकाळी दिसली ती धार कायम टिकवा , तिला बोथट होऊ देऊ नका" मला नवल वाटले . ज्या माणसाबद्दल दगड,रानटी असे शब्द वापरले जातात तो माणूस मेणापेक्षाही मऊ आहेच शिवाय दिलदारही आहे.
  त्यांच्यापेक्षा मी   वयाने  , अनुभवाने व पदाने कितीतरी लहान असताना त्यांनी मला  जे दिलं ते शब्दात मांडता नाही येणार.  पण जाधव सर, जाधव सर होते त्यांची बरोबरी  कोणीही  करणार     नाही हे नक्की  . स्वाभिमान कसा जपावा हे  त्यांनी  शिकवलेच पण  अहंकार    कसा   विसरावा  हे  सहज दाखवून   दिले .
   त्यांचा अँक्सिडेंट झाल्यावर त्यांना गांधी हाँस्पिटलमध्ये रक्त पुरवण्यासाठी अनेकांसोबत मीही खूप धावपळ केली पण दुर्दैव आडवं आलं  नि जाधव सर सगळ्यांना सोडून गेले .
   काही नाती रक्ताच्या पलिकडची असतात ती रक्तात भिनल्याशिवाय कळत नाहीत असं भिनलेलं नातं जाधव सरांसोबत जुळलं होतं व आहे.

मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

जागर

मराठवाडा  परिसरातील धनगर त्यांच्या मेंढ्यांचा काफिला घेऊन आमच्या गावाच्या पंचक्रोशीत येत  असत.  मेंढ्यांच्या कळपाला वाडा म्हणायचे. वाडा जेवढा मोठा तेवढी त्याची किंमत ठरायची.   एका रात्रीत एकरभर शेत मेंढीच्या लेंडीने सारवलं  जाईल अशा वाड्याच्या मालकाला मान असायचा.        
    अशाच एका मोठ्या वाड्याचा मुक्काम एकावर्षी आमच्या  मळ्यात होता. तब्बल १० रात्री चा मुक्काम असल्याने वाड्यातली बायका- पोरं नि गडी-माणसं चांगलीच परिचयाची झाली होती. रोज संध्याकाळी मेंढ्या शेतात बसवल्यावर तरुण  मेंढपाळ मुलं - मुली पाणी भरायला  विहिरीवर यायचे; तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या चालीरीती,पूजाविधी व सणसमारंभाची माहिती मिळायची. या समाजातील मुला - मुलींची लग्न खूप कमी वयात होतात याबद्दल विचारले असता त्यातल्या पोक्त माणसाने सांगितले की , " आमच्या पोरापोरींना मेंढी  आणि  लेंडीची    पारख  करता येईस्तोवर  आम्ही थांबतो , आमची पोरं शिकत्यात सवरतात काय ?  रोजच्या जगण्यातूनच शहाणपण येतं मग लगीन करायला काय हरकत नसते कोणाची"  जीवन जगायला ज्या प्राथमिक बाबी लागतात तेवढ्या  असल्या की जगणं सोपं होतं. असा सरळधोप अर्थ त्याच्या बोलण्यातून व्यक्त व्हायचा. 
  त्या वाड्यावरील  १३ वर्षाच्या  सुभीचं लग्न जवळपास  तिच्याच वयाच्या मुलाबरोबर ठरलं होतं. त्या लग्नाच्या हळदीचं निमंत्रण काशा    धनगराने मोठ्या   आपुलकीनं   दिलं  . मेढ्यांचं मटण - भाकरी चं जेवण होतं .  जेवणा नंतर खंडोबाचा जागर होता. वाघ्या मुरळींची जेवणं झाल्यावर खंजीरी- संबळचा नाद जंगलभर घुमायला लागला. रात्र जशी वाढत जाईल तसा जागर रंगात येऊ लागला.  तरण्या पोरं पोरींसोबत म्हतारी कोतारी मंडळी वाघ्या मुरळीच्या सोबत नाचू गाऊ लागली . भंडारा  उधळला  जायाचा  , खंडोबाची गाणी टीपेच्या सूरात  म्हटली  जात  होती . नाचणार्यांचं   अंग   घामाघुम  झालं   होतं  , अंगाला अंग घुसळवत भेभानपणे सगळे नाचत  होते.   शिवा धनगर  जोषात  नाचत  गात  होता ; नाचता  नाचता मुरळीच्या  अंगाशी लगट  करायचा. एका दोघांनी त्याला समज दिली  पण  त्याने त्याकडे   दुर्लक्ष केलं  .  तेवढ्यात   चिलीम ओढत बसलेल्या  गणाबाने शिवाला जवळ बोलावून फाडदिशी कानशिलात लगावली . शिवा काय समजायचा ते समजला . जागर संपेपर्यंत मुरळी पासून चार हात दूरच राह्यला. गणाबाच्या शब्दाला मान होता तर त्याच्या फटकावण्याला बहुमान असणारच!
  गणाबा या वाड्याचा मेढ्या (मालक ) होता.  वयाने  आणि अधिकाराने मोठा होता. त्याच्या भावकीतल्या आणि नात्यातल्या धनगरांच्या मेंढ्या एकत्र करुन त्याने वाडा बनवला होता . गेल्या १० वर्षापासून सर्वांना त्याचा भरभक्कम  आधार होता. गणाबा कडक शिस्तीचा व तत्वाचा असल्याने त्याचा दरारा मेंढपाळांबरोबर गावोगावच्या शेतकर्यांमध्येही दिसायचा. बाई आणि बाटली पासून अलिप्त असलेल्या गणाबाला शिवाचं वागणं खटकलं पण त्याने जागराचा रंगाचा बेरंग होऊ न देता शिवाला हाताळले. चांगुलपणा, धर्मभाव,नैतिकता इ. सद्गुण केवळ शिक्षणातून येत नाहीत तर गणाबासारखं  अंगी  बाणवायचे  असतात . निव्वळ सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारित असणं महत्वाचे आहे , हा विचार सुभीच्या हळदीला गणाबाने दिला. 

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

उमरठ

१५ वे कोकण मराठी साहित्य संमेलन दि. १० ते १२ जानेवारी २०१४ दरम्यान महाड  येथे संपन्न झाले . ११ जानेवारी ला सांयकाळी ५ वाजता आम्ही तेथे पोहचलो. तेव्हा कवी संमेलन सुरु होते. प्रतिष्ठीत कवींच्या कविता  सादर होत होत्या . नाशिकच्या नामांकित काँलेजच्या प्राचार्या सौ . देशमुख मँडमने स्त्री भ्रुण हत्या या ज्वलंत विषयावर सादर केलेली कविता मनाला चटका लावून गेली. तर  'चोर'  या  विडंबन कवितेने  हसवत  हसवत वास्तवाचे  फटके दिले  , किशोर सोमन यांचे सूत्रसंचालन अप्रतिम होते. रात्री ९ ते १२ पर्यंत शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी गीतांचा सुंदर कार्यक्रम मराठीतील आघाडीचे सिनेकलाकार सुबोध भावे  व ....... यांनी सादर केला.
    १२ जानेवारीला निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होता परंतु  आम्हाला उमरठ या गावाला जायचे असल्याने अप्पांचे निरुपण आम्हाला ऐकता आले नाही. असो.
     उमरठला आम्ही मढवी सरांच्या मानलेल्या बहिणीला भेटायला गेलो होतो. सरांचे मोठे भाऊ : दादा ,नोकरीसाठी उमरठला असतांना ज्यांच्या घरात राहायचे ते घर आणि त्या घरातील व्यक्तींना मढवी  परिवार आजही विसरले नाहीत ; हे विशेष वाटलं. ज्या आजींना भेटण्यासाठी आम्ही उमरठ गेलो त्या आजी  वयोमानामुळे खूप थकल्या आहेत, आजीचा मुलगा आणि सून मुंबईला  असल्याने आजी एकट्याच राहतात. आम्ही गेलो तेव्हा आजी अंगण झाडत होत्या. पाठीला पोक आल्याने आजी वाकून चालतात तरीही आजींनी आम्हाला पाणी आणून दिलं. शिवाय जेवणासाठी आग्रह करु लागल्या .म्हातारपण ,एकाकीपण असूनही आजीची पाहुण्यांबद्दलची आस्था बघून मी भारावलो. मढवी परिवाराने जे नातं जपलय त्याचा पोत लक्षात आला. रक्ताचं नातं सहज विसरणार्या आजच्या काळात हे नातं खूप गहीरं आहे, असं जाणवलं . सख्या बहिणीला भावाबद्दल अंत:स्थ जिव्हाळा असावा तसं आजीचं मढवी  सरांशी बोलणं सुरु होतं . आजीच्या घरासमोरच विठ्ठल मंदीर आहे 'दर्शनाला जाऊन या' असं आजी बोलल्या नि आम्ही मंदिरात गेलो. मी कधीही कोणत्याही देवाकडून काहीच मागत नाही पण त्या दिवशी विठ्ठलाला मनोभावे एक प्रार्थना केली की आजीला  निरोगी , समाधानी व सुखी मरण येऊ दे!
    आजीचा निरोप घेऊन आम्ही तानाजी मालुसरे यांचं स्मारक बघायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रामाणिक, समर्पित,शूर सेनापती  उमरठचे होते याचा सार्थ अभिमान उमरठकरांना असल्याचे जागोजागी दिसले. तानाजी मालुसरेंनी हाताळलेल्या तलवारी स्मारकाच्या समोरच राहणार्या कुटुंबाने आम्हाला दाखवल्या . 'गड आला पण सिंह गेला' असे भावोद्गार ज्यांच्याबद्दल निघाले  अशा   नरवीर  योद्ध्याचे  आणि  आयुष्यभर प्रेमळ , भावस्पर्शी नातं जपणार्या आजीचं गाव कसं विसरता येईल.

बुधवार, ८ जानेवारी, २०१४

नात्यांची दिवाळखोरी

१० वर्षांपूवी  दिवाळीच्या  सणाला आपुलकीचा , स्नेहाचा लख्ख प्रकाशदिवा  घराघरात दिसायचा , नात्यानात्यांतील माधुर्याचा फराळ ताटभर वाढला जायचा , वसुबारस पासून सुरू होणाऱ्या दिवाळसनाला गाई वासराच्या पूजनात पशुधनाबद्दलचे वात्सल्य डोळ्यात साठायचं .सडा सारवण झालेली घरे आणि आंगणे रंग - रांगोळीने  गोजिऱ्या लेकरसारखी निरपेक्ष हसायची ! धन त्रयोदशीला पंजोबांच्या काळापासून जपून ठेवलेली नाणी पाटावर विराजमान व्हायची , घरातील पोक्त माणसांपासून लहान लेकरांपर्यंत सगळेच धनाचे मांगल्यपूर्वक पूजन करायचे. दिवाळीसाठी आवर्जून खरेदी केलेली कापडं अंगभर नेसलीली दिसायची. पावित्र्य ,मांगल्य, शुचिर्भूतता यांचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच्या दिवसात आनंदाचं उधाण आलेलं दिसायचं ! कमालीची गरिबी असतानाही अल्पशा गोष्टीत आभाळभर समाधान हृदयात वसायचं !साधी भोळी माणसं देवासारखी होती म्हणूनच  सोज्वळ अगत्य दिसायचं  ! नात्यानात्यातील भावबंधन  निर्मळ, निरहंकारी  सुताने घट्ट  विणल जायचं ! थोडक्यात पूर्वीच्या सणात किंवा समारंभात प्रत्येक माणूस  माणुसपणाचं जगणं जगायचा ! नाती गोती मनपूर्वक जपायचा !
   काळ बदलत गेला आणि माणूस काळानुरूप बदलला . पद , पैसा , प्रतिष्ठा पणाला लागू नये म्हणून माणूस माणसापासून दुरावला गेला. खोटा गर्व , कमालीचा अहंकार आणि बेगडी भाव भावनांचं उथळ प्रदर्शन सुरू झालं! आर्थिक सुबत्ताच्या हव्यासापोटी लालच वाढतच गेली नि विश्वास हा शब्द पांगळा बनून गेला. पराकोटीचा द्वेष , जीवघेणी ईर्षा , सूड उगवण्याचं जहरी षडयंत्र यात नाती चिरडली गेली . माणूस हैवाण बनला . आजी - आजोबा , आई - वडील, पती - पत्नी , भावा - बहिनीतील रक्ताच्या नात्यांमधील ओलावा दिवसागणिक आटत गेला नि भावगर्भित असणारी  नाती रुक्ष बनली. कधी दोन  भाऊ  रक्ताचे नाते विसरुन एकमेकांच्या जीवावर उठतात तर कधी नवरा बायकोतील शुल्लक वाद घटस्फोट घडवतात. जिवाभावाची माणसं एकमेकांपासून एवढी दुरावतात की मरेपर्यंत एकत्र येत नाहीत. बहीण भावाचं स्नेहाचं नातं कोर्ट कचेरीत ओढलं गेलं नि काटेरी बनलं .एकत्र कुटुंब ही संकल्पना हद्दपारच झाली . वृद्धाश्रमात गेलेले आई बाबा दसरा - दिवाळीतही आठवत नाहीत इतकी निष्ठुरता वाढली. परदेशी गेलेल्या अपत्यांची आस मनात जागवत कित्येक थिजल्या डोळ्यांनी विरह वेदना सोसत मरण कवटाळलं ! 
   कधीकाळी आनंदाचं उधाण आणणारी दिवाळी , विशुद्ध नाते जपणारी दिवाळी, सुख- शांती - समाधान- स्नेहभाव प्रदान करणारी दिवाळी पुन्हा घराघरात नांदो आणि नाती सदृढ होवोत म्हणून  विधात्याने माणसांच्या कोत्या मनाचं , हलकट - हावरट स्वभावाचं, निष्ठुर निर्दयी पणाचं दिवाळ काढावं !

    

शांतीवनसाठी निधीसंकलन ( बातमी )

एन .एन. पालीवाला ज्यू. कॉलेज ,नवीन पनवेल या विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेत
( एन.एस.एस.) सहभागी असलेल्या सर्व स्वयंसेवकांनी कुष्टरोग निवारण समिती ,शांतीवन ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आर्थिक निधी संकलनाचे मोलाचे कार्य केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली या संस्थेच्या एन.एन.पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल या विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दरवर्षी समाज हिताचे विविध उपक्रम राबविले जातात.त्याचाच भाग म्हणून या वर्षी विद्यालयाचे प्राचार्य श्री . डी.व्ही. पवार सरांनी  कुष्टरोग निवारण समिती ,शांतीवन ता. पनवेल या सेवाभावी संस्थेसाठी आर्थिक निधी संकलनाचे आवाहन विद्यालयातील एन.एस.एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री . संजय पाटील व श्रीमती हेमलता पुराणिक यांच्या मदतीने  विध्यार्थ्यांना  केले होते. त्यानुसार सर्व स्वयंसेवकांना निधी संकालासाठीचे छापील कार्ड वाटले होते. 
         स्वयंसेवकांनी या योजनेला उस्त्फुर्त पाठिबा दिला . गणपती सुट्टीत या सर्व स्वयंसेवकांनी समाजातील दानशूर व्यक्तींकडून तब्बल ११७०० रुपये इतका भरघोस निधी अवघ्या १५ दिवसात जमा करून प्राचार्यांच्या स्वाधीन केला.  
         सौ . काशीद के.व्ही.,व इतर सर्व वर्गशिक्षक व सहाय्यक शिक्षकांनी परिश्रम घेऊन या मोलाच्या सामाजिक कार्याला हातभार लावला म्हणून प्राचार्य पवार सरांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. 
................................................................................................................................
लोकसत्ता  मध्ये हि बातमी प्रकाशित झाली आहे , बातमी वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256983
 


मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

श्रद्धा

सुधागड  एज्युकेशन  सोसायटी , पाली  तालुका सुधागड जिल्हा रायगड या मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष्य,रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष,दलित मित्र ,पर्यावरण मित्र,  आदर्श समाजसेवक, स्वातंत्र्य सेनानी,   गांधीवादी   विचाराचे   समर्थक अशा  विविध  सन्मानाने  सन्मानित  व्यक्तीमत्व  व  सुधागड शिक्षण परिवाराचे  पितामह  कै. केशव गोविंद लिमये
(दादासाहेब लिमये )  दिनांक २१/१०/२०१० रोजी अनंतात विलीन झाले . 
    दादासाहेब लिमयेंनी आपल्या १०१ वर्षाच्या दीर्घ आयुष्यात कित्येकांना रोजी रोटी तर दिलीच शिवाय कित्येक अभागी जीवांना मायेचा भरभक्कम हात दिला. कृती पाहिजे बडबड नको म्हणत आयुष्यभर कार्मवादाचा पुरस्कार करत   दादांनी निस्तेज मनांना उभारी  दिली.  दीन- दलितांबद्दल, उपेक्षितांबद्दल कणव आपल्या कृतीतून व्यक्त केली. विचाराने व आचाराने दरिद्री बनू नका म्हणत त्यांनी कित्येकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. म्हणूनच   पालीच्या बल्लाळेश्वरावर जशी भक्तांची असीम श्रद्धा आहे तशी  माझ्यासह अनेकांची  दादांबद्दल श्रद्धा आहे.