शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

आत्मघात

सुंदर ,खेळकर , हसरी , मनमोकळी अशी होती ती . येताजाता हाय अंकल , बाय अंटी बोलल्याशिवाय तिला चैन पडत नसे. सण समारंभाचे निमंत्रण द्यायला तीच यायची. नवीन ड्रेस आणल्यावर आपुलकीने दाखवायची . गोडधोड जेवायला आवडायचं तिला ; गुढी पाडव्याच्या दिवशी मुद्दाम सांगायची की पुरणपोळ्या केल्यावर बोलवा म्हणून . तिला आपलं परकं असं  वाटत  नव्हतं. घरातलीच एक सदस्य म्हणून  ती  आमच्या  घरात वावरायची .
एके दिवशी छटपूजेचं निमंत्रण द्यायला आली  . आग्रहपूर्वक बोलली.आम्हाला नकार देणं शक्यच नव्हतं. आम्ही पूजेच्या ठिकाणी  गेलो .अगदी मनोभावे पूजा करताना  दिसली.  त्या दिवशी तिच्या वागण्या बोलण्यात नेहमीचा अवखळपणा नव्हता ; तर  धीरगंभीर वाटली .
     तिचं   नाव  अर्पिता पण  सर्वजण तिला सोनी    म्हणायचे .  ती  पिल्लई काँलेजला इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला होती. वार्षिक निकाल लागला होता पण तिने घरात त्याबाबत काहीही सांगितले नव्हते . त्या  दिवशी   तिचे वडील ड्युटीवर गेले होते  तर आई बाजारात गेली होती .  साधारण संध्याकाळी  ५ वाजता  तिची आई घरी आली  . दारावरील बेल वाजवून प्रतिसाद न मिळाल्याने आमच्याकडे चावी दिली का म्हणून चौकशी केली. पण चावी दिली नसल्याने त्याही चिंतेत पडल्या . त्यांनी त्यांच्या मिस्टरांना फोन केला , ते वाटेतच आहेत व लवकर येतील असं समजलं . सोनीच्या आईने ( गुप्ता भाभी ) हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या आमच्या घरात ठेवल्या नि त्या पुन्हा बाहेर गेल्या .
  ६ वाजता गुप्ताजी आणि गुप्ता भाभी सोबत घरी  आले. आमच्याकडे ठेवलेल्या पिशव्या घेऊन गुप्ताजीकडे असलेल्या चावीने त्यांनी दरवाजा उघडला . आणि प्रचंड रडण्याचा आवाज कानावर आला . आम्ही गोंधळलो . काय झाले म्हणून बघायला धावलो तर गुप्ताभाभी मोठ्यांने हंबरडा फोडून रडत होत्या आणि गुप्ताजी सोनीच्या पायाला धरुन ओक्साबोक्सी रडताना दिसले.
  बेडरुम मधल्या पंख्याला सोनी लोंबकळत होती. काय करावे सुचेना ; पण शेजारी या नात्याने गुप्ताजींना सावरलं  . सोनीला वाचवता   येईल या  अपेक्षेने पंख्याला  अडकलेल्या सोनीला   सोडवण्यासाठी   मी  धडपडत  होतो   ; पण  माझे  हातपाय  थरथरत  होते ;  त्यात   त्या    दिवशी    लाईट   नसल्याने  घरभर अंधार दाटला होता म्हणून माझ्या पत्नीने मेणबत्ती आणली. पण  तिचे हातही प्रंचंड थरथरत होते . कसंबसं सोनीला खाली उतरवत असताना बिल्डिंगमधील बरेच जण जमा झाले होते .  माझ्या मदतीला ईवान भाभी  आल्या , त्यांनी धाडस दाखवल्याने सोनीला उतरवून मी खांद्यावर घेतलं आणि अरुणोदय हाँस्पिटल मध्ये नेण्यासाठी जिना उतरु लागलो, मग सोसायटीचे तेव्हाचे सेक्रेटरी अधिकारी आले . त्यांनी व मी सोनीला दवाखान्यात नेले. लाड मँडमने सोनीला तपासले नि "स्वारी ,काही होणार नाही " असं म्हटल्या . मी मटकन खाली बसलो.   सुनिल घरत  व इतर   दोघा-तिघांना  फोन  केले  पण   ते  येईपर्यंत धीर धरवत   नव्हता   लगेच  सेक्टऱ १० चे  त्यावेळचे  नगरसेवक   अशोक  शेळकेंना   फोन  केला , ते  आले  . थोडा  धीर आल्यावर   गुप्तांजींना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले . पोलीसांनी बरेच प्रश्न विचारले . रिपोर्ट झाल्यावर पुन्हा दवाखान्यात आलो .तेथे माझे माजी विद्यार्थी भेटले ;   ते मनसेचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी पुढील सर्व सोपस्कार करायला खूप मदत केली. रात्री १० वाजता पोलीसांनी मला , माझ्या पत्नीला पोलीस चौकीला बोलावले .  सोबत ईवान भाभी आल्या . आमचे तिघांचे जवाब नोंदवून आम्हाला घरी सोडले. 
     मी सोनीला उतरवले होते म्हणून मी अडचणीत येईल असं बरेच जण मला सांगत होते म्हणून मी तणावाखाली वावरत होतो . भामरे सर , वाल्मिक , खैरनार सर ही मंडळी   रात्रभर माझ्या सोबत होती .
  दुसर्या दिवसापासून जवळपास महिनाभर मला अस्वस्थ वाटले. हे सगळं लिहितांना आजही मला  सोनीच्या आत्महत्येमागील कारण न समजल्याचे व तिच्या आकस्मिक जाण्याचे दु:ख कायम आहे . तिच्या म्रतात्म्यास चीरशांती लाभो असं म्हणत नियती पुढे आपण हतबल ठरतो.
  आजच्या तरुण पीढीला छोटेमोठे अपमान सहन होत नसल्याने आत्महत्येचा विचार करावा लागतो; हेच तरुणांचे मन  खंबीर नसल्याचं द्योतक आहे. ज्या कुटुंबात तरुण अथवा तरुणीने आत्महत्या केली असेल अथवा तसा प्रयत्नजरी झाला असेल अशा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अपमानास्पद वाटतं. जीवनात चढ-उतार येतच असतात ; संकटांशी सामर्थ्याने संघर्ष केल्याशिवाय आयुष्याचे सौंदर्य वाढत नाही, जीवन  खूप सुंदर आहे त्याकडे सकारात्मक द्रष्टीने बघितले तर चांदण्यांचं शिंपण दिसतं  आणि नकारात्मक बघितलं तर भकास काळरात्रीचा भास होतो. आपल्या द्रुष्टीकोन जसा असेल तसं आपल्याला दिसतं. हसत हसत जगायचं की रडत कुढत हे आपणच ठरवायचं .
....................................................................................

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

वसंत काका

वसंत त्र्यंबक सोनार हे माझ्या वडिलांचे मित्र होते.  ते मूळचे जामनेरचे पण व्यवसायानिमित्त अमळनेरला स्थायिक झाले होते . पाण्याचे पंम्प रिवांयडिंग , इलेक्ट्रीक फिटिंग ची कामे ते करत असत . अमळनेरच्या मुख्य बाजारपट्यात त्यांचं दुकान होतं.  हा माणूस खूप प्रामाणिक आणि गुणी होता पण त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.  ते  गावोगावी   जाऊन    इलेक्ट्रीकची   कामे करत असत . आमच्या गावातील बरीच कामे ते करायचे म्हणून वडिलांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.  
मी ७ वी पास झाल्यावर त्यांच्याच आग्रहाने ८ वी पासून अमळनेरच्या प्रताप हायस्कूल मध्ये शिकायला आलो. गावातून अमळनेरला येण्याजाण्यासाठी सोय होती पण नदीचे पूर व माझे वय लक्षात घेऊन वसंत काकांनी मला त्यांच्या घरी राहण्यासाठी बोलावले. त्यांची रुम खूप लहान होती पण मन मोठं होतं  .  त्यांची पत्नी, १ बहीण, ४  मुले त्यात मी या सर्वांना तेवढ्या खोलीत अडचणीचे होईल म्हणून मला त्यांच्याच खोली शेजारी एक रुम भाड्याने घेतली .  त्या खोलीत आम्ही सगळे मुलं अभ्यास करायचो, झोपायचो . ८ वी ते १० वी पर्यंत मी वसंत काका व मावशीच्या आश्रयात राहिलो . 
  या  तीन वर्षात या कुटुंबाने मला जे प्रेम दिलं , जे संस्कार दिलेत त्यामुळेच मला जगण्याची दिशा सापडली , घडता  आलं  ; अन्यथा माझ्या भावंडांसारखं मलाही शिक्षण सोडून शेती करावी लागली असती .  काका आणि मावशीने माझ्या आई वडिलांप्रमाणे मला सांभाळलं .कोणतही काम करण्याची लाज बाळगू नको , हा मंत्र मला घरातून दिला होता तर वसंत काकांनी त्या मंत्राची साधना माझ्याकडून करुन घेतली. शाळा सुटल्यावर काकांनी व मावशींनी सांगितलेली सर्व कामं मी आनंदाने करायचो. दळण , पाणी , झाडलोट , दिवाबत्ती व त्यांच्या लहान मुला-मुलीला सांभाळण्याची कामे माझ्याकडे असायची . रात्री काका घरी आल्यावर त्यांचे हात - पाय दाबून देता देता काका माझे पाढे पाठ घ्यायचे , अभ्यासाचे विचारायचे  तेव्हा मात्र मला काकांची भीती वाटायची .  पाढा चुकला  तर काका ओरडायचे किंवा मारायचे ; पण लगेच  जवळ घेऊन म्हणायचे " अरे बेट्या , तू आता मोठा झाला , तुले आता नाही येणार तर कव्हा येईन , शिकायचं वय गेल्यावर कोणाले शिकता येईन का ?  मंग अभ्यासात डोकं खूपसल्याबिन येईन का , सांग बरं ?  , जाय आते , अभ्यास करी घे " असं म्हणत माझी सुटका व्हायची. मी माझ्या खोलीत अभ्यास करतो की झोपलो हे बघायला काका किंवा मावशी हमखास यायचेत . 
  या तीन वर्षात काका मावशीची आर्थिक ओढातान मी जवळून बघायचो . रविवारी घरी आल्यावर आई वडिलांना सांगायचो . मग घरुन धान्य , सरपण , पापड अशी रसद येऊ लागली . काका मानी होते त्यांना हे आवडत नव्हतं पण वडिलांच्या आग्रहास्तव त्यांना नकारही देता येत नसे. 
  ११ वीत गेल्यावर काकांचे घर सोडले . नंतर गावातल्या इतर मुलांच्या हेव्याने मी अपडाउन करत शिकू लागलो. तेव्हाही काका मावशीच्या ओढीने मी त्यांच्याकडे जात येत असे . कालांतराने काकांनी अमळनेर सोडले नि ते त्यांच्या गावी जामनेरला गेले. मग मात्र काका मावशी मला दुरावले . मी नोकरीला लागलो हे समजल्यावर काका मावशीचा आनंद अवर्णिय होता .   मधल्या काळात त्यांच्या मुला-मुलींची लग्न झालीत ,व्याप वाढलेत, रेशन दुकानाचा व्यवसाय विस्तारला व त्यांचं  येणंजाणं  थांबलं .
    काका  मावशीला पनवेलला बोलवायचो पण ते म्हणायचे , " अरे बेट्या , मुंबईले  येणं काई खायाचं काम हाये का , तिथं यायले आम्हाले कसं जमेल , मुंबई पिक्चरमधी बगितली तेव्हाच धडकी भरली , कुठं चुकलो तर ? , त्यापेक्षा तूच ये ना , आम्हाले म्हातार्यांले कशाले बोलवतू "  पण मी हट्टच धरला नि काका मावशी पनवेल आले . आल्या आल्या काका मला बिलगून रडले . मी ही भावनावश झालो .  काका मावशीच्या अधू डोळ्यातून गळणारी टिपं मला जिव्हाळ्याचं दान देत होती.  तर माझे अश्रू त्यांच्या पुण्याईची साक्ष देत होते .
काकांचं निधन झाल्याची बातमी मिळाली त्या रात्री मी एकट्याने एकांत बघून रडून घेतलं . मावशीला भेटलो तेव्हाही खूप रडलो .  त्या रडण्यात काका गेल्याचं दु:ख होतच पण त्या दोघांचं माझ्यासाठीच्या समर्पणाची,योगदानाची , व निर्व्याज प्रेमाची  सय अधिक होती .  

रंग उषेचा

कांतिलाल कडू यांच्या 'निर्भिड' वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त १५/०२/२०१४ रोजी रात्री  ७  ते १० या वेळेत सुप्रसिध्द गायिका उषा मंगेशकर व ख्यातनाम संगितकार ऋदयनाथ मंगेशकर यांचा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम होता . या कार्यक्रमात राधा मंगेशकर , ऋदयनाथ मंगेशकर व उषा मंगेशकर यांच्या आवाजाचा गोडवा होताच पण त्यांच्या गोड आवाजाला  सुमधूर संगीत देणार्या संगीतकारांचे कौतुक वाटले. व्हायोलिनचे सूर थेट मनात उतरायचे तर ढोलकीवरची थाप कानांत घुमायची . मंत्रंमुग्ध होणं म्हणजे काय याची प्रचिती देणारा कार्यक्रम होता.
    उषा व ऋदयनाथ मंगेशकर या बहिण भावाचं वय  विचारात घेता त्या वयातल्या सर्वसामान्य माणसांना धड बोलता येत नाही पण या द्वयींनी प्रत्येक गाण्यातील शब्द नि शब्द श्रोत्यांच्या ऋदयात ठसवला . म्हणूनच मंगेशकर घराण्याला असामान्य प्रतिभेचं दैवी देणं लाभलेलं घराणं म्हणतात . 
३ तासाच्या या कार्यक्रमाने सर्व श्रोत्यासह मी त्रुप्त मनाने घरी आलो  .यासाठी    आयोजकांचे मनपूर्वक आभार  !

सोमवार, १० फेब्रुवारी, २०१४

चेंबूर भवन

संत निरंकारी मिशनच्या चेंबूर भवन येथे रविवार दि. ०९ /०२/२०१४ ला आम्ही गेलो होतो. धर्माधिकारी सरांची व माझी अशा दोन गाड्यात 11 जण होतो. सकाळी १०.३० ला निघालोत. ११.४५ ला भवनात पोहचलो. तेथे विचार सुरु होते . व्यासपिठावरील महात्मा सांगत होते " प्रेमाच्या व्यतिरिक्त संसार सुना असतो,आपण सर्व एक आहोत,समाजाच्या सेवेतच सर्व सुख आहे , बाबाजींच्या आदेशाचे पालन करणे हाच आपला धर्म आहे इ." हे सर्व विचार ऐकताना मनात अनेक विचारांचं काहुर माजलं होतं. तेथे बसलेल्या हजारो भाविकांना आपण सर्व एक आहोत ,सेवा हेच सर्वसुख आहे ,प्रेमाने बोला इ. विचार जरी पटत असले तरी त्यातील किती लोकं प्रत्यक्ष व्यवहारात तसे वागत असतील ? येथून बाहेर पडल्यावर त्यांच्या संपर्कात येणार्या सगळ्यांना ते आपले मानत असतील का ? भक्ती महत्वाची पैसा नव्हे हा विचार बोलणार्या व्यक्तीने अनेकदा सांगितला पण लोकांना पैसा आणि भक्ती यात निवड करायला सांगितले तर ९५ टक्के लोक पैशाला प्राधान्य देतील . मग बाबा बुवांच्या सत्संगात व्यक्त होणारे विचार हवेत विरत असतील का? अशा अनेक प्रश्नांचा गुंता सोडवत सोडवत मला असं वाटतं की  किर्तन - प्रवचने ऐकायला सोपी व  आनंददायी असतात पण आचरणात आणायला  तेवढीच कठीण वाटतात. बाबांच्या मठ आश्रमांसाठी किंवा त्यांच्या मोठमोठ्या दिमाखदार कार्यक्रमांसाठी होणारा प्रचंड खर्च गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ,औषधोपचारासाठी  केला तर केवढी मोठी समाजसेवा घडेल. पण धर्माच्या नावाने जमा होत असलेला पैसा मठ मंदिरांसाठी व सोन्या रुप्याच्या मूर्त्यांसाठी वापरला  जात  आहे  .बाबांच्या  उपदेशाकडे कानाडोळा करुन स्वताची तुंबडी भरण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अबलंब होतो आहे . देवांच्या यात्रा जत्रा करण्यासाठी व नवस सायास   पुरे   करायला कर्ज काढले जाताहेत. मशिद, मंदिरांच्या व चर्चच्या दानपेट्यांमध्ये जमा होणारे धन  चुकीच्या व्यक्तींच्या हातात सापडल्यास अनर्थ ओढवण्याची भीती कायम आहे . कर्मवाद कमी होतो आहे आणि दैववाद वाढतो आहे परिणामी  आळस वाढतो आहे .   
अरिष्ट थोपवायचं असेल तर देवांना अवतार धारण करावा लागतो ,  सर्व धर्मातील आजच्या बाबांनी , संतांनी , महंतांनी व विश्वस्तांनी अवतारी  बनून नेमका खरा धर्म लोकांना शिकवावा . त्यासाठी जसं सामान्य माणसाला सर्वसंग त्याग सांगितला जातो तसा त्याग साईबाबांचा आदर्श घेऊन जे कोणी करतील तेच सिध्द पुरुष किंवा अवतारी आपण का मानू नये ?

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

माझं गाव

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यतील      भिलाली हे माझं गाव. गावाच्या लगतच पश्चिमेला बोरी नदी वाहते ; हे  आमच्या गावाचं नैसर्गिक वैभव. शेती हाच गावकर्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बोरी नदी आमच्या सर्वांचं पालन पोषण करणारी  आई आहे . या नदीचं पात्र खूप मोठं आहे . पावसाळ्यात  नदीला येणारे प्रचंड पूर काळजात धडकी भरवणारे असतात. काही वर्षांपासून बोरी नदीवर तामसवाडी या गावाजवळ धरण बांधलं गेल्याने सध्या मोठे पूर येत नाहीत पण पाऊस जास्त झाला की गावकरी अजूनही धास्तावतात.
  गावाबाहेर  सोमगिर      महाराजांचे  समाधी   मंदिर  आहे .  अति  प्राचिन हेमाडपंथी  या  मंदिराचे बांधकाम घोटीव    चिरेबंदी  दगडात  केलेले  असल्याने   हे  मंदिर   अजूनही  भरभक्कम  आहे  .   सोमगिर      महाराजांबद्दल  गावातील  सगळ्यांची अपार    श्रद्धा आहे  . कधी काळी  बोरी नदीच्या पूराचे पाणी गावात घुसायचे तेव्हा सोमगिर महाराजांना साकडे घातले जायचे; नवस केले जात व नदीला साडी-चोळीचा आहेर भक्तीभावाने अर्पण केला जायचा . साधारणत: ३ ते ४ तासात पुराचे पाणी ओसरायचे . देवाने व नदीने आपली प्रार्थना ऐकली असं मानलं जाई आणि यथावकाश नवस फेडले जायचे.  दर एकादशीला सोमगिर महाराज मंदिराच्या सभामंडपात भजन - किर्तन होते. सुगीच्या हंगामात शेतात पिकलेलं धन धान्य देवाला नैवद्य म्हणून चढवलं जातं. सण समारंभाचा गोडधोड जेवणाचा पहिला ताट देवळात जातो . 
   रोज पहाटे गावात प्रभातफेरी होते.' हरे राम हरे राम राम राम हरे हरे , हरे क्रुष्ण हरे  क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे 'असा  जयघोष करत वारकरी भाविक न चुकता  रोज भक्तीभावाने प्रभातफेरीत सहभागी होतात . त्यानंतर देवळातल्या स्पिकरवर भक्तीगीत वाजवले जातात . दररोज सकाळी नित्यनेमाने हे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. 
  गावात प्रत्येकाच्या सुखदुखात सगळे एकदिलाने सहभागी होतात . गरिबातल्या गरिबाला मदतीचा हात दिला जातो. भांडण तंटे गावातच मिटवण्याचा प्रघात आहे पण लोकसंख्या वाढल्याने  काही तंटे पोलिसांपर्यंत जातात.  गावातले सर्व रस्ते काँक्रीटचे  आहेत . पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे.दिवाबत्ती , साफसफाई वेळच्यावेळी होते. गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ,प्राथमिक आरोग्य केंद्र आहे , १० वी पर्यंत शाळा आहे ,सबपोष्ट आहे. किराणा मालाची १० ते १२ दुकाने आहेत , दोन खाजगी दवाखाने आहेत. सर्व सुविधांनी परिपूर्ण गाव अशी माझ्या  गावाची ओळख आहे.
.........

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

स्नेहसंमेलन २०१४

विद्यालयाचे स्नेहसंमेलन एक  आनंद जत्राच  असते.   शिपायापासून  मुख्याध्यापकापर्यंत  प्रत्येकाची धावपळ   दिसून येते  . विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कलात्मक अंगाचे सादरीकरण यातून होत असताना  त्यांच्या कसोट्या लागतात .विद्यार्थी   व वर्गशिक्षकांमध्ये अहमहमिका याच काळात दिसून येते  . अगदी गाणं निवडण्यापासून ते थेट स्टेजवर सादर होईपर्यंत वर्गशिक्षकाला व विद्यार्थ्याला अनामिक भीती  असते. यंदाचे स्नेहसंमेलन अतिशय सुंदर झाले .
  तिन्ही दिवसाच्या सांस्क्रतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलागुण  दाखवलेत. दमलेल्या बापाची कहाणी  या सादरीकरणात उपस्थित प्रेक्षकांना भावनिक बनता आले .  कला प्रदर्शन , विद्न्यान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौशल्य दिसून आले.  हस्तलिखित व वेबसाईटचे प्रकाशन मोठ्या व्यक्तींच्या हस्ते झाले . यात संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंतशेठ ओसवाल साहेब , शिक्षण उप संचालक व्ही.एस.म्हात्रे साहेब ,माजी शिक्षण सह संचालक श्री.पोटे साहेब होते.   फनी गेम्स मध्ये सर्वच विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद घेतला , या गेम्समध्ये किल्ली फिरवण्याच्या गेमने सर्वाधिक तिकिटे विक्री केली .  स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी २०१४ दरम्यान संपन्न झाले.

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

संपादकीय 'तरंग २०१४'

बांठीया माध्यमिक व पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त 'तरंग'  हे विद्यार्थ्यांचे  हस्तलिखित आपल्या हाती देतांना अतिशय आंनंद होत आहे. 
   विद्यालयाचे प्राचार्य श्री पवार सरांच्या कल्पकतेतून हस्तलिखिताची संकल्पना पुढे आली. व  आपल्या विद्यालयातील सर्व विभागातील सर्व शिक्षकांनी 'तरंग' करिता विद्यार्थ्यांना लिहिण्याची प्रेरणा दिली म्हणूनच  या हस्तलिखिताला  मूर्तरुप देता  आलं ; याची आम्हाला जाणीव आहे. विद्यार्थ्यांकडून साहित्य येत असतांना नेमकं कोणतं साहित्य घ्यावे नि कोणतं नको अशा द्विधा मनस्थितीत संपादक मंडळाचे सदस्य होते, पण हस्तलिखित समिती प्रमुख  श्रीमती निंबाळकर म्याडम व समितीचे सर्व सदस्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून आलेल्या साहित्याची वर्गवारी करून दिली; शिवाय शुद्धलेखन तपासून दिल्यामुळे संपादक मंडळाचे काम सोपे झाले.
   कथा , कविता , लेख , विनोद , सुविचार इ. प्रकारचे साहित्यिक लेखन ५ वी ते १२ वी च्या दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांनी केलेले आहे. या लिखाणात विद्यार्थ्यांमधील प्रतिभा,सर्जनशीलता, कल्पकता इ. साहित्यिक गुणांना वाव देता यावा ; विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळावी, स्नेहसंमेलन निमित्य साहित्यिक स्नेह वाढीला लागावा, भाव तरंगांचे आदान प्रदान व्हावे  या हेतूने हे हस्तलिखित तयार करण्यात आले आहे. 
   यातील काही त्रुटी असल्यास त्या आमच्या पदरात घालाव्यात व चांगलं असेल त्याचे मुक्तकंठाने कौतुक व्हावे या अपेक्षेसह धन्यवाद !
...............................................................................................................................
                                                               संपादक